चलो जलाएं दीप वहां...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |

page8_1  H x W:



गोरेगाव विभागाचा दि. २२ ते २५ डिसेंबर २०१९ रोजी श्रम संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण शिबिरार्थींची संख्या १५९ (२८ नगर व ६४ शाखांमधून) होती. निसर्गरम्य अशा टेटवली गावातील (जि. पालघर) एकूण तीन एकर परिसरामध्ये शिबीर आयोजित करण्यात आले होते.



शिबिराचा निरोप मिळाला, शिबीर ठरल्याप्रमाणे २२ डिसेंबरला भोजनोत्तर ३ वाजता सुरू झाले. नेहमीप्रमाणे शिबिराधिकारी, मुख्यशिक्षक व इतर शिक्षकांची ओळख करून दिली. गणांची रचना, साधारण वेळापत्रक या सगळ्यांची माहिती दिली गेली व या शिबिराची प्रस्तावना देण्यात आली. शिबिराच्या नावातील ‘श्रम संस्कार’ याचा शाब्दिक अर्थ न घेता ‘श्रम म्हणजे नैसर्गिक व नि:स्वार्थ बुद्धीने केलेली सेवा हा संस्कार मनात रुजवणे’ हे या वर्गाचे उद्दिष्ट आहे आणि एखादे समाजकार्य/सामाजिक कार्य आणि श्रम/सेवा यातील अंतर लक्षात घेऊन आपला व्यवहार असावा, हा विचार शिबिरार्थींना देण्यात आला.


संध्याकाळी पहिले संघस्थान
/शाखा ५.३० वाजता सुरू झाले. गणातील इतरांची तोंडओळख हळूहळू झाली. संघस्थानानंतर ७ वाजता सुमंत आमशेकर (मूळ गोव्याचे स्वयंसेवक, मरिन इंजिनिअर, पूर्वी पूर्वांचल येथे प्रचारक, आता कोकण प्रांत प्रचारक) यांनी सायं बौद्धिक सत्र घेतले. विषय होता ‘भारत के सामने वैचारिक समस्याएं.’ चर्चेनेसुरुवात झाली. त्यामुळे अनेकांनी स्थानिक व देशपातळीवरील समस्या सांगितल्या व मग सुमंतजींनी मूळ विषय घेतला की, सर्व समस्यांमध्ये एक प्रमुख बाब आहे की, विरोधक नेहमी पहिल्यांदा संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे संभ्रम दूर करायचा हा समस्या सोडवण्याचा पहिला मार्ग आहे. अब्दुल कलामजी त्यांच्याकडे येणार्‍या विशेष अतिथींना एक ऑस्ट्रेलियात प्रिंट झालेले कॅलेंडर दाखवायचे व त्यांना सांगयचे, याची विशेषता ही आहे की, हे प्रिंट जरी ऑस्ट्रेलियाने केलेले असेल तरी यात असलेली सर्व छायाचित्रे भारतीय उपग्रहांनी काढलेली आहेत. ऑस्ट्रेलियात प्रिंट झाले यामुळे लोकांचा विश्वास बसायचा. पश्चिमी देशातील तात्कालिक परिस्थिती आणि विचार यामुळे काही शब्द रूढ झाले की, आपल्या विचारधारेत त्याला स्थान नाही. तरी त्यावरून आपल्याकडे काथ्याकूट होऊन संभ्रमित वातावरण निर्माण केले जाते. शाखेतील कार्यक्रमांतर्गत वैचारिक चिंतन ठीक झाले पाहिजे आणि सांघिक प्रज्ञेतून आपण प्रज्वलित झालो पाहिजे.


बौद्धिक सत्रानंतर भोजन झाले व ९
:३० वाजता रजनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. गणशः प्रत्येकाला एक चिट्ठी दिली की, ज्यात ग्रामीण भागातील एखाद्या विक्री करण्यायोग्य वस्तूचे नाव होते उदा. गवत कापण्याचे मशीन, गोमूत्र, बांबूची टोपली. १० मिनिटे वेळात त्या उत्पादनाची जाहिरात तयार करायची आणि मग एकेका गटाने तीन मिनिटांमध्ये त्या जाहिरातीचे सादरीकरण करायचे. खूपच छान अनुभव आला. मुळात कुठल्याही उत्पादनाची जाहिरात करताना हे उत्पादन कशासाठी उपयुक्त आहे, हे उत्पादनच का विकत घ्या आणि याची उपलब्धता कुठे आहे, असे विषय मांडावे लागतात. त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील समस्या, तेथे निर्माण होऊ शकणारी उत्पादने आणि त्याची शहरात विक्री करण्यासाठी नवीन युगातील तंत्र या सगळ्यांचा अभ्यास झाला आणि एक वेगळीच दिशा मिळाली. त्यानंतर दीपनिर्वाण आणि शुभरात्री!


२३ डिसेंबर -

प्रातः ४.४५ वाजता शंखनादाने उठवण्यात आले (कित्येक महिन्यांनी अशी पहाट बघितली). ५.४५ ला एकात्मता स्तोत्र आणि मग ६ ते ७.३० संघस्थान. तद्नंतर न्याहरी झाली. प्रत्येक गटात टेटवली गावातील एक गावकरी आला आणि त्यांनी आपण जाणार्‍या ठिकाणी काय काम करायचे ते सांगितले. कुणाला पाटबंधारे बांधण्याचे काम होते, कुणाला वृक्ष संवर्धनासाठी जायचे होते, कुठे गवत कापणी, कुठे धान्य झोडपणी तर कुठे गोसेवा. माझ्या गटाला किरण लेले यांच्या बुरोंडा येथील गोसंवर्धन प्रकल्पाला जायचे होते. ते शिबीरस्थानापासून १५ किलोमीटरवर असल्यामुळे आम्ही माझ्याच गाडीने गेलो.


तेथे गेल्यावर किरणजींनी प्रकल्पाची माहिती दिली आणि आमचे पुन्हा तीन गट केले
. दोन तास गटाने आलटून पालटून काम करावे, अशी सूचना दिली. आमच्या गटाला पावल्या (भात झोडपणी झाल्यावर उरलेल्या पेंढ्याच्या गड्ड्या) लावण्याचे काम होते. पावल्या गोलाकार रचनेत एकत्र गच्च उभारणे जेणेकरून गाईंना जेव्हा चारा लागेल तेव्हा एक-एक पावली काढता येईल. आम्ही काम जोशात सुरु केले आणि थोड्यावेळाने पेंढा अंगावर घासून घासून अंगाला खाज सुटायला लागली. पावल्याची रचना जशी उंच होऊ लागली तसे आत उभे असलेल्यांना बाहेर यावे लागले. हे करत असतानाच काहींनी गाईंना चारापाणीही दिले. तासभर काम झाल्यावर किरणजींनी कामाची अदलाबदल केली. आमच्या गटाला कापणी वा खुरपणी तसेच काही नवीन लागवड केलेल्या झाडांना पाणी घालणे अशी कामांची विभागणी केली. ही कामे साधारण अर्धा तास केली व आम्ही किरणजींच्या सूचनेनुसार काम थांबवले. त्यांच्या पडवीत हातपाय धुवून बसलो (तरीही अंगाची खाज काही जात नव्हती). आम्हाला कोकम सरबत व गोड शिरा असे छान सरप्राईज मिळाले. ते आटोपल्यावर त्यांनी शेजारील वाडीत नेले. जैवविविधतेबद्दल माहिती दिली व बहावा, चंदन, चिंच, सीताफळ, पेरू, चिकू, आवळा, केळी अशी अनेक फळझाडे व विविध फुलझाडे दाखवली. त्यानंतर आम्ही पुन्हा शिबीरस्थानी आलो. आज आमच्या गटालाच भोजन वितरणाचे काम होते, पण पोटात कोकम आणि शिरा असल्यामुळे काही चिंता नव्हती. भोजनानंतर तासभर विश्रांती होती आणि मग २:३० बौद्धिक सत्र होते. ठाण्यातील राजेश कुंटे यांनी हे सत्र घेतले आणि त्यात ‘तथ्य और भ्रम’ असा विषय मांडला. १९५० सालचा Immigration Act पासून ते २००४ पर्यंत झालेल्या विविध कायद्यातील सुधारणा यावर पूर्ण माहिती दिली. आर्टिकल १४, एनआरपी, एनआरसी यावरही प्रकाश टाकला. थोडक्यात, आम्हाला झोपेतून जागे केले. त्यानंतर चहापान व सायं संघस्थान झाले.


सायं ७:३० वाजता ग्रामविकास या विषयावर चर्चासत्र होते. सुदैवाने सकाळी आम्ही ज्यांच्या घरी गेलो ते किरण लेले हेच सत्र घेत होते. संघाच्या सेवा विभागात २००४ पासून ‘ग्रामविकास’ असा एक वेगळा विभाग सुरू झाला. त्यांनी खूप वेगवेगळे विषय मांडले. ग्रामविकास करताना गावातील सप्त संपदांचा विचार व्हावा - भूसंपदा, जलसंपदा, वनसंपदा, गोसंपदा व अन्य जीवसंपदा, ऊर्जासंपदा व जनसंपदा. या संपदा व्यतिरिक्त पंचशक्ती (मातृशक्ती, युवाशक्ती, धार्मिक शक्ती, सज्जनशक्ती व संघशक्ती) असतात की, ज्यांचा उपयोग ग्रामविकासासाठी होऊ शकतो.


ग्रामविकास करताना व्यक्तिकेंद्रित विकास नसावा (उदा. राळेगणसिद्धी) तर सर्व सहभागातून असावा (उदा. बारीपाडा - कुणीही भूमिहीन नाही ८५ कुटुंबांनी मिळून ५ भूमिहीन कुटुंबाना भूमी दिली. प्रत्येक घरात बैलजोडी, सेंद्रिय शेती, रानभाजी महोत्सव, तांदळाचे पूर्ण बुकिंग होते , स्वयंरोजगार - मोहाचे तेल, शेजारील पाच गावांना पाणी पुरवठा). ज्या स्वयंसेवकाना स्वतःचे गाव आहे. त्यांनी गावाला गेले पाहिजे. गावात उद्योग निर्माण झाल्यास ते शहराकडे वळणार नाहीत. गावातील समरसतेसाठी एक पाणवठा, एक स्मशान, एक मंदिर असे राबवता येईल का ते पाहणे, या सत्रानंतर रात्रीचे भोजन झाले.


भोजानोत्तर रजनी कार्यक्रमात गिरगावातील माधव बर्वे यांनी राष्ट्रीय कीर्तन करत पूर्वरंगात ‘देव देश धर्म, भक्ती हेच कर्महे गीत आळवत उत्तरार्धात चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध हा इतिहास रंगवला. सुरुवातीला त्यांनी कीर्तनाचे ‘नारदीय (मूळ), वारकरी आणि रामदासी’ असे तीन प्रकारांची माहिती दिली. कीर्तनानंतर आरती झाली आणि वातावरण अतिशय मंगलमय झाले. रात्रीचे १०.४५ झाले होते, पण त्यारात्री ११.३० ते २.३० असे शिबिराचे रक्षण आमच्या गटाकडे होते. अर्धातास पाठ टेकली इतकेच आणि ११:१५ ला शिक्षकांनी हाक मारल्यावर टोपी आणि दंड घेऊन रक्षणास सिद्ध झालो. सुदैवाने माझे रक्षण भोजन कक्षाच्या बाजूला असल्यामुळे शिक्षकांच्या बरोबरीने मलाही रात्री २.३० च्या सुमारास दूध हळद मिळाले. रक्षणही संपत आले होते, थंडीत गरम गरम दुध मिळाल्यामुळे राहुटीत येऊन कधी झोप लागली कळलेच नाही.


आरोग्य व नेत्रचिकित्सा शिबिरासाठी बोरिवलीतून तीन डॉक्टरांची टीम आली होती. टेटवली गावातील लोकांना आरोग्य सेवा जवळ उपलब्ध नाहीत. पालघर किंवा विक्रमगडला जावे लागते. त्यामुळे हे शिबीर टेटवली ग्राम पंचायत ऑफिसमध्ये घेतले. या शिबिराचा २२५ च्या वर लोकांनी लाभ घेतला. जवळपास ६० लोकांना चष्मा देण्यात आला आणि पुढील महिनाभराच्या अवधीत २२ लोकांच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचे नियोजन केले. काही म्हातार्‍या लोकांना आरोग्य शिबिरापर्यंत चालत येणे शक्य नव्हते. अशांना स्वयंसेवकांनी आपल्या वाहनाने आणले व पुन्हा घरी सोडलेही. पूर्ण दिवसभर हे शिबीर चालू होते. आमच्या गणला पाटबंधारे आणि धान्य झोडपणी अशी दोन कामे आली होती. परत आल्यावर कडाडून भूक लागली होती, पण आज जेवणाचा वेगळाच अनुभव होता. भोजन मंत्र झाल्यापासून ते आपल्या राहुटीमध्ये जाईपर्यंत कुणी बोलायचे नव्हते. ‘मौन भोजन.’ कुणाला काही हवे असल्यास त्याने खुणेने सांगायचे ! खरंच न बोलता जेवता येते आणि उत्तम जेवण होते !!


भोजन विश्रांतीनंतर पुढील बौद्धिक सत्र दुपारी २.४५ ला सुरू झाले. हे सत्र संघ, संघ स्वयंसेवक आणि सेवा या विषयावर होते आणि मूळ इंदौरचे प्रचारक आणि आता अखिल भारतीय सेवा प्रमुख पराग अफझलकर यांनी प्रश्नोत्तरे आणि संवाद या माध्यमातून घेतले. सेवेमध्ये ‘तात्कालिक सेवा’ (उदा. भूकंप, पूर, अग्नितांडव या प्रसंगावेळी केलेली मदत)की, जो आपला संपूर्ण समाज उत्स्फूर्तपणे करत असतो तरी आपण संघटित असल्यामुळे आपली मदत मोठ्या पातळीवर आणि नियोजनबद्ध असते. समाजाला खरी गरज आहे, ती समाजाच्या गरजा (शिक्षण, आरोग्य, रोजगार, अन्ननिवारा इ.) भागवण्यासाठी मिळणारी सेवा. अशी सेवा देण्यासाठी आपण खूप लांब जाण्याची गरज नाही. आपल्या आसपासच्या परिसरातील सामाजिक गरजा लक्षात घेऊन तेथेच सेवाकार्य उभे केले पाहिजे. ती सेवा देताना पूर्णपणे नि:स्वार्थी असावी म्हणजे सेवा दिली की, त्या क्षेत्रातील लोक शाखेत येतील, ही अपेक्षाही न करता सेवाकार्य करावे.


तद्नंतर चहापान आणि मग सायं संघस्थान झाले. त्यानंतरचे बौद्धिक सत्र उदय कुलकर्णी यांनी घेतले. विषय होता सामाजिक समरसता. सामाजिक समरसता हा एक व्यवहाराचा किंवा अनुभवाचा विषय आहे आणि तो मनात रुजला पाहिजे. ‘समता ही कायद्याने येऊ शकते, पण समरसता मनात भाव असेल तरच येऊ शकते.’ याची सुरुवात आपण परिवारापासून करू शकतो आणि मग हळूहळू समाजातही याचा प्रयोग करू शकतो. आपल्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या चुकीच्या अत्याचाराचे प्रायश्चित्त आपण घेण्याची मानसिकता असेल तर समरसतेची कृती सहजभावाने होईल. सायं सत्र संपल्यावर रात्रीच्या भोजनासाठी आज आणखी एक प्रयोग होता. आजचे जेवण ‘खडा भोजन’ होते आणि जेवण ताटलीत नाही तर हातावर घेऊन खायचे. बाजीराव आपले जेवण बर्‍याचदा घोड्यावरच जेवत असे म्हणून गंमतीने या जेवणाला नाव दिले ‘बाजीराव जेवण!’ आणि मेनू होता तांदळाची भाकरी आणि झुणका. भाकरी आसपासच्या वनवासी बांधवांच्या घरी बनून आली होती. बर्‍याच ‘यंगस्टर्स’ न वाटत होते हे कसे जमणार, पण प्रत्यक्ष सुरुवात केल्यावर लक्षात आले रोज अर्धा तास लांबणारे जेवण १५ मिनिटांत फत्ते, शिवाय ताट-वाटी, भांडे काहीच धुवायचे नसल्यामुळे पाण्याची बचत. ही केवळ शिबिरातील विविधता नव्हती, पण लाईफ लेसन्स होते !


आजचा रजनी कार्यक्रमाचा विषय होता लोककला. ज्या वनवासी बंधूंच्या घरून आलेल्या भाकर्‍या आम्ही खाल्ल्या तेच वनवासी बंधू आमच्यापुढे त्यांचे लोकनृत्य सादर करणार होते. जवळपास ७०/८० महिला पुरुष , लहान मुले/मुली यात सहभागी झाली होती. त्यांनी पहिल्यांदा ‘तारपा’ हे नृत्य सादर केले. साधारण दिवाळीत हे नृत्य केले जाते. दुधीपासून बनवलेल्या एका लांब पुंगीसारख्या वाद्याच्या तालावर हे नृत्य चालू होते. १५/२० मिनिटे उलटल्यावर तरुणाईचा जोश त्यांना नुसते स्वस्थ बसून देत नव्हता. शिक्षकांच्या परवानगीने एक के एक जण अंगणात उतरले, त्यांना विशेष जमत नव्हते पण तेथील लोकांबरोबर ‘तारपा’ नृत्य करायला मिळाले, यातच तरुणाई खूश होती. त्यानंतर त्यांनी ‘गौरी’ हे ढोलाच्या नादावर चालणारे साधारण गणपतीच्या वेळी हा नृत्यप्रकार सादर केला. काही जणांनी याही नृत्यात उत्साहाने भाग घेतला. साधारण १०.३० ला हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. गावकर्‍यांनी शुभरात्रीचा संदेश देत आमचा निरोप घेतला.


झोपतानाच शिक्षकांनी सूचना दिली. आपले रक्षण ४:३० ला आहे. त्यामुळे ४ वाजताच उठावे लागेल. ४ ला जाग आलीच ४.३० ते ६.३० रक्षण झाले आणि चहा पिऊन संघस्थानावर गेलो. सगळ्या गणांच्या मिळून ६ नवीन टीम केल्या आणि किल्ले शोधणे हा एक मोठा सांघिक खेळ शिक्षकांनी समजावून सांगितला. तासभर हा खेळ उत्साहात पार पडला व नंतर लगेचच समारोप सुरू झाला. तीन दिवस आम्ही जे गीत पाठ करत होतो. त्यांचे सांघिक प्रात्यक्षिक झाले. ज्या सरपंच व ग्रामसेवकांचा हे शिबीर यशस्वी करण्यात हातभार लागला. त्यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर समारोपाचे बौद्धिक झाले. संपूर्ण श्रमसंस्कार शिबिराचा एकप्रकारे आढावाच घेतला. केलेल्या श्रमाचे अंदाजे आर्थिक मूल्यमापन केल्यास साधारण ४० हजार इतके झाले. सामुदायिक आणि संघटित प्रयत्नातून काय साकारू शकते, यासाठी त्यांनी विवेकानंदांच्या स्मारकाचे उदाहरण दिले. कुणाकडूनही १ रुच्या वर देणगी न घेता जवळपास ६७ लाख एवढा निधी जमवण्यासाठी ६७ लाख लोकांचे हातभार लागले. ग्रामविकास, समाजासमोरील आव्हाने आणि ती पेलण्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाने आपल्या रुचीप्रमाणे वेगवेगळ्या विभागात काम केले पाहिजे, अशी आशा व्यक्त करून त्यांनी आपले दोन शब्द संपवले. त्यानंतर ज्यांना अधिक वेळ होता ते शिबिराचे तंबू व राहुट्या काढण्याच्या कामाला लागले. मीही या कामात सहभागी झालो. तीन दिवसांच्या सुखद आठवणी बरोबर घेऊन शिबीरस्थान सोडले, ते थेट गोरेगावला ! मनात मात्र ध्येय उमलले आहे

चलो जलाए दीप वहां..

जहाँ अभी भी अंधेरा है..

- अजित वर्तक

@@AUTHORINFO_V1@@