राहुल-प्रियांकांनी दंगली घडवल्या : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2020
Total Views |

Amit Shah _1  H

 


नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी काँग्रेसवर बरसले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी तसेच सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करून दंगली घडवल्या असा गंभीर आरोप त्यांनी रविवारी केला. काँग्रेससोबतच त्यांनी यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कडाडून टीका केली.

 

दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये शाह यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, "नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार आहेत. या कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जनतेची दिशाभूल केली आणि दंगली घडवून आणण्याचे काम केले. १९८४मध्ये शीखविरोधी दंगल झाली. समाजातील अनेक नागरिकांच्या हत्या झाल्या. काँग्रेसच्या सरकारने पीडितांना दिलासा दिला नाही. मोदी सरकारने प्रत्येक पीडित व्यक्तीला पाच-पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिली. जे दोषी होते, त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले," असे शाह यांनी यावेळी सांगितले.

 

पाकिस्तानमधील ननकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याच्या घटनेवरूनही शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. केजरीवाल, राहुल आणि सोनिया गांधी यांनी डोळे उघडे ठेवून बघावे. पाकिस्तानने ननकाना साहिबसारख्या पवित्र स्थळावर हल्ला करून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत, असे शाह यावेळी म्हणाले.

 

केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र

शहा यांनी दिल्ली सरकारवरही तोफ डागली. केजरीवाल यांनी दिल्लीसाठी काय केले ते सांगावे. २० महाविद्यालये सुरू करण्यात येतील असे सांगितले होते, कुठे गेली महाविद्यालये? पाच हजारांहून अधिक शाळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. चश्मा लावूनही शाळा दिसल्या नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

@@AUTHORINFO_V1@@