सत्तेच्या हव्यासाचा पहावासा 'धुरळा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020   
Total Views |


asf_1  H x W: 0

 


सध्याच्या घडीला राजकारण म्हणजे एकमेकांवर कुरघोडी करणे, मग ते कसेही का असेना. कट-कारस्थाने, डावपेच आणि सत्तेसाठी वाटेल ते... अशी अनेक उदाहरणे सध्याच्या घडीला काही नवीन नाहीत. अशामध्ये २०२० या वर्षाच्या सुरुवातीलाच 'धुरळा' सारखा राजकीय विषय मोठ्या पडद्यावर येतो. सध्या राजकीय परिस्थितींमध्ये चपखलपणे बसणार धुरळा हा चित्रपट अनेक गोष्टींमुळे लक्षात राहतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणच आढावा हा चित्रपट देऊन जातो. परंतु, या चित्रपटाची खासियत म्हणजे सत्तेच्या हव्यासापोटी नात्यांमध्ये होणारी धांदल आणि त्याचे परिणाम हा चित्रपट पुन्हा एकदा अधोरेखित करतो. याआधीही मराठी, हिंदी भाषेमध्ये असे अनेक चित्रपट येऊन गेले आहे. हिंदीमध्ये 'राजनीती' हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर हा चित्रपट त्या पठडीतला वाटतो. सरपंच पदाच्या खुर्चीसाठी घरच्यांनी केलेल्या राजकीय खेळ्या आणि त्यामधून त्यांचे आपापसातल्या नात्यामधील होणारे खच्चीकरण यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो.

 

थोडक्यात काय आहे हा चित्रपट ?

 

बरेच वर्ष सरपंच पदाच्या खुर्चीवर असलेले निवृत्ती उभे यांचे चित्रपटाच्या सुरुवातीला निधन होते. त्यानंतर सुरु होतो खरा राजकारणच 'धुरळा'. उभे परिवाराच्या विरोधी असलेला हरीशभाऊ गाढवे (प्रसाद ओक) हा सरपंचपदाच्या खुर्चीही हाव करतो. त्यासाठी तो फिल्डिंगही लावायला सुरुवात करतो. तर इकडे उभे परिवारामध्ये त्या खुर्चीचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरून उभे परिवारामध्ये फूट पडते. निवृत्ती उभे यांचा थोरला मुलगा नवनाथ उभे दादा (अंकुश चौधरी) हा राजकारणातील अलिखित नियमाप्रमाणे सरपंचपदाच्या खुर्चीचा उत्तराधिकारी म्हणून दावा करतो. पण, निवृत्ती यांची पत्नी आणि नवनाथची सावत्र आई अक्का (अलका कुबल) देखील आता राजकारणाच्या 'धुराळ्या'मध्ये सक्रिय होतात.

 

मुलाचा विरोध पत्करून सुनैना बाबर यांच्या धूर्त चालीमने त्या राजकारणाच्या आखाड्यात उतरतात. दुसरीकडे उभे कुटुंबातील मधला मुलगा हणमंत उभे आणि (सिद्धार्थ जाधव) त्याची पत्नी मोनिका (सोनाली कुलकर्णी) देखील राजकारणात उडी मारते. यामध्ये घरामध्येच सरपंच पदाच्या शर्यतीत तिरंगी लढत होते. पण या लढतीत कुचंबणा होते ती म्हणजे नवनाची बायको हर्षदाची (सई ताम्हणकर). या लढाईमध्ये नवनाथचा छोटा भाऊ निलेश (अमेय वाघ) कसा वजीराची भूमिका कसा निभावतो? या गोष्टीचा अंत कसा होतो? आणि अखेर या लढाईमध्ये को जिंकत? हे पाहणे रंजक आहे.

 

हा चित्रपट का पाहावा?

 

हलक्याफुलक्या गोष्टी हाताळल्यानंतर दिग्दर्शक समीर विद्वंस हा राजकीय विषयही तितक्याच समर्पकपणे मांडतो. लेखक क्षितिज पटवर्धन यांची लेखणीही तेवढीच समर्पक वाटते. उत्कंठा वाढवणाऱ्या राजकीय खेळी, धक्का देणारे सत्य आणि चटका लावणारा अंत... असा मनोरंजक मसाला या चित्रपटामध्ये ठासून भरला आहे. यामध्ये विशेष आकर्षित करतात ते नव्या तंत्रज्ञानाचा केलेला वापर जो आताच्या घडीच्या राजकारणामध्ये चपखल बसतो. तसेच, अभिनयामध्ये प्रत्येक पात्र हे वास्तवाशी मिळते जुळते वाटते. अलका कुबल, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रसाद ओक आणि श्रीकांत यादव यांचा अभिनय अगदी नैसर्गिक वाटतो.

 

परिस्थितीला साजेसा अभिनय केल्यामुळे कथा मनात रुजून राहते. तसेच, अमेयचा भावज्या, सिद्धार्थचा सिमेंट शेठ आणि प्रत्येक पात्र लक्षात राहते. तसेच, काही मिनिटे पडद्यावर आलेले पण महत्वाचा भाग असणारे उमेश कामत, उदय सबनीस आणि प्रियदर्शन जाधव हे देखील लक्षात राहतात. याचे संगीतदेखील उत्तम झाले आहे. यामधील काही संवाद चखळपणे त्या त्या प्रसंगांमध्ये बसवण्यात संवाद लेखकांना यश आले आहे. यासाठी खास संवाद लेखकांचे कौतुक करायलाच हवे. यामधील काही प्रसंग अगदी उत्तम जमले आहेत. जसा आयोजित केलेल्या शर्यतीच्या स्पर्धेमध्ये विजेत्या ट्रॉफीचा प्रसंग, त्यानंतर सई ताम्हाणकरचा पहिल्या प्रचाराचा सिन असे अनेक प्रसंग आहेत जे लक्ष खेचून घेतात. त्यामुळे या 'धुरळ्या'चा अनुभव मोठ्या पडद्यावर घेण्यास हरकत नाही.

@@AUTHORINFO_V1@@