दीपिका, आता तू पण...?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2020   
Total Views |

vedh_1  H x W:



‘आखों में तेरी अजबसी अजबसी अदा हैं’ म्हणत ‘ओम शांती ओम’मधून दीपिका तू या चित्रनगरीत अगदी परीसारखी अलगद अवतरलीस. तुझ्या त्या मादक अदांनी कित्येक तरुणांना पुरते घायाळ केले. तू अल्पावधीत ‘स्टार’ झालीस आणि बॉलीवूडवेडे प्रेक्षक तुझे जबरे फॅन्स! तू अभिनीत केलेली लावण्यवती मस्तानी असो वा मेवाडची शूर राणी पद्मावती, तुझ्या जिवंत अभिनयाने प्रत्येकाचीच मनं जिंकली दीपिका... ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘कॉकटेल’ आणि इतर बर्‍याचशा चित्रपटांमधून तरुणाईच्या मनात तू थेट हात घातलास. आपल्या अभिनय कौशल्याने थोरामोठ्यांची मनं जिंकून ‘दीपू’ झालीस. बॉलीवूडच्या दिग्दर्शकांच्या गळ्यातलं तू ताईत ठरलीस. कित्येक सन्मान, पुरस्कारांनी तुझ्या अभिनय कौशल्यावर शिक्कामोर्तबही झालं. रणवीरच्या प्रेमात पडून तू ‘पादुकोण’ची ‘सिंग’ झालीस. दीपिका, तुझं सगळं सगळं एवढं उत्तमोत्तम असताना तुला जेएनयुमध्ये जायची दुर्बुद्धी कशी सुचली कोणास ठावूक??


दीपिका
, तू जेएनयुमध्ये गेलीस, त्याचं दु:ख नाही. अगं; तुझ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग तो. त्याला झिडकारण्याचं कारणही नाही. पण, देशाचे तुकडे तुकडे करण्याची गरळ ओकणार्‍यांबरोबर तुला बघून खरंच वेदना झाल्या. मान्य की, तू तोंडातून एक चकार शब्दही काढला नाहीस, पण दीपिका, तुझं तिथं असणंच अनेकांना मनातल्या मनात राक्षसी सुखावून गेलं. आपली राडेबाजी, नारेबाजी आणि हिंदुत्वाची कब्र खोदण्याची भाषा जणू दीपिकालाही आवडली आणि म्हणून ती जेएनयुमध्ये अवतरल्याचा तो परमानंद त्या टोळीच्या चेहर्‍यावर सुप्तपणे झळकत होताच. दीपिका, तू तिथं जाऊन मारहाणीचा मूक निषेध केलास खरा, पण देशविरोधी कृत्यांचं माहेरघर ठरलेल्या जेएनयुत गेल्यामुळे तुझ्यावर चक्क पाकिस्तानातूनही शुभेच्छांचा वर्षाव झाला. एरवी भारतीय चित्रपटांना, अभिनेत्यांच्या नाचगाण्यांवर उठसूठ आसूड ओढणार्‍यांनी आज तुझ्यावर चक्क अभिनंदनाचा वर्षावच केला. किती ते त्यांना तुझं कौतुक. तुझ्या जेएनयुप्रवेशाच्या पाकिस्तानकडून आलेल्या शुभेच्छांबद्दल तुझे अभिनंदनच!!!


जेएनयुमध्ये जाणं हा तुझ्या उद्या प्रदर्शित होणार्‍या
‘छपाक’ सिनेमाच्या जाहिरातबाजीचा ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचंही कानावर आलं. पण, दीपिका, तुला केव्हापासून सिनेमा चालण्यासाठी अशा ‘स्टंट’ची गरज भासू लागली? इतरांसारखी दीपिका, तू पण...?



‘प्रमोशन’ की ‘इमोशन’?


दीपिका
, तुझे चित्रपट तसेही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करतात. मग फक्त ‘प्रमोशन’च्या खटपटीत तू असे ‘इमोशन’ गहाण ठेवशील, असं कधी वाटलं नव्हतं.


दीपिका
, तुझ्या बॉलीवूडच्या मित्रांच्या बोलण्यावरून बहकून जाणार्‍यांपैकी नाहीस. अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, विशाल ददलानी आणि तुझे इतरही बरेच बॉलीवूड सखे उघडपणे जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. त्यांचे हे असे केवळ विरोधासाठीचे विरोधप्रदर्शन म्हणा नवीन नाहीच. पण, आता त्यांच्या जोडीला तुझेही नाव जोडले गेले, याचीच खंत...


दीपिका
, तुला वाटलेही असेल की, तुझ्या जेएनयुत जाण्याने असे काय मोठे आभाळ कोसळले? का लोक तुझ्या उद्या प्रदर्शित होणार्‍या ‘छपाक’ चित्रपटावर एकाएकी बंदीची भाषा बोलू लागले? कारण, ‘रिल लाईफ’मध्ये रमलेली तू आजवर या ‘रिअल लाईफ अ‍ॅक्शन’चा हिस्सा कधी नव्हतीस आणि नेमका तुझा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तू या नाट्यात अगदी अनपेक्षितपणे उडी घेतलीस. तू असे का केलेस हे विचारुनही उपयोग शून्यच! पण, जेएनयुची पायरी चढण्याआधी तुला या विद्यापीठातील राष्ट्रघातकी करतुदींची, शिजणार्‍या कटांची खरचं माहिती नव्हती की ती असूनही तुला त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही, हे तुझे तुलाच ठावूक!


दीपिका
, आम्ही बुवा सामान्य माणसं. चार चुका केल्या तरी कोणी आमच्या पावलावर पाऊल ठेवणार नाही. पण, तू मोठी हिरोईन. तुझी कृती, वाणी मग आपसूकच नाही का तुझ्या चाहत्यांच्याही गळी उतरणार? शेवटी तू कितीही नाही म्हटलं तरी तरुणाईची तू ‘रोल मॉडेल’. मग आता तुझ्याच पावलांवर पाऊल ठेवून हे तरुणही जेएनयुची भाषा बोलू लागले तर? याचा विचार दीपिका तू केला असतास तर... तिथे त्या रात्री खरंच काय घडलं, कोणी घडवून आणलं याचा पोलीस तपास करायच्या आधीच तू तिथे जाऊन नेमकं काय साधलंस? काय संदेश दिलास?


दीपिका
, उद्या तुझा ‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित होईल. त्यात अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची तू भूमिका साकारली आहेस. एकीकडे अशा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील भूमिका पडद्यावर साकारणार्‍या तुला खर्‍या आयुष्यात मात्र विवेकाने निर्णय घेता आला नाही, याचाच खेद वाटतो.

@@AUTHORINFO_V1@@