जिल्हा परिषदांच्या १०६ जागांवर भाजपचीच हवा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020
Total Views |
BJP _1  H x W:


धुळे जिल्हा परिषदेत भाजपची बाजी; नंदुरबारमध्येही भाजपच्या सर्वाधिक जागा

 

मुंबई : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी लागला व भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. नागपूर, वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार आणि पालघर या जिल्हा परिषदांसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदानाची मोजणी बुधवारी झाली. निकाल जाहीर होताच सर्व जिल्हा परिषदांचा विचार करता ३३२ जागांपैकी १०६ जागा जिंकून भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. या सहा जिल्हा परिषदांमध्ये गेल्या निवडणुकांमध्ये भाजपचे केवळ ५३ सदस्य होते. काँग्रेस ७० जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ४६ व शिवसेनेने ४९ जागा मिळवल्या आहेत. दरम्यान, धुळे जिल्हा परिषदेत एकूण ५६ जागांपैकी ३९ जागा जिंकत भाजपने प्रथमच एकहाती सत्ता मिळवली आहे, तर नंदूरबारमध्ये एकूण ५६ जागांपैकी २६ जागा जिंकत भाजप अव्वल ठरला आहे.

 

माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून जनतेचे आभार मानले आहेत.जिल्हा परिषदांसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एकूण ६६४ जागांपैकी १९४ जागा जिंकून तेथेही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस १४५ जागा, शिवसेना ११७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ८० जागा जिंकल्या आहेत.

 

प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे जिल्हानिहाय निकाल पुढीलप्रमाणे

धुळे : धुळे जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपची एक हाती सत्ता आली आहे. दोन पंचायत समित्या देखील भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ३९ जागा जिंकून धुळे जिल्हा परिषदेवर प्रथमच निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. धुळे जिल्ह्यातील चार पैकी दोन पंचायत समितीवर (शिरपूर, शिंदखेडा पंचायत समिती) भाजपचाच झेंडा फडकला आहे.

 

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून कोणत्याही राजकीय पक्षाला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. शिवसेना ज्या राजकीय पक्षांसोबत जाईल त्या पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेत सत्ता राहणार आहे.

 

पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली असून या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले. ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या ५७ तर आठ पंचायत समित्यांच्या ११४ जागांसाठी झाली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५७ पैकी शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस १४, भाजप १२, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ५, बहुजन विकास आघाडी ४, अपक्ष ३, तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

 

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे सर्व निकाल जाहीर झाले असून इथे कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. एकूण ५२ जागांपैकी सर्वाधिक १२ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला. तर काँग्रेस ९, शिवसेना ६ तर भाजपने ७ जागांवर बाजी मारली. त्यामुळे येथेही महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे.

 

अकोला : अकोला जिल्हा परिषदेचे सर्व निकाल जाहीर झाले असून इथे कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. एकूण ५३ जागांपैकी २२ जागांवर भारिपचा विजय झाला आहे. तर भाजप ७, शिवसेना १३, राष्ट्रवादी काँग्रेस ४ आणि काँग्रेसला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

 

नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या हातून सत्ता खेचून आणण्यात काँग्रेसला यश मिळाले आहे. इथे काँग्रेसला सर्वाधिक ३० जागा मिळाल्या आहेत. तर भाजप दोन क्रमांकावर आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून रोखण्यात काँग्रेसला यश मिळाले. राज्यातील नव्या समीकरणानुसार नागपुरात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@