महाराष्ट्राच्या 'मिनी हिमाचल'चा 'रक्षक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020   
Total Views |

tiger_1  H x W:



नाशिकमधील उंबरठाण वनक्षेत्राला महाराष्ट्राचे ‘मिनी हिमाचल’ म्हटले जाते. या वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलणारे वन परिक्षेत्र अधिकारी संदीप अनिल जोपळे यांच्याविषयी...

 

मुंबई (अक्षय मांडवकर) -  अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागांमध्ये काम करणे म्हणजे, जीवाची जोखीम पत्करणे. त्यातही वनविभागाअंतर्गत अशा ठिकाणी वनसंवर्धनाचे काम करताना बरेचदा स्थानिकांचा रोष सहन करावा लागतो. मात्र, यावेळी निष्ठा आणि प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असते. वनाधिकार्‍यांमध्ये नाशिक पूर्वेकडील उंबरठाण वनपरिक्षेत्राला ‘मिनी गडचिरोली’, तर निसर्गप्रेमींमध्ये महाराष्ट्राचे ‘मिनी हिमाचल’ म्हटले जाते. अतिदुर्गम आणि संवेदनशील मानल्या जाणार्‍या या परिक्षेत्रात एक नवखेच वनाधिकारी जिद्दीने वनसंवर्धनाचे काम करत आहेत. आजवर केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्या गेलेल्या उंबरठाण वनपरिक्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी सकारात्मक उर्जेने नवे पाऊल उचलले आहे. सर्प बचावाच्या कार्याची पार्श्वभूमी असलेले महाराष्ट्राच्यामिनी हिमाचल’चे रक्षक म्हणजे वन परिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे.

 

tiger_1  H x W: 
 
 
 

जोपळे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील नवेनगर (पिंपळनेर) गावात दि. 10 डिसेंबर, 1989 रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक असल्याकारणाने जोपळे कुटुंबीय एका गावातून दुसर्‍या गावात स्थलांतर करत. वडिलांच्या बदल्यांप्रमाणे जोपळेंचे बालपण वेगवेगळ्या गावात गेले. साधारण सहावी-सातवीत असताना एका प्रसंगामुळे त्यांना सापांविषयी कुतूहल निर्माण झाले. एके दिवशी संदीप यांच्याजवळ धाकट्या भावाला सोडून त्यांचे आईवडील बाहेर गेले होते. धाकटा भाऊ खेळता-खेळता घराबाहेर पडला. त्यावेळी संदीपही त्याच्यापाशीच बसले होते. आई-वडील आल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, धाकटा भाऊ नागाच्या पिल्लाशी खेळत होता आणि त्याकडे संदीप कुतूहलाने पाहत बसले होते. हा प्रकार आईवडिलांनी पाहिल्यानंतर संदीप यांना मार तर बसलाच. मात्र, त्यांच्या मनात सर्प या प्राण्याविषयी कुतूहल निर्माण झाले. शालेय वयातच त्यांनी साप पकडण्यास सुरुवात केली. पुढे महाविद्यालयीन शिक्षणाकरिता ते पुण्यात आले.

 
 

पुणे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना जोपळेंच्या या सर्पप्रेमाला प्रोत्साहनच मिळाल्यासारखे झाले. महाविद्यालयाच्या आवारात सापांचा वावर असल्याने त्यांना पकडण्यासाठी जोपळेंनाच बोलावले जायचे. सापांना पकडण्यामध्येच ते गुंतलेले असायचे. या सापांना सोडण्यासाठी ते कात्रज प्राणीसंग्रहालयात जात असत. त्यावेळी तिथल्या सर्परक्षकांनी त्यांना साप कसे पकडावे आणि हाताळावे याविषयी मार्गदर्शन दिले. महाविद्यालयाच्या त्या तीन वर्षांत जोपळेंनी जवळपास 70 ते 80 सापांना जीवदान दिले. 2012 साली कृषीशास्त्रातून बी.एसस्सीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते राहुरीला पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. त्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळाला. मात्र, पुण्याहून सातत्याने सर्प बचावाकरिता त्यांच्याशी संपर्क साधला जायचा. अखेरीस पदव्युत्तर शिक्षणात मन न लागल्यामुळे त्यांनी सहा महिन्यांमध्येच अभ्यासक्रम सोडून दिला.

 

tiger_1  H x W: 
 
 

2013 साली जोपळेंनी पीएसआय प्रवेशप्रक्रियेकरिता अर्ज भरला. ते पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, शारीरिक परीक्षेमध्ये केवळ 2 मिमीने त्यांची उंची कमी पडली. मात्र, यावेळी खचून न जाता त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. 2014 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते वनविभागात दाखल झाले. 18 महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर 2018 मध्ये ते वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून रुजू झाले. जोपळेंना प्रथमच काम करण्याची संधी नाशिकमधील ब्हारे ईसीजी वनपरिक्षेत्रात मिळाली. त्या ठिकाणी तीन महिने काम केल्यानंतर जून, 2018 मध्ये त्यांची बदली नाशिक पूर्वेकडील उंबरठाण वनपरिक्षेत्रात झाली. उंबरठाण म्हणजे घनदाट जंगल, डोंगररांगा, शेजारी असलेले वासदा राष्ट्रीय उद्यान, सापुतारा गडकिल्ले, उंच धबधबे, गरम पाण्याचे झरे आणि निसर्गाने बहरलेला परिसर. इथल्या जंगलाकडे पाहिल्यावर ईशान्येकडील राज्यांमध्ये असलेल्या जंगलाची आठवण येते. परंतु, अतिदुर्गम आणि महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवर हा परिसर असल्याने अतिसंवेदनशील आहे. अशा विभागामध्ये काम करण्यासाठी सुरुवातीच्या काळात जोपळेंना तिथल्या लोकजीवनाशी आणि वातावरणाशी जुळून घ्यावे लागले.

 

tiger_1  H x W: 
 
 

अतिदुर्गम भागातील या प्रदेशात वनसंपत्तीच्या तस्करीचा विषय गंभीर आहे. मात्र, गेल्या दीड वर्षांत जोपळेंनी त्यावर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खैर आणि सागवान झाडांची तस्करी वेळीच रोखली आहे. तस्करांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही प्रसंग त्यांच्यावर बर्‍याचदा ओढवले आहेत. काहीवेळा ग्रामस्थांच्या विरोधाचाही त्यांना सामना करावा लागला. सीमेलगत हा परिसर असल्याने दोन राज्यांमध्ये होणार्या वनसंपत्तीच्या तस्करीवरही रोख लावण्यात त्यांना यश मिळत आहे. उंबरठाण हा निसर्गसंपदेने परिपूर्ण असा प्रदेश आहे. त्यामुळे या परिसरात निसर्ग पर्यटन सुरू करण्यासाठी जोपळे प्रयत्नशील आहेत. येथील पिंपळसोडमधील पाच पातळ्यांचा धबधबा, तातापाणी येथे गरम पाण्याचा झरा आणि पेंढारदेव येथील वनवासींचे देवस्थान हे निसर्ग पर्यटनाचे स्थान म्हणून विकसित करण्याचा निर्धार त्यांनी घेतला आहे. या सर्व कामांमध्ये जोपळेंना विभागीय वन अधिकारी आणि उप-वनसंरक्षकांचे साहाय्य मिळत आहे. वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळेच जोपळेंनी आज उंबरठाणविषयी असलेली नकारात्मकता दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै.’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@