‘द प्राईड ऑफ इंडिया’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


mansa_1  H x W:



१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ज्यांचा पराक्रम सुवर्ण अक्षरात कोरला गेला, असे भारतीय वायुसेनेतील सेवानिवृत्त अधिकारी विजय कर्णिक यांच्या शौर्यगाथेवर एक नजर...


विजय कर्णिक भारताच्या वायुसेनेतील सेवानिवृत्त विंग कमांडर आहेत
. त्यांच्या शौर्याची गाथा आठवते ते म्हणजे १९७१मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी भारतीय वायुसेनेत दिलेल्या योगदानामुळे. त्यांच्या याच शौर्यगाथेवर आधारित ‘भुज-द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट येत आहे. ज्यात विजय कर्णिक यांच्याच इच्छेनुसार अजय देवगण विजय कर्णिकांची भूमिका साकारणार आहे.



धाडसी विंग कमांडर विजय कर्णिक यांचा जन्म
६ ऑगस्ट १९४६ रोजी नागपूर येथे झाला. सध्या विजय कर्णिक यांचे वय ७२ वर्षे आहे. त्यांचे वडील श्रीनिवास कर्णिक हेदेखील निवृत्त सरकारी अधिकारी होते, तर आईचे नाव ताराबाई कर्णिक. त्यांना तीन भाऊ आहेत. हे तिघेही भारतीय सशस्त्र सैन्यदलात सेवा देत आहेत. त्यांचे दोन भाऊ विनोद कर्णिक मेजर जनरल आहेत, तर लक्ष्मण कर्णिक डब्ल्यूजी, सीडीआर आहेत. याशिवाय तिसरा भाऊ अजय कर्णिक वायुसेनेतील ‘एअर मार्शल’ आहे. विजय कर्णिक यांच्या एकुलत्या एका बहिणीचे नाव वासंती. २५ फेब्रुवारी, १९६५ मध्ये विजय कर्णिक यांचा विवाह उषा यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगी आणि मुलगा आहे. त्यांची मुलगी शलाका कर्णिक ही नाटककार आहे, तर मुलगा परेश ‘टाईम्स ग्रुप’मध्ये मीडिया प्रोफेशनल आहे. खरंतर हा संपूर्ण परिवारच देशसेवा करता आहे ही गोष्ट अभिमानास्पदच! विजय कर्णिक यांचे शालेय शिक्षण नागपूरमधून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी स्थानिक महाविद्यालयात विज्ञान शाखेतून आपले शिक्षण पूर्ण केले. आपले पदव्युत्तर शिक्षण राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून पूर्ण करताच ते भारतीय लष्करात भरती झाले. किशोरवयीन असतानाच त्यांना देशसेवा करायची तीव्र इच्छा होती. ते २६ मे, १९६२ मध्ये भारतीय वायुसेनेत वायुसेना अधिकारी म्हणून भरती झाले. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान त्यांना स्क्वाड्रन लीडर करण्यात आले. त्यानंतर १९६५च्या भारत-पाक युद्धातही त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.



किशोरवयातच त्यांनी दोन महत्त्वपूर्ण कामगिरी पार पडल्या होत्या
. परंतु, १९७१ चे युद्ध कर्णिकांच्या एकूण कारकिर्दीत तसे महत्त्वपूर्ण ठरते. कारण, १९७१ च्या भारत-पाक युद्धात कर्णिक भुज एअर बेसमध्ये ‘बेस कमांडर’ होते, जे एक महत्त्वाचे आणि जबाबदार पद होते. कराची नष्ट करणे हे त्यांचे ध्येय होते. विमानतळ, पेट्रोलियम डम्प आणि नेव्ही डॉक्स हे त्यांचे लक्ष्य होते. ३ डिसेंबर, १९७१ रोजी युद्ध सुरू झाले आणि त्याच रात्रीपासून भारतीय वायुसेनेने कराचीवर हल्ला करण्यास सुरवात केली. पाकिस्तानी वायुसेनेला भुज एअर बेस नष्ट करायचा होता, म्हणून त्यांनी ४ डिसेंबरनंतर दर रात्री भुजवर बॉम्बहल्ला केला. मोठ्या भडिमारानंतरही भुजचे नुकसान झाले नाही. ६ डिसेंबरच्या रात्री भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी ‘बी-५५’ बॉम्बरला उडवण्यात यश मिळविले. त्यानंतर पाकिस्तानने भुजवरील हल्ल्यात वाढ केली आणि ९ डिसेंबरची रात्र काळरात्र ठरली. पाकिस्तानने आठ हल्लेखोर पाठवले आणि भुज धावपट्टी पूर्णतः नष्ट केली.



परंतु
, युद्धाच्या वेळी हवाई तळ सलग कार्यरत ठेवणे फार महत्त्वाचे आहे. भुज हवाई तळ उद्ध्वस्त झाला आणि निरुपयोगी झाला होता. हा युद्धाच्या वेळी सर्वात मोठा धक्का होता. त्यावेळी धावपट्टी दुरुस्त करण्यासाठी वेळही नव्हता आणि माणसेही नव्हते. पण कर्णिक यांनी हार न मानता गावातील लोकांची मदत घेण्याचे ठरवले. युद्धाच्या दरम्यान संपूर्ण देश देशभक्तीने प्रेरित होता व आपणहून देशासाठी काहीतरी करू इच्छित होता. याच प्रेरणेने माधापूर गावातील ३०० महिला मदतीसाठी पुढे आल्या. कर्णिक यांच्या सूचनेनुसार त्यांनी एक नवे रेकॉर्ड करत म्हणजेच दोन दिवसांमध्ये धावपट्टी दुरुस्त केली व भुज एअर बेसची पुन्हा उभारणी केली. युद्धाच्या वेळी धावपट्टी दुरुस्त करणे ही अत्यंत शौर्याची कृती होती. आपल्या जीवाची पर्वा न करताही या महिला ठाम राहिल्या. यासाठी त्यावेळेस त्यांना प्रेरणा देणारे केवळ एकच ते म्हणजे पथक प्रमुख विजय कर्णिक. हे हवाई तळ सक्रिय होताच पुन्हा भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरू ठेवले. अखेरीस तो ‘विजय दिन’ आला जेव्हा पाकिस्तानच्या पूर्वेकडील कमांडने सुमारे ९० हजार पाकिस्तानी सैनिकांसह आत्मसमर्पण केले.



पुढे इंदिरा गांधी सरकारनेही या महिलांचा
झाशीची राणी’ अशी उपमा देत गौरव केला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या, “प्रारंभी भारताकडे केवळ एक झाशीची राणी होती. आज भारताकडे ३०० झाशीच्या राणी आहेत.” महिला सक्षमीकरणाबाबत विजय कर्णिक कायमच आग्रही राहिले. विजय कर्णिक यांची भारतीय वायुसेनेतील ओळख शौर्य आणि व्यवस्थापनासाठी आहे. १४ ऑक्टोबर, १९८६ मध्ये त्यांनी आपल्या कार्यातून निवृत्ती घेतली. त्यांना गोल्फ खेळायला आवडते. ते ‘लायन गोल्फ क्लब’चे सदस्य आहेत. विद्यमान लष्करप्रमुख नरवणे यांच्या कामाला त्यांचा पाठिंबा व समर्थन आहे. आपली व तेव्हा सहकार्य करणार्‍या महिलांची गौरवगाथा आता मोठ्या पडद्यावर साकारली जाणार असल्याचा आनंद विजय कर्णिक यांनाही असून एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणतात, “आम्ही त्यावेळी युद्ध लढत होतो. त्यादरम्यान एकाही महिलेचा मृत्यू होणं आमच्यासाठी नुकसानदायक होते. त्यामुळे मी योग्य व्यवस्थापन करून वेळीच निर्णय घेत गेलो. युद्धादरम्यान बॉम्बवर्षाव झाल्यास लपण्याच्या जागा आणि बचावाच्या क्लृप्त्या याबाबत योग्य मार्गदर्शन केल्याने आम्ही यशस्वी होऊ शकलो. मला त्या सर्वच धाडसी महिलांचा अभिमान आहे.” भारतीय सैन्यदलात मोलाचे योगदान देत 1971च्या युद्धात भारतीय सैन्यात मोलाची कामगिरी बजावणार्‍या या लढवय्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!

@@AUTHORINFO_V1@@