६ ऑक्टोबर 'मात्रोश्री'बाहेर आंदोलन तर १० ऑक्टोबर 'महाराष्ट्र बंद'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2020
Total Views |

maratha reservation _1&nb



मुंबई :
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या ६ ऑक्टोबरला 'मातोश्री'बाहेर आंदोलन तर १० ऑक्टोबर रोजी 'महाराष्ट्र बंद' करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेतली.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण मिळालेले थांबले. राज्य सरकारला येत्या ९ ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तो पर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १० तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समितीच्या नेत्यांनी दिला. मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. आम्ही राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरे करत आहोत. तरुणांच्या भावना जाणून घेत आहोत. काल एका तरुणाने बीडमध्ये आत्महत्या केली. केवळ आरक्षण नसल्याने यशस्वी होऊ शकत नसल्याने त्याने हे पाऊल उचलले. त्यामुळेच आम्ही मराठा तरुणांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी हा बंद पुकारला आहे, असं संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी सांगितले.यावेळी मराठा आंदोलकांनी १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली. हा बंद शांततेत करण्यात येईल. कुणीही त्या दिवशी खळखट्ट्याक करू नये, दगडफेक करू नये, असं आवाहन मराठा आरक्षण संघर्ष समितीने केलं आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. बंद दरम्यान काही महामार्ग अडवले जातील. रास्तारोको केला जाईल. पण बंदला हिंसक वळण लागलं तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असंही ते म्हणाले.


दरम्यान कोल्हापुरात देखील आज मराठा समाज समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन समितीचे आबा पाटील यांनी हा इशारा दिला. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका बाहेर येत नसल्याने तरुणांमध्ये संभ्रमाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय घ्या. त्यानंतर मात्र, ६ ऑक्टोबर रोजी आम्ही मातोश्रीसमोरच आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी दिला.
@@AUTHORINFO_V1@@