जेएनयूमध्ये पुन्हा अराजकता पसरविण्यामागचे सूत्रधार डावे…?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


'जेएनयू'तील नक्षली प्रवृत्तींच्या मागे डाव्यांचा हात ?

 

नवी दिल्ली : नव्या शैक्षणिक सत्रासाठी नावनोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर डाव्या संघटनांनी हल्ला घडविला. नोंदणीप्रक्रीयेवर बहिष्कार टाकण्याचे डाव्या संघटनांचे आंदोलन फसल्याने त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे हिंसाचाराचा अवलंब केला, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आला. हे डाव्यांचे नियोजनबद्ध षडयंत्र असून अभाविप त्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे अभाविपतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि वाद हे समीकरण आता नवीन राहिलेले नाही. दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणावरून विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्ष होत असतो. त्याचप्रकारचा संघर्ष रविवारीही विद्यापीठात घडला. त्या प्रकारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना जबाबदार असल्याचा आरोप तात्काळ करण्यात आला. मात्र, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्याचे खंडन करीत नेमका घटनाक्रम समोर मांडला. तो घटनाक्रम समजून घेतल्यास डाव्यांनी आपल्या अराजकतावादी प्रवृत्तीनुसार जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचे समोर आले. अभाविपचे राष्ट्रीय माध्यम संयोजक राहुल चौधरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

 

असा सुरू झाला वाद...

 

शुल्कवाढीचा विरोध करण्यासाठी डाव्या संघटनांनी ते आंदोलन सुरु केले होते. विद्यार्थ्यांचा विरोध पाहून प्रशासनानेही शुल्कवाढ मागे घेतली होती. मात्र, वसतीगृहाच्या शुल्कात करण्यात आलेल्या वाढीचा निषेध म्हणून जेएनयूएसयूने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ स्टुडंट युनियनने (जेएनयूएसयू) २४ नोव्हेंबर रोजी सत्रांत परिक्षेवर (सेमीस्टर एग्झाम) बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनास बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देण्याचे नाकारले. त्यानंतर डाव्या संघटनांनी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकविणे, त्यांचे वर्ग बंद पाडणे असे प्रकार करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परिक्षा देण्याचा पर्याय दिला, त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित डाव्यांच्या दहशतीस झुगारून दिले.

 

परिक्षेनंतर नव्या सत्राच्या नोंदणीसाठी १ ते ५ जानेवारीचा कालावधी देण्यात आला होता. त्या नोंदणीवरही डाव्या विद्यार्थी संघटनांनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. विद्यापीठ प्रशासनाने ३ जानेवारी रोजी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली, त्याला मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून डाव्या संघटनांनी नोंदणी करण्यासाठीचा सर्व्हर आणि वायफाय यंत्रणेची तोडफोड करीत गोंधळ घातला आणि नोंदणी प्रक्रियेवर कब्जा केला. नव्या सत्रासाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विनाकारण वेठीस धरण्यास आले. अभाविप ने या प्रकाराचा निषेध केला, त्यानंतर ४ जानेवारी रोजी नोंदणी सर्व्हर आणि वायफाय यंत्रणा दुरूस्तीचे काम सुरू झाले. यावेळी अभाविप कार्यकर्त्यांशी डाव्या संघटनांची पुन्हा बाचाबाची झाली. त्याचवेळी नव्या सत्राच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता आपले आंदोलन फसल्याची जाणीव डाव्या संघटनांना झाली होती. त्यामुळे रविवारी म्हणजे ५ जानेवारी रोजी जवळपास २०० ते ३०० लोक तोंडाला मास्क लावून नोंदणी सुरू असलेल्या ठिकाणी दाखल झाले आणि नोंदणी प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना आणि नोंदणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करू लागले. विद्यापीठ परिसरातील पेरियार, साबरमती आणि माही मांडवी या वसतीगृहांमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना लोखंडी रॉड, काठ्या या साधनांनी मारहाण करण्यात आली. मात्र, या सर्व प्रकाराला अभाविप जबाबदार असल्याचे जे चित्र रंगविण्यात आले आहे, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

 

या सर्व प्रकारात डाव्यांचे वर्चस्व असणारी जेएनयूएसयू आणि सर्व डाव्या संघटना सहभागी असल्याचा आरोप राहुल चौधरी यांनी केला आहे. ते म्हणाले की, विद्यापीठातील शैक्षणिक कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यापीठ प्रशासनास अभाविप पूर्ण सहकार्य करणार आहे. जेएनयूएसयूला विरोध करायचा असेल तर त्यांनी तो करावा. मात्र, त्यांनी आपले आंदोलन सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर थोपविण्याचा प्रयत्न करू नये. तसा प्रयत्न झाल्यास अभाविप त्याचा प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. दीर्घकाळ डाव्यांचे वर्चस्व असणाऱ्या जेएनयूमध्ये नेहमीच अराजकाची स्थिती निर्माण होत असते. खरे पाहता दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीच्या शहरात विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात दर्जेदार शिक्षण जेएनयूमध्ये मिळते. मात्र, डाव्या संघटना विद्यापीठास आपली खासगी मालमत्ता समजून नेहमीच वेठीस धरत असतात. राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करणे, डाव्या विचारसरणीशिवाय अन्य विचारसरणी मानणाऱ्यांवर हल्ले करणे, संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरूचे समर्थन करणे असे प्रकार विद्यापीठात नेहमीच घडत असतात. या विद्यापीठाकडे राजकीय खेळणे म्हणून बघण्याचा दृष्टीकोन डावे पक्ष बाळगत असतात. डावे पक्ष आज भारतात निष्प्रभ ठरत आहेत, त्यामुळे आपले अस्तित्व दाखविण्यासाठी ते विद्यापीठे आणि विद्यार्थ्यांचा वापर करीत आहेत काय, याविषयी विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

 
 

मास्कधारी हल्लेखोर डाव्या संघटनांचेच

 

ओळख पटू नये म्हणून आपला चेहरा लपविण्याची पद्धत ही डाव्यांमध्ये आहे. अभाविप कोणत्याही देशविरोधी कृत्यात सामील नसते, त्यामुळे आम्हाला चेहरा लपविण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे रविवारी झालेल्या प्रकारात मास्कधारी हल्लेखोर हे डाव्या संघटनांचे कार्यकर्ते होते. आमच्याकडे तसे पुरावेही आहेत, असा दावा राहुल चौधरी यांनी केला.

 

राजकीय नेते विद्यापीठात तात्काळ कसे दाखल झाले ?

 

जेएनयूमध्ये रविवारी झालेला प्रकार पूर्वनियोजित होता. कारण गोंधळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच तेथे वृंदा करात, योगेंद्र यादव आणि अन्य पक्षांचे नेते दाखल झाले. त्याचप्रमाणे देशभरातही विविध ठिकाणी आंदोलने सुरु केली. हे सर्व एकाएकी कसे घडू शकते ?. त्याचप्रमाणे काही प्रसारमाध्यमांनीदेखील एकांगी वृत्ते दाखवित डाव्या संघटनांच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष केल्याचेही राहुल चौधरी यांनी सांगितले.

 

आयषी घोष हल्ल्याची सूत्रधार ?

 

जेएनयूएसयुची अध्यक्षा आयषी घोष हीच हल्ल्याची सूत्रधार असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. अभाविपच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर एक व्हीडिओ प्रसारित करण्यात आला आहे. त्यामध्ये एक मुलगी मास्कधारी गुंडांना विद्यापीठ परिसरात घेऊन येत असल्याचे दिसत असून ही मुलगी म्हणजे आयषी घोष असल्याचा दावा अभाविपने केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@