मनजेत्ता ‘महाराष्ट्र केसरी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020   
Total Views |

manasa_1  H x W



महाराष्ट्र केसरीचा यंदाचा मानकरी ठरलेल्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याचा आजवरचा जिद्द आणि चिकाटीने भारलेला प्रवास त्याच्यासारख्या हजारो कुस्तीवीरांना मनाचे आणि मनगटाचे बळ देणारा आहे.



क्रीडा क्षेत्रात अनेकविध खेळांच्या स्पर्धा अगदी जगभरात होत असतात. त्यात सहभागी खेळाडूंना जय-पराजयाचा सामना हा करावाच लागतो. मात्र, आपल्याला मिळालेले यश अथवा अपयश आपण कसे साजरे करतो, यावरच त्या खेळाचे भवितव्य आणि खेळाडूची पुढील वाटचाल अवलंबून असते. जय किंवा पराजय हा कायमच क्षणिक असतो. शाश्वत असते ते तो स्वीकारण्याची पद्धती. नुकतीच ‘महाराष्ट्र केसरी’ ही कुस्तीची स्पर्धा पार पडली. यात विजयी ठरलेल्या हर्षवर्धन सदगीरची विजयी गदा स्वीकारण्याच्या कामगिरीपेक्षाही तो वेगळ्या अर्थाने सरस ठरला आहे. स्पर्धा संपल्यावर, निकाल घोषित झाल्यावर त्याने आपला प्रतिस्पर्धी शैलेश शेळके यास आपल्या खांद्यावर उचलून जी फेरी मारली, त्यामुळे हर्षवर्धन ‘मनजेत्ता’ ठरला आहे.


खेळात उत्तमाची आराधना ही केवळ कामगिरी सुधारण्यासाठी नव्हे, तर खिलाडू वृत्तीची जोपासना अंगी बळावण्यासाठी होणेदेखील अपेक्षित आहे. हेच हर्षवर्धनच्या या कृतीने अधोरेखित केले आहे.


बालेवाडी येथे ‘महाराष्ट्र केसरी’ झालेला हर्षवर्धन मुकेश सदगीर यांचे बालपण नाशिकजवळील भगूर येथे गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूरमधील स्वातंत्र्यसैनिक नरसिंहराव बलकवडे व्यायामशाळा हे त्याच्या मल्लआराधनेचे केंद्र ठरले. हर्षवर्धन सदगीरचे तसे मूळ गाव निसर्गाने संपन्न असलेले आणि महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसूबाई ज्या तालुक्यात आहे, त्या अकोले तालुक्यातील कोंभाळने हे आहे. मूळ गावाला मिळालेल्या या नैसर्गिक वरदानामुळेच त्याच्या ठायी जन्मत: निसर्गाप्रमाणे बहरलेपण आणि काळूबाईसम मनाची उंची निर्माण झाली असणार! वयाच्या दहाव्या वर्षी पाचवीत शिक्षण घेण्यासाठी मुळगाव कोंभाळने येथून हर्षवर्धन भगूर येथे दाखल झाला. भगूर नगरीत आल्यावर त्याने येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वातंत्र्यसैनिक नरसिंहराव बलकवडे व्यायामशाळेत बलोपासनेस सुरुवात केली. येथे त्याला व्यायामशाळेचे संचालक गोरखनाथ बलकवडे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विशाल बलकवडे हे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन बलोपासनेचे धडे गिरवू लागला. याच दरम्यान बलोपासना- कुस्ती प्रशिक्षण- शिक्षण अशी तिहेरी दिनचर्या हर्षवर्धन व्यतीत करत असे. त्याचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील ति. झ. विद्यामंदिर शाळेत पूर्ण झाले, तर अकरावी-बारावी देवळाली कॅम्प येथील भाटिया महाविद्यालयातून तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर हर्षवर्धनने पेठ तालुक्यातील करंजाळी येथे पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेत आपले पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.


जिद्द आणि चिकाटी या गुणांची शिदोरी जन्मत: प्राप्त झाल्याने आयुष्यात एक ना एक दिवस ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब आपण पटकवायचा चंग त्याने मनाशी बांधला होता. त्यासाठी हर्षवर्धनने भगूरचे सीमोल्लंघन करत थेट पुणे गाठले. येथे त्याने काका पवार यांची तालीम गाठत आपली आराधना सुरू केली.


भगूर येथे असताना हर्षवर्धन नियमितपणे पहाटे ४ वाजता उठत असे. उठून व्यायाम करणे, धावणे हा त्याचा नित्यक्रम. त्याचा फायदाच त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी झाला. भगूर येथे असताना गोरखनाथ बलकवडे व विशाल बलकवडे हे हर्षवर्धनकडून नियमितरित्या कुस्तीचा सराव करून घेत होते. पाचवीपासून ते बीएपर्यंत म्हणजे किमान १३ वर्ष हर्षवर्धन भगूरच्या व्यायामशाळेत राहिला. म्हणजेच कुस्तीप्रिय ते कुस्तीपटू हर्षवर्धन आणि आता ‘महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन घडविण्यात भगूरच्या व्यायामशाळेचे महत्तम योगदान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या काळात नित्यनियमाने व्यायाम आणि कुस्तीचा सराव करत असताना त्याला त्याचे मित्र राहुल कापसे, रमेश कुकडे, सुनील उमप, सौरभ दानी, रोहित अहिरे, विजय सुळे या मित्रांनी नेहमीच साथ दिली. कुस्तीचे धडे गिरवत असताना हर्षवर्धन लष्करातदेखील भरती झाला होता. परंतु, ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असल्याने काही काळ लष्करात देशसेवा केल्यावर हर्षवर्धन पुन्हा लाल मातीच्या ओढीने कुस्तीच्या रिंगणात शड्डू ठोकून उभा राहिला. २०१७ मध्ये ‘महाराष्ट्र केसरी’साठी मैदानात उतरलेल्या हर्षवर्धनला थोड्या गुणांमुळे ‘महाराष्ट्र केसरी’चा मान गमवावा लागला होता. परंतु, आता २०२० मध्ये हर्षवर्धनने आपले स्वप्न साकार केले आहे. त्याच्या या देदीप्यमान कामगिरीमुळे नाशिक जिल्ह्यासह स्वातंत्र्यसैनिक नरसिंह राव बलकवडे आंतरराष्ट्रीय व्यायामशाळेचे नाव महाराष्ट्रासह देशात गाजत आहे. घरची परिस्थिती तशी हलाखीची. हर्षवर्धनचे आईवडील शेती करतात. सोबत एक भाऊ आहे. हर्षवर्धन दहा वर्षांचा असताना भगूरला आला, त्यावेळी त्याचे वजन ३२ किलो होते. त्याला या ठिकाणाहून जाऊन पाच वर्षे झाली, त्यावेळेस त्याचे वजन ६५ किलो होते आणि आज हर्षवर्धनचे वजन ११२ किलो आहे.


शारीरिक वजन वाढविण्याबरोबरच आपले कर्तृत्वाचे वजनदेखील हर्षवर्धनने या काळात वाढविले. त्यातच प्रतिस्पर्ध्याच्या कडव्या झुंजीचे कौतुक करत त्याला आपल्या खांद्यावर घेऊन मिरविण्याचे संस्कार हे आगामी काळात हर्षवर्धनचे ‘माणूस’ म्हणून आणि ‘खेळाडू’ म्हणून वेगळे स्थान निर्माण करण्यास नक्कीच साहाय्यभूत ठरतील.

@@AUTHORINFO_V1@@