वंचिततेचा गाळ ते आभाळ भरारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020   
Total Views |


saf_1  H x W: 0


'नाही रे' गटाचे जगणे आयुष्याचा प्राणच, पण परिस्थितीवर मात करत डॉ. रघुनाथ केंगार यांनी वंचिततेचा गाळ तुडवत स्वत:च्या आणि समाजाच्या आयुष्यालाही अर्थ आणला आहे. त्याचा हा मागोवा...


दर्द-दुख सहते सहते,

सुख बांटने लगे हम

छाले ही मिले राह में,

राह को मंजिल दिलाने लगे हम

 

डॉ. रघुनाथ केंगार यांचे आयुष्य असेच म्हणावे लागेल. केंगार कुटुंब मूळ नरवणे तालुका, साताऱ्याचे. पण काही कामानिमित्त ते गोमेवाडी, सांगलीला स्थायिक झाले. अण्णा आणि तानुबाई केंगार या होलार समाजाच्या दाम्पत्याला तीन मुले. दोन मुले, एक मुलगी. त्यापैकी एक रघुनाथ. घरात दारिद्य्र पाचवीला पुजलेलेच. अण्णा, आई आणि लहान मुलेही मजुरी करायची. कितीतरी दिवस असे यायचे की कुणालाही मजुरीचे काम मिळत नसे. कधी कधी तर अगदी तीन-तीन दिवसही घरात चूल पेटत नसे. मग तानुबाई गावातल्या शेतकऱ्यांकडे जात, पोरांसाठी काही खायला मागत. गावगाड्यात शेतकरी त्यांच्या 'जित्राब' म्हणजे पाळीव प्राण्यांसाठी त्यांच्या गोठ्याजवळ एक कणगी ठेवत. त्या कणगीमध्ये उरल्या-सुरल्या शिळ्या भाकऱ्या टाकत. कित्येक महिने त्या कणगीत भाकऱ्या टाकल्या जात. त्यांना बुरशीही आलेली असे. त्या भाकऱ्या गुरे आवडीने खात. रघुनाथ यांच्या आई त्या कणगीतून भाकऱ्या काढून घरी आणत. त्या भाकऱ्या पाण्याने खळखळून धुवून त्यांच्यावर मीठ टाकून त्या भाकऱ्या शिजवत. तेच या भुकेलेल्या मुलांचे पूर्णान्न. दिवसाला अर्धी भाकरी खायला मिळणे म्हणजे दिवाळी. याही परिस्थितीमध्ये अण्णांना वाटे की, मुलांनी शिकावे. शिकली तर जगतील. त्यामुळे पाचवीनंतर मुलांना सांगलीच्या वसतिगृहामध्ये शिकायला पाठवले. गोमसेवाडी ते सांगलीच्या डॉ. बापट विद्यार्थी वसतिगृहात १४० किलोमीटर अंतर अण्णा आणि त्यांच्या मुलांनी पायी पार केले. शाळेचा गणवेश, इतर वस्तू घेण्यास पैसे हवे होते. अण्णा आणि तानुबाईंनी घरातली उरलेली पितळेची भांडी विकली. त्यातून मुलांना शाळेचा गणवेश घेतला. सांगलीत आल्यावर रघुनाथ यांना नवे जग दिसले. मात्र, गावात हाकाटी पिटली की खायला-प्यायला देता येत नाही म्हणून अण्णा केंगारने मुलांना सरकारी शाळेत टाकले. कशाला वाद आणि निंदा म्हणून अण्णा पत्नी, मुलीसह मुलाच्या वसतिगृहापाशीच राहायला आले. गावाबाहेर कसेबसे राहत. मोलमजुरी करू लागले. यात एक समाधान होते की, मुलगा डोळ्यांसमोर होता.

 

इथून पुढे रघुनाथ 'सद्गुरू गाडगे महाराज हायस्कूल' कुसूर-कऱ्हाडच्या वसतिगृहामध्ये शिकू लागले. ही रयत शिक्षण संस्थेची शाळा. तिथे महाविद्यालय, डी.एड महाविद्यालय वगैरे होते. अशा वातावरणात रघुनाथ यांना वाचनाचाछंद जडला. त्यांच्या जाणिवा जागृत झाल्या. आपल्या आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी आयुष्य दावणीला लावले आहे, आपण शिकलेच पाहिजे, हा ध्यास मनात रूतून राहिला. नापास झालो तर शिक्षण थांबेल, खायला, राहायला मिळणार नाही, ही भीतीसुद्धा होतीच. या परिस्थितीत ते दहावी उत्तीर्ण झाले. रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील शिक्षकही देवमाणसेच. गरिबाचे पोर दहावीनंतर काय करणार? शिक्षकांनी रघुनाथ यांना सांगितले, "आपले डी.एड कॉलेज आहे. तिथे प्रवेश घे." शिक्षकांनी सांगितले म्हणून त्यांनी डी.एडसाठी प्रवेश घेतला. पुढे डी.एड पूर्ण केल्यानंतर जवळ जवळ एक वर्ष नोकरीसाठी वणवण हिंडले, पण नोकरी मिळाली नाही. वय वर्षे अठराच असेल. पण निराश झाले नाही. कारण, आयुष्यात बाकी काहीच नव्हते, होती ती फक्त एक जिद्द, स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठीची. अशातच मग वाई तालुक्यातील गुळूम गावच्या शाळेतच नोकरी लागली. नोकरी लागल्यावर थोडे स्थैर्य आले. अण्णा आणि तानुबाईंच्या कष्टांचे चीज झाले. रघुनाथ यांनीही एम. ए. मराठीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात ते साहित्य, सामाजिक चळवळ यामध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागले. याच दिवसांमध्ये ते प्रा. शिवाजी भोसलेंचे व्याख्यान ऐकायला गेले. व्याख्यान आवडले म्हणून ते शिवाजीरावांना सांगू लागले. शिवाजीरावांनी डोळे किलकिले करून रघुनाथयांना नाव-गाव विचारले. शिवाजीराव म्हणाले, "एम. ए. झालास? महाविद्यालयात नोकरी करणार? चल, फलटणला नोकरी आहे." रघुनाथ यांना त्याच दिवशी ते स्वत:च्या गाडीतून फलटणला घेऊन गेले. 'मुधोजी कॉलेज, फलटण' येथे नोकरी मिळवून दिली. पुढे रघुनाथ 'वेणुताई चव्हाण महाविद्यालया'त नोकरीस लागले. हे सगळे करत असताना त्यांनी 'शाहीर यादव यांचे पोवाडे', 'सदाचार अर्थात नैतिक मूल्यांचे शिक्षण', 'डॉ. आंबेडकर आणि डॉ. नेल्सन मंडेला' ही साहित्य संपदा निर्माण केली. 'शाहीर हैबती : व्यक्ती, वाङ्मय आणि विचार' या विषयात डॉक्टरेट केली.

 

समाजाची दशा त्यांनी स्वत: अनुभवली होती. होलार समाजाच्या कार्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये होलार समाजाचे संघटन केले, संस्था उभी केली. दलित महासंघ संस्थेची स्थापना केली. गरजू, गरीब आणि होतकरू मुलांना शैक्षणिक मदत सुरू केली. समाजातील शिक्षणाचा टक्का वाढावा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सरकार दरबारी होलार समाजाचे दु:ख पोहोचावेयासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या कार्याची दखल समाज घेत होता. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, दिल्ली, बंधुत्व पुरस्कार, शाहीर हैबती पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, आदर्श समाजभूषण पुरस्कारही मिळाला. त्यांनी भारतीय राज्यघटना संरक्षण समिती, पहिले राज्यव्यापी दलित साहित्य समाजसेवा संमेलन, चौथे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संमेलन, राज्यव्यापी लोककलाकार परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच पहिल्या लोककला साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत. वेणूताई चव्हाण महाविद्यालय, कऱ्हाड येथे सहयोगी प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख (पदव्युत्तर विभाग) आहेत. अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली पी.एचडी आणि संशोधन करत आहेत. वंचिततेच्या गाळातून त्यांनी घेतलेल्या आभाळभरारीचे कौतुक आहे.

@@AUTHORINFO_V1@@