
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी धुमाकूळ घातला. चेहरे झाकलेल्या गुंडांनी विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झाले. दरम्यान, हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केल्याचा आरोप करण्यात आला होता, मात्र अभाविपने सर्व आरोप फेटाळलेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या या हल्ल्याबाबत देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही या घटनेवर तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपला राग व्यक्त केला. “आपले राजकारण काय आहे हे महत्त्वाचे नाही. आपली विचारधारा काय आहे याने काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही भारतीय असाल तर अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेऊ नये. जेएनयूत ज्यांनी हल्ला केला त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी”, अशी मागणी महिंद्रा यांनी केली.
It doesn't matter what your politics are. It doesn't matter what your ideology is. It doesn't matter what your faith is. If you're an Indian, you cannot tolerate armed, lawless goons. Those who invaded JNU tonight must be traced & hunted down swiftly & given no quarter...
— anand mahindra (@anandmahindra) January 5, 2020
विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातही उमटू लागले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला तर पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरले.