निर्भया प्रकरणातील गुन्हेगाराची सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : फाशीला अवघे १३ दिवस बाकी असताना निर्भया प्रकरणातील एक गुन्हेगार विनयकुमार शर्मा याने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. याचिकेमध्ये फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी विनंती शर्मा याने केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने मंगळवारी म्हणजे ७ जानेवारी रोजी चारही गुन्हेगारांचा डेथ वॉरंट जारी केला आहे. त्यानुसार चारही गुन्हेगारांना २२ जानेवारी, २०२० रोजी सकाळी सात वाजता दिल्लीतील तिहार कारागृहात फासावर चढविण्यात येणार आहे.

 

मात्र, या प्रकरणातील एक आरोपी विनयकुमार शर्मा याने आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. या याचिकेत आपल्याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी विनंती शर्मा याने केली आहे. क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून गुन्हेगाराने मृत्यूदंड रद्द करण्याविषयीचा अखेरचा प्रयत्न केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाची आजपर्यंतची परंपरा पाहता दुर्मिळातील दुर्मीळ (रेयरेस्ट ऑफ द रेयर) प्रकरणातच क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी करताना आपला निर्णय बदलला आहे. त्यामुळे विनयकुमार शर्मा याची फाशी टळण्याची शक्यता फार कमी आहे. यापूर्वीदेखील प्रकरणातील अक्षय ठाकुर या गुन्हेगाराने फाशीच्या शिक्षेविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

 

क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे काय ?

 

प्रशासकीय अथवा न्यायिक कामकाजातील अनियमितता सुधारण्यासाठी करावयाची याचिका म्हणजे क्युरेटिव्ह पिटीशन. या याचिकेद्वारे दोषी न्यायालयाच्या निर्णयातील तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे काय, अशी विनंती करू शकतो. क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे दोषींना मिळणारा अखेरचा अखेरचा कायदेशीर अधिकार असतो. सर्वसाधारणपणे न्यायमूर्तींच्या दालनात (चेंबर) क्युरेटिलव्ह पिटीशनवर सुनावणी होते. क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळल्यावर दोषींना कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत घेता येत नाही.

@@AUTHORINFO_V1@@