मुंबईला गरज आत्मचिंतनाची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


तब्बल ४१ वेळा रणजी क्रिकेट स्पर्धेचा विजेता असणाऱ्या मुंबईच्या संघाला सलग दुसऱ्यांदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. घरच्याच मैदानावर सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारण्याची नामुष्की मुंबईच्या संघावर ओढवली. मुंबईसारखा बलाढ्य संघ आणि ४१ वेळा रणजी क्रिकेट स्पर्धेचा विजेता असणारा हा संघ सध्या घरच्याच मैदानावर विजयासाठी झगडत आहे. विद्यमान मुंबईच्या संघात क्षमता नाही, असा भाग नाही. मात्र, ताळमेळ व्यवस्थित जमत नसल्याने मुंबईचा संघ उत्तम कामगिरी करण्यात अपयशी ठरत असून खेळाडूंना सध्या आत्मचिंतनाची गरज असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे. १९३४-३५ साली भारतात सर्वात आधी क्रिकेटचे रणजी सामने खेळविण्यास सुरुवात झाली. आत्तापर्यंत ८४ वेळा ही स्पर्धा भारतात खेळविण्यात आली असून ४१ वेळा मुंबईने विजयी होण्याचा मान मिळवला आहे. एकूण ४६ वेळा मुंबईने अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले आहे. मुंबईशिवाय अन्य कोणत्याही एका संघाला विजयाचा दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. मुंबईनंतर कर्नाटकने आठवेळा, दिल्लीने सातवेळा तर वडोदरा संघाने पाचवेळा ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला आहे. मात्र, त्यांची सरासरी जिंकण्याची टक्केवारी फारच कमी आहे. ८४ वर्षांच्या इतिहासात मुंबई संघाची जिंकण्याची सरासरी ८९.१० टक्के इतकी आहे. इतर सर्व संघांची टक्केवारी ६० च्या आतच आहे. त्यामुळेच रणजीच्या विश्वात मुंबईचा संघ हा राजा मानला जातो. मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. या मुंबईने क्रिकेट विश्वाला काही असे खेळाडू दिले की, ज्यांचे विक्रम अद्याप कुणालाही मोडता आलेले नाही. अनेक विश्वविख्यात खेळाडू या मुंबईच्या संघातच घडल्याचा इतिहास आहे. त्यामुळे मुंबईचा संघ हा नेहमी बलाढ्य मानला जातो. या बलाढ्य संघाचा रणजी क्रिकेट स्पर्धेतील इतिहासही मोठा आहे. सर्वाधिकवेळा ही स्पर्धा जिंकण्याचा मान या संघाला मिळाला असून या संघातील अनेक खेळाडूंनी भारताच्या मुख्य संघात प्रवेश करण्याचाही मान मिळवला आहे. मात्र, या संघाला सध्या विजयासाठी झगडावे लागत आहे. म्हणूनच संघाने सध्या आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत अनेक समीक्षक व्यक्त करत आहेत.

 

दिलदार इरफान...

 

भारतीय संघाचा माजी तेज गोलंदाज इरफान पठाण याने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली. ३५ वर्षीय इरफानने आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. मात्र, निवृत्त होताना इरफान पठाणने जे सामंजस्य दाखवले ते खरंच प्रशंसनीय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण इरफानप्रमाणेच गेल्या सात-आठ वर्षांपासून फॉर्मशी झुंजत असलेल्या अनेक वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारताना आपल्या माजी सहकारी, कर्णधार आणि प्रशिक्षकांविषयी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविली होती. परंतु, इरफानने मात्र तसे काहीच केले नाही. ज्या प्रशिक्षकामुळे इरफान पठाणचे अख्खे क्रिकेट करिअर संपुष्टात आले, असे आरोप अनेक क्रिकेट समीक्षकांनी केल्यानंतरही निवृत्ती स्वीकारताना इरफानने संबंधित प्रशिक्षकांना दोष देण्यात काही अर्थ नसल्याचे सांगत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला. इरफान आधी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग, माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर या सर्वांनीही अलीकडेच निवृत्ती स्वीकारली. मात्र, या सर्व खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारताना आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसह निवड समितीविरोधात काहीशी नाराजी व्यक्त केली होती. इरफानने मात्र प्रशिक्षकांना दोष न देता माजी सहकाऱ्यांची स्तुती करण्यावरच भर दिला. त्याचे हे वागणे कौतुकास्पद असून इतर खेळाडूंनीही यातून प्रेरणा घेण्यासारखे आहे. २००७ साली विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध पराभवाची नामुष्की ओढवलेल्या भारतीय संघाने तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांची तत्काळ हकालपट्टी केली. या विश्वचषक स्पर्धेनंतर २००८ या संपूर्ण वर्षात झालेल्या सर्व प्रकारच्या सामन्यांत इरफान पठाणला संधी मिळाली होती. काही सामन्यांत त्याने उत्तम कामगिरी केली. मात्र, काहीवेळा त्याला स्वतःचा फॉर्म सिद्ध करताना झगडावे लागले. म्हणूनच २००८ मधील श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यानंतर भारतीय संघातून त्याला डच्चू देण्यात आला. त्यानंतर इरफान स्वतःचा फॉर्म सिद्ध करू शकला नाही. रणजी ट्रॉफी, आयपीएल, घरगुती क्रिकेट सामने यांमध्येही त्याला स्वतःचा फॉर्म सिद्ध करता आला नाही. अखेर निवृत्ती पत्करण्याचा त्याने निर्णय घेतला. आपला फॉर्म नसल्याचे त्याने मान्य करत निवृत्ती स्वीकारली आणि निवृत्ती जाहीर करताना त्याने कोणालाही दोष दिला नाही, हे विशेष...

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@