ईशान्य भारताच्या आर्थिक भरभराटीसाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |
WSS_1  H x W: 0


युद्धकाळात 'सिलिगुडी कॉरिडोर' बंद पडला तर आपल्याला बांगलादेशमधून येणाऱ्या नद्यांचा आणि रस्त्यांचा वापर करता येईल. ईशान्य भारतात प्रवेश करण्यासाठी भारताकरिता अनेक मार्ग खुले होत आहेत. बांगलादेशातील नद्यांचा वापर करून आपण ईशान्य भारतात एक आर्थिक क्रांतीच करत आहोत.


ईशान्य भारतातील राज्ये ही उर्वरित देशाशी एका अरूंद अशा 'सिलिगुडी कॉरिडोर'ने जोडलेली आहेत. दरवर्षी १०० मिलियन टन एवढे सामान या अरूंद जागेतून ईशान्य भारतात रस्ते मार्गाने जाते किंवा येते. स्वातंत्र्य मिळण्याआधी ईशान्य भारताचा पुष्कळसा व्यापार हा आत्ताच्या बांगलादेशमध्ये असलेल्या समुद्री चितगाव बंदरातून होत असे. परंतु, १९४७ नंतर तो बंद झाला. कारण, हे बंदर बांगलादेशमध्ये आहे. त्यामुळे ईशान्य भारताला समुद्राला जोडण्यासाठी मार्ग फ़क्त कोलकाता जवळील हल्दिया बंदरातून आहे. हे अंतर ईशान्य भारतातील वेगवेगळ्या राज्यांकरिता १ हजार किलोमीटर ते २ हजार किलोमीटर एवढे आहे.

 

जर आपल्याला बांगलादेशातील बंदरे किंवा बांगलादेशमधून वाहणाऱ्या नद्यांचा वापर करून जर सामानाची ने-आण करता आली तर हा खर्च खूपच कमी होऊ शकतो. भारत सरकारने गेल्या दोन वर्षांपासून याविषयी प्रयत्न सुरू केले आहेत. मागच्या महिन्यात एम. व्ही. महेश्वरी बोट, बोटीवर प्रत्येक कंटेनरमध्ये १० टन सामान असे ५३ कंटेनर ठेवून भारताच्या हल्दिया बंदरातून निघून गुवाहाटी जवळ असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवरच्या मांडू या बंदरामध्ये १५ दिवसांत पोहोचली. हे अंतर १५०० किलोमीटर एवढे होते. त्यातील जास्त अंतर हे बांगलादेशमधून वाहणाऱ्या नद्यांतून होते.

 

ईशान्य भारतातून ब्रह्मपुत्रा नदी आणि उर्वरीत भारतातून गंगा नदी ही बांगलादेशात प्रवेश करते. या नद्यांचा वापर जर व्यापारासाठी करण्यात आला तर ईशान्य भारताला खूपच आर्थिक फायदा होऊ शकतो. कारण, रस्त्यावरून होणाऱ्या व्यापारापेक्षा नदी किंवा समुद्रातून होणारा व्यापार हा खूपच स्वस्त पडतो. दुर्दैवाने ईशान्य भारत हा चीन, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश या देशांनी वेढलेला असल्याने या प्रदेशाला स्वतःचा समुद्र किनारा नाही. तसे बघितले तर त्रिपुराची राजधानी आगरतळा ही समुद्रापासून २०० किलोमीटर केवळ लांब आहे. परंतु, मध्ये बांगलादेश असल्याने आपल्याला ते समुद्री बंदर वापरता येत नव्हते.

 

१८०० किलोमीटरवरचा समुद्र आता २०० किलोमीटरवर

 

गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये सत्ता पालट होऊन शेख हसीना वाजेद यांचे सरकार आल्यानंतर भारत सरकारने केलेल्या प्रयत्नामुळेचित्र पालटले आहे. आता बांगलादेशातील चितगाव आणि इतर बंदरे आता भारतासाठी खुली करण्यात आली आहे. चितगाव बंदरापासून भारतातील त्रिपुराची राजधानी आगरतळापर्यंत २०० किलोमीटरचा रस्ताही तयार करण्यात आला आहे. जे अंतर पूर्वी कोलकाता बंदरातून १ हजार, ८०० ते १ हजार, ९०० किलोमीटर होत असे ते आता केवळ २०० किलोमीटर एवढेच असणार आहे. कोलकात्यापासून ढाकापर्यंत (नारायणगंज या नदीतील बंदरापर्यंत) नदीने आपण प्रवास करणार आहोत. हाच नदीचा प्रवास आसाममध्येसिलघट आणि करीमगंजपर्यंत कुश्यारी नदीच्या माध्यमातून होणार आहे.

 

आज बांगलादेशची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे. आज भारत आणि बांगलादेशचा व्यापार हा १० बिलियन डॉलर एवढा होता. तो अजून वाढणार आहे. तिथे वेगवेगळी बांधकामे वेगाने सुरू आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सिमेंटमध्ये वापरली जाणारी 'फ्लाय अ‍ॅश' ही भारतातून पाठवली जाते. आपण ज्या वेळी कोळशापासून वीजनिर्मिती करतो, तेव्हा जी राख निर्माण होते त्याला 'फ्लाय अ‍ॅश' म्हणतात. ती भारताकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ही राख भारतातून बांगलादेशला निर्यात होते. नदीच्या माध्यमातून त्यांना लागणारा कोळसा, त्यांना लागणारी 'फ्लाय अ‍ॅश' बांगलादेशकडे पाठवण्यात येत आहे. यामुळे भारत-बांगलादेश व्यापार समुद्र व नदी मार्गातून वाढणारच आहे.

 

अनेक नद्या आणि नद्यांवरील अनेक बंदरे जशी वृक्षा नदी, भैरव बंदर हे कोलकात्यापासून ५२० किलोमीटरच्या अंतरावर आहे. २०१८ मध्ये ३.२ मिलियन टन इतके आयात-निर्यातीचे सामान नद्यांच्या मार्गानेच बांगलादेशमध्ये पाठवण्यात आले. भारत सरकारला वाटते की पुढील दोन वर्षांत ते चार ते पाच मिलियन टन मालाची ने-आण होऊ शकते. ते वाहून जाण्यासाठी ४ हजारांहून अधिक जहाजांच्या फेऱ्या या मार्गावरून कराव्या लागतील. रस्ते मार्गाचा वापर करून आयात-निर्यात करणे यापेक्षा नदी किंवा समुद्र मार्गाने आयात-निर्यात करणे हे अतिशय स्वस्त असते.

 

पाण्याची खोली अडीच ते तीन मीटर जरुरी

फक्त गरज असते ती नद्यांमधील या पाण्याची खोली अडीच ते तीन मीटर असली पाहिजे. नद्यांमधील पाण्याच्या प्रवाहाच्या रूंदी ही ४५ ते ५० मीटर असावी. या नद्यांना पूर आल्यास मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो, त्यामुळे नद्या उथळ होतात. म्हणून जर ३६५ दिवस या नद्यांचा वापर करायचा असेल तर ड्रेजर जहाजाच्या मदतीने इथला गाळ काढून तीन मीटर पाण्याची खोली आणि ५० मीटर रूंदी तयार करावी लागेल. सध्या १२ ड्रेजर नदीचा गाळ काढण्याचे काम करत आहेत. त्यावर ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च होणार आहे. एका कंपनीला पाच वर्षे अशा प्रकारे नदी गाळमुक्त ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. 'नॅशनल वॉटर वे १' म्हणजे गंगा, भागिरथी, हुबळी आणि 'नॅशनल वॉटर वे २' म्हणजे ब्रह्मपुत्रा आणि 'नॅशनल वॉटर वे १६' म्हणजे बराक नदीमधून बांगलादेशमध्ये प्रवेश हे मार्ग तयार होत आहेत.

 

थोडक्यात, १ हजार ७२० किलोमीटर लांब नद्या दळणवळणासाठी तयार होत आहे. कोलकात्यापासून करीमगंज हा १ हजार ४०० किलोमीटर प्रवास आहे आणि इतर नद्यांवरची असलेली बंदरे जसे धुबरी, बंडू, सिलघाट, करीमगंज ही आसाममध्ये आहेत. त्या ठिकाणी नदीतून व्यापार सुरू होणार आहे. एका बोटीमध्ये ८० ते १०० ट्रक्समधून वाहतूक केली जाईल एवढे सामान नेता येते. या बोटीचा वेग १२ ते १५ किलोमीटर प्रतितास असतो. या नदीमार्गामुळे ईशान्य भारताची नक्कीच भरभराट होणार आहे. एवढेच नव्हे, तर येत्या काळात म्यानमारमधील सिटवे बंदरही आपण ईशान्य भारताची भरभराट करण्याकरिता करत आहोत.

 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे भारतातून ईशान्य भारतात जाणारा १०० मिलियन टन मालापैकी पुष्कळसा माल आपल्याला नद्या आणि समुद्राच्या मार्गाने पाठवता येईल. येत्या काळामध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवता येईल. ज्याचा फायदा मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, मेघालयसारख्या राज्यांना होईल.

 

नद्यांचा वापर भूतान आणि नेपाळही करणार

त्याशिवाय याच नद्यांचा वापर करण्याची परवानगी भूतान आणि नेपाळ या देशांनासुद्धा आपण देत आहोत. जर या देशांना बांगलादेशच्या नद्यांचा आणि बांगलादेशच्या बंदरांचा वापर करून आयात-निर्यात करायची असेल तर त्यांनासुद्धा या नद्या आणि बांगलादेशची बंदरे वापरता येतील. कारण, ही बंदरे भूतान आणि नेपाळपासून जवळ आहे. त्यामुळे या देशांची आर्थिक भरभराटसुद्धा होईल. याचा आपल्याला सामरिक फायदा अपेक्षित आहे, ज्यामुळे येथे चिनी हस्तक्षेप कमी होण्यास मदत होईल.

 

सध्या भारतातून ईशान्य भारताकडून जाणारा अरुंद रस्ता हा २२ किमी लांबीच्या 'चिकन्स नेक सिलिगुडी कॉरिडोर'मधून जातो. ज्या मार्गाला शत्रुराष्ट्रे लढाईच्या काळात बंद पाडू शकतात. या मार्गाला पर्याय म्हणून म्यानमार आणि बांगलादेशामधून आपण नवीन रस्ते बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. या समस्येला तोडगा म्हणून सागरी व्यापारास चालना देऊन या भागात नदीचे जाळे सक्रिय केले जात आहे.

 

याचा सर्वात महत्त्वाचा सामरिक फायदा असा की युद्धकाळात 'सिलिगुडी कॉरिडोर' बंद पडला तर आपल्याला बांगलादेशमधून येणाऱ्या नद्यांचा आणि रस्त्यांचा वापर करता येईल. ईशान्य भारतात प्रवेश करण्यासाठी भारताकरिता अनेक मार्ग खुले होत आहेत. बांगलादेशातील नद्यांचा वापर करून आपण ईशान्य भारतात एक आर्थिक क्रांतीच करत आहोत.

 

- (नि.) ब्रि. हेमंत महाजन

@@AUTHORINFO_V1@@