सकारात्मकतेचे विष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


एक प्रकारच्या जबाबदारीचा भार आपल्या डोक्यावर येतो. हा भार किती जड आहे, या जाणिवेने आपण सकारात्मकतेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनात त्यामुळे एक तीव्र नकारात्मक भावना निर्माण होते. त्या अर्थाने ही सकारात्मकता आपल्याला विषारी वाटायला लागते. त्याला 'टॉक्सिक पॉझिटीव्हीटी' (Toxic Positivity) असे म्हणतात.


या पृथ्वीतलावर सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असे नाही. त्या आपल्या मनासारख्या व्हायलाच पाहिजे असेही नाही. शिवाय बऱ्याच गोष्टी या जगात जशा भासतात तशा त्या नसतात. त्यामुळे अनेक वेळा आपण आनंदाच्या जवळ पोहोचता पोहोचता अचानक आपल्यासमोरून तो गायब झालेलादिसतो. सर्वसामान्यपणे आपण असे पाहतो की, आपल्या अथक प्रयत्नांनंतरही आनंद वा सुख आपल्यापासून दुरावतानादिसते. आपल्याला जाणवत असेल वा नसेल, पण कळत नकळत आपण सगळेच शेवटी आनंद शोधण्याच्या वा मिळवण्याच्या मागे असतो. तो आनंद आपल्या संसारात रमण्याचा असेल, करिअरमध्ये प्रमोशन मिळवायचा असेल, घर सजवायचा असेल, मुलांना शिक्षण देण्याचा असेल... आपण त्यासाठी मात्र धावत-पळत असतो हे खरे. अर्थात, हे आपले आयुष्य आहे. शेवटी ते माणसाचे आयुष्य आहे आणि आपण मरेपर्यंत त्या आयुष्याच्या कवचात अडकलेले आहोत एवढे खरे. अशावेळी आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो. तो म्हणजे, आपण कशा प्रकारे या जीवनाला अर्थपूर्ण बनवायचे? आनंदी बनवायचे? तसे पाहिले, तर आपण सुखाच्या मागे का धावतो, या प्रश्नाची पार्श्वभूमी वरील सवालात आहे. पण, आपल्या मनात आणखी एक प्रश्न उभा राहतो जेव्हा आपल्यासमोरची मंडळी आनंद हवा म्हणून ओरडून ओरडून सांगतात, पण तो आनंद मिळावा म्हणून समर्पक प्रयत्न मात्र करताना दिसत नाहीत. त्यांना अनेक गोष्टी आणि करामती सुखप्राप्तीसाठी करायच्या असतात, पण त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. ते प्रयत्न करण्याची त्यांची तयारी नसते. किंबहुना ते तो आनंद प्राप्त करण्याऐवजी त्याचा विरोध करतानाच दिसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे परीक्षेत आपल्याला अव्वल गुण मिळावेत, अशी मनीषा बाळगणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यास मात्र, बिल्कूल करायचा नसतो. किंबहुना, जो अभ्यास करायला सांगेल त्याचा विरोध करायचा. याचा अर्थ आपण आनंदी असले पाहिजे, ही त्याची इच्छा खोटी आहे का?

 

'सकारात्मक दृष्टि' हा आनंद मिळवण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. आपण सकारात्मक असलो की, आपल्या आयुष्यातील अवघड वा कठीण प्रसंगातूनसुद्धा आपण सहिसलामत मार्ग काढतो. आपल्या दु:खी भावनेतून आपण सहज बाहेर पडतो. आपण आनंदाची इच्छा करतो, पण सकारात्मक दृष्टिकोनाच्या विरोधात जातो तेव्हा असे विक्षिप्त वागण्याचे कारण काय, हे समजून घेणे आवश्यक आहे. ते समजून घेतले तरच आपण खऱ्या आनंदाच्या दिशेने मार्गाक्रमण करू शकू. जेव्हा जेव्हा आपण सकारात्मक वृत्तीचा स्वीकार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्याकडे नसलेल्या अनेक गोष्टी उभ्या राहतात. आपल्या जगण्याचा हेतू, आंतरिक शांती, समाधान व आनंद या गोष्टी आपल्याकडे नाहीत हे आपल्या लक्षात येते. सकारात्मकतेची जाणीव आपल्याला आपली अपूर्ण स्वप्ने, वाईट सवयी, मनातली अनेक कृतींविषयीची अपराधीपणाची भावना, आपले अपुरे व्यक्तिमत्त्व या सगळ्या गोष्टी ज्यामुळे आपण जीवनात अयशस्वी झालो त्या गोष्टींची आठवण करून देते. सकारात्मकता ही तशी सुंदर वृत्ती आहे. ज्यामुळे आपण असाध्याला साध्य करण्याची प्रेरणा बाळगतो, पण त्याचवेळी ती आपल्याला अनेक गोष्टी आपल्यामध्ये विकसित केल्या पाहिजे, याची जाणीव करून देते. त्यामुळे या भावनेमुळे आपल्याला आपल्यात अनेक बदल घडवायला पाहिजेत आणि बऱ्याच गोष्टी कमवायला पाहिजेत, याची जागरुकता मनात अस्वस्थता निर्माण करते. आतापर्यंत आपल्या अपयशांसाठी आपण जगाला दोष देत असू, पण सकारात्मक प्रवृत्ती आपल्याला आपलेचकटू सत्य दाखवते.

 

आता आपल्या आयुष्यातील अपयश आणि नकारात्मकतता यांचा भार आपल्या खांद्यावर घ्यायला पाहिजे, ही जाणीव आपल्याला अस्वस्थ करते. एक प्रकारच्या जबाबदारीचा भार आपल्या डोक्यावर येतो. हा भार किती जड आहे, या जाणिवेने आपण सकारात्मकतेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनात त्यामुळे एक तीव्र नकारात्मक भावना निर्माण होते. त्या अर्थाने ही सकारात्मकता आपल्याला विषारी वाटायला लागते. त्याला 'टॉक्सिक पॉझिटीव्हीटी' (Toxic Positivity) असे म्हणतात. याच्याहीपेक्षा जास्त घातक आहे ते म्हणजे मनात नकारात्मक भाव असताना जगाला दाखवायला म्हणून सकारात्मक मुखवटा घालायचा, अशा प्रकारे स्वतःमधील नकारात्मकता नाकारणे आयुष्यासाठी प्रचंड विध्वंसक गोष्ट आहे. अशा सकारात्मकतेच्या ढोंगामुळे व्यक्तींच्या जीवनात आणि जगात किती अपायकारक गोष्टी होत असतील, याची कल्पनाच करता येत नाही. यामुळे जगात शांती आणि आनंदाचा र्‍हास होत राहतो. म्हणूनच सकारात्मक भाव व वृत्तीचे सत्य आणि ढोंग आपल्याला ओळखला आले पाहिजे.

 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@