सावधान! वणवा पेट घेत आहे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2020   
Total Views |

japa_1  H x W:



गतवर्षी धुमसणार्‍या अ‍ॅमेझॉननंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलातील वणवा एक कालरूपी राक्षस म्हणून सृष्टीसमोर उभा ठाकला. लाखो झाडांची राखरांगोळी झाली, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, कैक माणसे गेली, कोट्यवधी प्राण्यांचे जीव होरपळले. या प्रकोपाच्या विरोधात उभे राहण्यासाठी एक विकसित राष्ट्र असलेल्या ऑस्ट्रेलियाची प्रशासकीय व सरकारी यंत्रणा मात्र कमी पडली. जगभरात या घटनेचे छायाचित्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रार्थना केली जाऊ लागली. अखेर परमेश्वराने सार्‍यांची हाक ऐकली आणि पाऊस पडला, अशी भावना व्यक्त करण्यात आली. आग विझली. जे या अग्निदिव्यातून बचावले, त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण, हा वणवा खरंच विझला का? या वणव्यातील विकृत कृत्यांचे धगधगते निखारे पुन्हा पेट घेणार नाहीत, हे कशावरून? आज सातासमुद्रापार उठलेले हे आगीचे लोळ तुम्हा आम्हाला होरपळून टाकणार नाहीत याची खात्री आपण देऊ शकतो का?, भविष्यात हे संकट पुन्हा ओढवले तर त्याला रोखण्याची तयारी आपण केली आहे का, असे कित्येक प्रश्न त्या धुमसत्या निखार्‍यांसोबत अनुत्तरितच राहतात.


ऑस्ट्रेलियात आगी लावणार्‍यांवर कारवाई सुरू झाली आहे
, १८३ जणांवर खटला दाखल करण्यात आला आहे. स्वीनबर्न विद्यापीठातील फॉरेन्सिक बिहेवियरल सायन्सचे निदर्शक जेम्स ओग्लॉफ यांनी काढलेल्या निष्कर्षात ५० टक्के आग ही मुद्दामहून लावल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना आग लागलेली पाहण्यात मजा येते, वेळोवेळी जंगलात आग कशी लागेल, जंगल कसे भडकेल, ही माहिती ते वारंवार देत असतात. आग लावणार्‍यांमध्ये १२ वर्षांपासून २४ वर्षांपर्यंतची मुले आहेत. अगदी ६० वर्षीय वृद्धही आहेत. आत्तापर्यंत १२४ हून अधिक जणांना यात अटक करण्यात आली आहे. यातील ७० टक्के जण हे अल्पवयीन असल्याचे आढळून आले आहे. नोव्हेंबरनंतर धुमसणार्‍या या वणव्याने २५ जणांचा बळी घेतला, तर कोट्यवधी प्राण्यांनी आपला जीव गमावला. ऑस्ट्रेलियातील धूर आता ब्राझील आणि दक्षिणेकडेही पोहोचला. त्यामुळे याचे दुरोगामी परिणाम जसे ऑस्ट्रेलियातील लोकांना भोगावे लागतील, तसेच ते इतर देशांनाही जाणवतील, अशी भीती आहे.


याची सुरुवात म्हणजे
, ऑस्ट्रेलियातील दहा हजार जंगली उंटांना गोळ्या घालण्याचे दिलेले आदेश. दक्षिण ऑस्ट्रेलियात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने पीतजंतजतारा यनकुनितज्जतजरा लॅण्ड येथील १० हजार उंटांना शुटर्सद्वारे ठार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आगीमुळे संपलेला पाणीसाठा आणि त्याच्या दुष्परिणामांमुळे हा दुर्देवी निर्णय घेण्यात आला आहे. वातानुकूलित यंत्रणेतून (एसी) पडणारे पाणी आता लोक रोजच्या कामासाठी वापरत आहेत. अनेक घरांमध्ये उंट पाण्याच्या शोधात घुसत आहेत. एक उंट वर्षाकाठी एक टन मिथेन वायू उत्सर्जित करत असतो. तितकाच कार्बन डायऑक्साईडही. याचा अर्थ रस्त्यावर धावणार्‍या चार लाख गाड्यांचा अतिरिक्त भार यामुळे सहन करावा लागत आहे. मध्य ऑस्ट्रेलियात असे एकूण १२ लाख उंट आहेत. दर नऊ वर्षांनी ही संख्या दुप्पट होत असते. यावरून परिस्थिती किती भयानक होऊ शकते, याचा अंदाज येईल.


आग विझल्यानंतरची परिस्थिती आणखी भयानक आहे
. पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जनावरांना चाराच उपलब्ध नाही. आगीतून वाचलेले जीव आता उपाशीपोटी मरत आहेत. आगीत भस्मसात झालेली गावे सोडून लोकांनी शहरात धाव घेतली आहे. ५७ टक्के भूभाग हा दुष्काळग्रस्त घोषित झाला आहे. इवांस प्लेन येथील एका धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर उकाड्यामुळे दर आठवड्याला १.१ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. पावसाने आग विझवण्याऐवजी कुठलाच दिलासा दिला नाही. कांगारूंच्या नैसर्गिक वैभवसंपन्नतेची राखरांगोळी उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पुनर्निर्माणासाठी १ लाख अब्ज डॉलर्सची सरकारी मदत जाहीर केली.


जगभरातून मदतीचा ओघ सुरूच आहे
. प्रार्थना सुरूच आहे. आग विझेल, पुन्हा एकदा नंदनवन खुलेल, सृष्टी नव्याने बहरेलही. मात्र, आगी लावणार्‍यांच्या डोक्यात विकृतीची आग पुन्हा लागणार नाही, पुन्हा असा हाहाःकार माजणार नाही, याची जबाबदारी घेणारे कोणीच नसतील. हजारो जीव घेणारे लाखो वणवे असेच धुमसत राहतील.

@@AUTHORINFO_V1@@