फुलपाखरांचा 'शिक्षक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020   
Total Views |

tiger_1  H x W:


पेशाने शिक्षक असूनही केवळ निसर्गप्रेमाची आवड म्हणून आपल्या खासगी जागेत फुलपाखरू उद्यानाची निर्मिती करून जगाला त्याचे दर्शन घडविणार्या राजेंद्र रमाकांत ओवळेकर यांच्याविषयी...


मुंबई (अक्षय मांडवकर) -  माणसाला एखाद्या विशिष्ट गोष्टीचा जडलेला नाद त्याला छंदमय आयुष्य जगण्यास भाग पाडतो. त्यात हा छंद निसर्गाशी निगडित असल्यास तो माणूस निसर्गमय जीवन जगू लागतो. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे देणार्‍या या शिक्षकाला छंद जडला तो फुलपाखरांचा. मग काय, त्यांनी फुलपाखरांनादेखील कवायती करायला लावल्या. मुलांप्रमाणेच फुलपाखरांसाठी ठाण्यात एका शाळेची निर्मिती केली आणि त्याला नावे दिले ’ओवळेकर वाडी’. आजवर या शाळेत 138 पेक्षा अधिक फुलपाखरांच्या प्रजातींनी हजेरी लावली आहे. या नाजूक आणि रंगीबेरंगी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रयोग करणारा हा फुलपाखरूप्रिय शिक्षक म्हणजे राजेंद्र ओवळेकर.

 
 

tiger_1  H x W: 
 
 

ठाण्यातील घोडबंदर परिसरातील ओवळा गावात दि.11 एप्रिल, 1965 रोजी राजेंद्र यांचा जन्म झाला. त्यावेळी हा संपूर्ण परिसर आतासारखा विकसित झालेला नव्हता. मोठ्या प्रमाणात हरितक्षेत्र या परिसरात होते. ओवळेकर कुटुंबाची वडिलोपार्जित जागा या परिसरात होती. या जागेवर ते भातशेतीदेखील करत होते. राजेंद्र यांचे बालपण अशा निसर्गमय वातावरणात आणि एकत्र कुटुंबपद्धतीत गेले. शेतावर मदतीला जाणे, तिथे सापडणार्‍या चतुरांचा माग काढणे, तलावातील मासे पकडणे, कबुतरांना पाळणे, शाळेभोवतीच्या मोकळ्या जागेत फुलपाखरांना न्याहाळणे अशा गोष्टी करण्यामध्येच ते लहानाचे मोठे झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओवळेकरांनी ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शारीरिक शिक्षणासंबंधीचे शिक्षण घेतले. 1991 सालच्या दरम्यान ते शारीरिक शिक्षक म्हणून एका शाळेत रुजू झाले.

 
 

tiger_1  H x W: 
 

या संपूर्ण कालावधीत निसर्गप्रेमाची आवड त्यांनी जाणीवपूर्वक जपली. ओवळा गावातील वडिलोपार्जित जमिनीचे विभाजन झाल्यावर त्यांच्या वाट्याला काही जमीन आली. या जमिनीवरील दोन एकरावर त्यांनी झाडे लावण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ही झाडे लावण्यामागे कोणताही हेतू व ध्येय नव्हते. केवळ निसर्गप्रेमाची आवड जपण्याकरिता सुट्टीच्या दिवसांत ओवळ्यातील त्या जागेवर जाऊन ते वृक्षारोपण करायचे. दरम्यानच्या कालावधीत त्यांना या जागेत मोठ्या प्रमाणात फुलपाखरांचा वावर असल्याचे आढळले. सरतेशेवटी ओवळेकरांनी 1996 साली या दोन एकराच्या जागेवर फुलपाखरू उद्यान उभारण्याच्या अनुषंगाने हालचाल करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ‘फुलपाखरू उद्यान’ म्हटले की मुद्दाम तयार केलेल्या ‘लॅण्डस्केप गार्डन’चे उदाहरण होते. नानाविध रंगांची फुलपाखरे एकाच वेळी पाहता यावी यासाठी अशा प्रकारच्या उद्यानांची परदेशात निर्मिती केली होती. मात्र, त्यामध्ये असणारा कृत्रिमपणा ओवळेकरांच्या लक्षात आला. हा कृत्रिमपणा टाळण्यासाठी त्यांनी नैसर्गिक संसाधनांचा वापर करून फुलपाखरांना कसे आकर्षित करता येईल, याबद्दल माहिती जमविण्यास सुरुवात केली.

 

tiger_1  H x W: 
 
 

फुलपाखरांच्या खाद्यवनस्पतींची लागवड त्यांनी या जागेत केली. हळूहळू या परिसरात फुलपाखरांचा संचार वाढला. मात्र, उद्यानात आढळणार्‍या फुलपाखरांची नावे काय, त्यांचे जीवनचक्र कसे असते, याविषयी ओवळेकरांना काहीच ज्ञान नव्हते. ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या संस्थेने 2004च्या सुमारास गोरेगाव येथील निसर्ग संवर्धन केंद्रात ’फुलपाखरू भेटी’चे आयोजन केले होते. यामध्ये फुलपाखरांची इथ्यंभूत माहिती देण्यात येणार होती. ओवळेकरांनी ही संधी हेरली आणि भेटीला उपस्थित राहिले. या भेटीत त्यांना फुलपाखरांच्या नावांविषयी, त्यांच्या ओळखीविषयी बरेच ज्ञान मिळाले. या भेटीत कोण्या फुलपाखरूप्रेमींनी ओवळा गावातील एका जागेत मोठ्या प्रमाणात फुलपाखरांचे दर्शन होत असल्याची माहिती दिली. ओवळे थोडे चक्रावूनच गेले. कारण, आपण ज्या गावात लहानाचे मोठे झालो, तिथल्या फुलपाखरांच्या जागेविषयी आपल्यालाच माहिती नसल्याचा प्रश्न त्यांना पडला. घरी गेल्यावर त्यांनी तातडीने ओवळ्यात फुलपाखरू आढळणार्या जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेरीस त्यांच्या लक्षात आले की, त्या फुलपाखरूप्रेमींनी आपल्याच जागेला भेट दिली आहे. यानंतर ओवळेकरांनी फुलपाखरू उद्यानाच्या विस्तारावर अधिक भर दिला. शाळेतील आपली नोकरी सांभाळून त्यांनी हे काम केले. फुलपाखरांचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी ही बाग फुलविली.

 
 

ओवळेकरांनी तयार केलेले हे उद्यान आज ’ओवळेकर वाडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. या वाडीत 70 ते 80 प्रजातीच्या फुलपाखरांच्या खाद्यवनस्पती असून 138 पेक्षा अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. ओवळेकर वाडीला वर्षाकाठी चार ते पाच हजार विद्यार्थी भेट देतात. राजेंद्र यांना गुरुवारी सुट्टी असल्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हा दिवस राखून ठेवला आहे. विद्यार्थ्यांना लिंबू, कढीपत्ता, कृष्णकमळ, पानफुटी यांसारखी फुलपाखरांना आकर्षित करणारी झाडे लावण्याचा सल्ला ते देतात. तुमच्या गॅलरीत या झाडांना स्थान द्या, असे ते कटाक्षाने सांगतात. सामान्य नागरिकांसाठी रविवारी ही वाडी खुली असते. निसर्गप्रेमी, अभ्यासक, छायाचित्रकार, पर्यटक, फिरस्ते त्यांच्या या बागेला आवर्जून भेट देतात. फुलपाखरांचे छंदमय आयुष्य जगणार्‍या ओवळेकरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा!

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@