लेखक सावरकर आणि सावरकरांचे लेखक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |
VS _1  H x W: 0




मुळातच सावरकर मार्सेलिस बंदरातील समुद्रातील उडीमुळे जगप्रसिद्ध होते. त्यात ब्रिटिश राजवटीविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे त्यांना अभूतपूर्व अशी दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती. फ्रेंच भाषेत खोराट नावाच्या लेखकाने सावरकरचरित्र दहा-पंधरा वर्षे तरी आधीच प्रसिद्ध केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर' ही भारतीय क्रांतिकारकांची जण दुसरी भगवद्गीता झाली होती! पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्यावर बंदी आलेले हे जगातील एकमेव पुस्तक होते आणि त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.

 

स्वतः सावरकरांनी इंग्रजी व मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. सुमारे सहा हजार पृष्ठे भरतील इतकी त्यांच्या लेखनाची पृष्ठसंख्या आहे. पुस्तकांची संख्या सुमारे ४० इतकी आहे. यामध्ये कथा-कादंबर्‍या, निबंध, काव्य, नाटके, लेख, ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण, पोवाडे, 'कमला,' 'सप्तर्षी,' 'गोमांतक' आणि 'विरहोच्छास'सारखी खंडकाव्ये, मॅझिनी, केमाल पाशा व विविध राष्ट्रपुरुषांची चरित्रे, आत्मचरित्र, काही तत्त्वज्ञान, चिंतनात्मक लेखन इत्यादींचा समावेश होतो. शिवाजी महाराज हे त्यांचे आद्य दैवत! त्यांच्याविषयी काव्य, पोवाडे आणि लेख त्यांनी लिहिले आहेत. आपण स्वातंत्र्यचळवळीत भाग घेऊन तसेच धार्मिक शुद्धिबंदी मोडणे, भाषाशुद्धी, हिंदू संघटन याबाबत शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेत आहोत, अशी त्यांची धारणा होती.

 

सावरकरांच्या साहित्यलेखनाचे हेतू

सावरकरांचे सर्व लेखन मुख्यतः स्वातंत्र्याची चळवळ, समाजप्रबोधन आणि विचारप्रवर्तन यासाठी केले गेले आहे. तर्कशुद्ध लेखन, बुद्धिवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय बाणा आणि त्यागवृत्तीचे दर्शन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये! उत्कृष्ट लेखक आणि साहित्यिक या नात्याने त्यांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा सन्मानही मिळाला होता. तसेच नागपूर विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ लेटर्स' ही मानाची पदवीसुद्धा मिळालेली होती. भाषाशुद्धी, लिपी सुधारणा या विषयासोबतच 'वैनायक' या नवीन छंदाची रचना हेसुद्धा साहित्यिक सावरकरांच्या नावावर जमा आहे.

 

सावरकरांनी केलेले इतिहासासंबंधीचे सर्व लिखाण हे मूलतः विश्लेषणात्मक आहे. तत्कालीन उपलब्ध साधनांचा अभ्यास करून इतिहास लेखन करून त्याचे विश्लेषण करत, भारत आणि हिंदू समाज यांच्या दृष्टिकोनातून स्वतःचे निष्कर्ष त्यांनी मांडले आहेत. '१८५७ चे समर,' 'हिंदुपदपादशाही,' 'सहा सोनेरी पाने' आणि अन्य काही लेख आणि पोवाडे हे त्यांचे इतिहास लेखन! 'हिंदुत्व' हा त्यांचा हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्रवादाचा संबंधित चिंतनात्मक प्रबंध आहे, तर 'हिंदुराष्ट्रदर्शन' हे पुस्तक म्हणजे हिंदुमहासभेच्या अध्यक्षीय पदावरून केलेल्या भाषणांचा संग्रह आहे.

 

स्वा. सावरकरांवर लिहिणारे लेखक

सावरकरांचे पहिले मराठी चरित्र १९२४ साली सदाशिव राजाराम रानडे या लेखकाने लिहिले, तर पहिले इंग्रजी चरित्र 'बॅरिस्टर सावरकर' हे 'चित्रगुप्त' या टोपण नावाने १९२६ सालीच प्रकाशित झाले. सावरकरांच्या चरित्रकारांमध्ये हिंदुमहासभेचे एक नेते शि. ल. करंदीकर तसेच धनंजय कीर, ज. द. जोगळेकर, वि. स. वाळिंबे, आचार्य बाळाराव सावरकर यांची नावे अग्रगण्य आहेत. सावरकरांवर साहित्य, विचार, कार्य, व्यक्ती आणि कर्तृत्व इत्यादींवर प्रबंध लिहून डॉक्टरेट करणारेही अनेक लोक आहेत. डॉ. शं. ना. नवलगुंदकर, डॉ. प्र. ल. गावडे किंवा वासुदेव गोडबोले, डॉ. श्रीरंग गोडबोले, डॉ. अरविंद गोडबोले, डॉ. द. न. गोखले (सावरकर : एक रहस्य) अशा अनेक उत्तमोत्तम लेखकांनी सावरकरांवर आवर्जून लेखन केलेले आहे. मराठीतील उत्तम कथाकार पु. भा. भावे (सावरकर नावाची ज्योत), विद्याधर गोखले तसेच आचार्य प्र. के. अत्रे (क्रांतिकारकांचे कुलपुरुष) यांचेही अनेक लेख आणि पुस्तके सावरकरांवर प्रकाशित झाली आहेत. डॉ. य. दी. फडके (शोध सावरकरांचा, तत्त्वज्ञ सावरकर), प्राध्यापक शेषराव मोरे (सावरकरांचा बुद्धिवाद, सावरकरांचे समाजकारण) आदींचे संशोधनात्मक लेखनही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. इतर लहान-मोठी पुस्तके आणि लेख यांची तर गणतीच नाही. पारल्याचे एक सावरकरप्रेमी आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे एक सदस्य वि. श्री. फणसळकर यांनी सावरकरांवर लिहिल्या गेलेल्या लेखांची एक संपादित सूची १९८७ सालाच्या आसपास 'साप्ताहिक बलवंत'मधून प्रसिद्ध केली होती, असे आठवते. ही निवडक लेखांची संख्या सुमारे ७०० पर्यंत गेली होती. मुळातच सावरकरांचे सर्व जीवन हे अद्भूत रसपूर्ण आणि सतत कार्यरत असणार्या कर्मयोग्याचे असल्याने, अनेक सिद्धहस्त लेखकांना त्यांनी त्यांच्यावर लिहिण्यास प्रवृत्त केले आहे.

 

'बॅ. सावरकर'चे लेखक 'चित्रगुप्त' कोण?

सुरुवातीला काही काळ 'बॅरिस्टर सावरकर' या पहिल्या इंग्रजी चरित्राचे 'चित्रगुप्त' हे टोपण नाव घेतलेली ही नेमकी कोण व्यक्ती असावी, याचे विविध तर्क केले जात होते. संशोधक य. दि. फडके यांच्या मते, सावरकरांचे उजवे हात आणि सावरकरांच्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष व्ही. व्ही. एस. अय्यर हे या पुस्तकाचे लेखक होते. १९८७ साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रस्तावनेत डॉ. रवींद्र रामदास यांनी 'चित्रगुप्त' हे टोपण नाव स्वतः सावरकरांनीच घेतले असावे, असा अंदाज व्यक्त केला.

 

मात्र, हे सारे अंदाज फारसे योग्य वाटत नाहीत. कारण, १९३७ साली सावरकरांची बिनशर्त मुक्तता झाल्यानंतर सावरकरांचे अभिनंदन आणि स्वागत करताना काँग्रेसचे नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी उर्फ राजाजी यांनी आपण सावरकरांपासूनच स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा घेतल्याने त्यांचे इंग्रजी चरित्र लिहून प्रसिद्ध केल्याचे जाहीर केले होते. (संदर्भः हिंदुमहासभा पर्व-१, लेखक बाळाराव सावरकर) त्यांच्यासारख्या एका महत्त्वाच्या नेत्याने हा दावा केल्यावर तसेच यावर अन्य कोणी आक्षेप घेतला नसल्याने 'चित्रगुप्त' लिखित 'बॅरिस्टर सावरकर' हे चरित्रलेखन व प्रकाशन राजगोपालाचारी यांचे आहे. हे तेव्हाच स्पष्ट झाले होते.

 

थोडक्यात, 'चित्रगुप्त' म्हणजे चक्रवर्ती राजगोपालाचारी हेच होते, असे आज निःसंशय म्हणू शकतो. फडके किंवा डॉ. रामदास यांनी केलेल्या अंदाजाप्रमाणे व्ही.व्ही. एस. अय्यर किंवा स्वतः सावरकर त्या चरित्राचे लेखक नव्हते. स्वतः राजाजी उर्फ चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी १९३७ झाली हा खुलासा केला होता. कारण, राजाजी काँग्रेसचे नेते असले तरी त्यांचा प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर होते. यातही विशेष काही आश्चर्य नाही. कारण अनेकांचे प्रेरणास्रोत हे सावरकरच असल्याचे त्यांनीच नमूद केलेले आहे. उदाहरणार्थ - सर मानवेंद्रनाथ रॉय हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे साम्यवादी नेतेसुद्धा सावरकरांपासूनच क्रांतीची प्रेरणा घेणारे होते. समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान यांनीसुद्धा चित्रगुप्त म्हणजे राजाजी होत, असा स्पष्ट खुलासा त्यांच्या पुस्तकात केलेला आहे.

 

स्वतः सावरकर या काळात 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र क्रमशः लिहीत होते. त्यांना चित्रगुप्त हे टोपण नाव घेण्याचे कसलेही कारण नव्हते आणि गरजही नव्हती. त्यांचे अनेक चाहते शिष्य, अनुयायी जगभर पसरले होते. सावरकरांविषयी सर्वत्र कुतूहल असल्याने आणि विशेषतः बहुसंख्य क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्रोत असल्याने सावरकरांना स्वतःच्या चरित्रलेखकांची कमतरता कधीच पडली नाही.

 

क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान

मुळातच सावरकर मार्सेलिस बंदरातील समुद्रातील उडीमुळे जगप्रसिद्ध होते. त्यात ब्रिटिश राजवटीविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे त्यांना अभूतपूर्व अशी दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती. फ्रेंच भाषेत खोराट नावाच्या लेखकाने सावरकरचरित्र १०-१५ वर्षे तरी आधीच प्रसिद्ध केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर' ही भारतीय क्रांतिकारकांची जणू दुसरी भगवद्गीता झाली होती पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्यावर बंदी आलेले हे जगातील एकमेव पुस्तक होते आणि त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.

 

अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली. त्यातील उतारेच्या उतारे मुखोद्गत केले जात असत आणि या सर्व पुस्तकांचे लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, हे ब्रिटिशांसहित सर्वांनाच माहिती होते. हुतात्मा भगतसिंगांनी या पुस्तकाची एक आवृत्ती प्रकाशित केली, तर सुभाषचंद्र बोस आपल्या 'आझाद हिंद सेने'समोर दिलेल्या भाषणामध्ये अनेकदा या पुस्तकातील उतारे आपल्या सैनिकांसमोर म्हणून दाखवत असत, अशी आठवण त्यांच्या काही सहकार्‍यांनी दिलेली आहे. त्यामुळे स्वप्रसिद्धीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वेगळे काही करण्याची कसलीच आवश्यकता नव्हती.

 

सावरकर यांची 'मार्लेलिस उडी' यावर जगभर ढीगभर साहित्य प्रकाशित आहे. आजही फ्रान्सच्या कायद्याच्या अभ्यासक्रमात सावरकरांची केस अभ्यासली जाते. तत्कालीन फ्रान्स सरकारला याच प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला होता.

 

सावरकरांच्या मार्सेलिसच्या धाडसी उडीवर कार्ल मार्क्स यांच्या नातवाने लेख लिहिला, ब्रिटिशांचा धिक्कार केला. लेनिनच्या सोशालिस्ट पार्टीनेसुद्धा सावरकरांच्या सुटकेच्या बाजूने ठराव पास केले. अशा जगप्रसिद्ध सावरकरांनी स्वतःच स्वतःचे चरित्र लिहून दिवे ओवाळून घेतले, हा आरोप अवास्तव आणि हास्यास्पद ठरतो. मानवेंद्रनाथ रॉय, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, बॅरिस्टर असफ अली ते राजाजी यांच्यासारखे अनेक लेखक त्यांचे चरित्र लिहिण्यास समर्थ होते, तसे ते लिहीतही होते.

 

अन्य एक मोठे क्रांतिकारक रासबिहारी बोस हे 'आझाद हिंद लीग'चे संस्थापक! ते ब्रिटिशांच्या तावडीतून निसटून जपानला गेले होते. सुभाषचंद्र बोस जपानला येण्यापूर्वीच रासबिहारींनी सुमारे पन्नास हजार संख्या असलेली आझाद हिंद सेना संघटित केली होती आणि तिचे नेतृत्व त्यांनी सुभाषचंद्र बोसांकडे सोपवले होते. सावरकरांच्या सूचनेवरून त्यांनी जपानमध्ये हिंदुमहासभेची स्थापना केली होती. त्यांनी सावरकरांचे चार पानी चरित्र थेट जपानी भाषेत १९३९ साली लिहिले. त्याचा मधळा होता- 'The rising leader of new India Veer Savarkar.' ते आज उपलब्ध असून सावरकर आणि रासबिहारी बोस यांचा पत्रव्यवहारही प्रमाणात उपलब्ध आहे.

 

'चित्रगुप्त' लिखित चरित्रासंबंधी खुलासेवार लिहिण्याचे कारण सावरकरांच्या चरित्राविषयी, कार्याविषयी, विचारांविषयी अनेक प्रकारे गैरसमज पसरवण्याचे उद्योग काही करत आहेत. त्यापैकीच सावरकर विचारांची हत्या करणार्‍या काही साम्यवादी मारेकर्‍यांनी 'बॅरिस्टर सावरकर' हे इंग्रजी चरित्र स्वतः सावरकरांनीच स्वतःची महती गाण्यासाठी स्वतःच लिहिले, असा हास्यास्पद आरोप करण्यास सुरुवात केली आहे. सावरकरांसारखा महामानव-व्यक्तिमत्त्वाने स्वतःच स्वतःचे चरित्र लिहिले, असा आरोप करण्यासारखा महामूर्खपणा जगात दुसरा नाही! स्वतःच स्वतःचे चरित्र लिहिले तर त्यास 'आत्मचरित्र' म्हटले जाते आणि तसे ते सावरकरांनी लिहिले आहे.

 

त्याहून महत्त्वाचे. शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने गावा म्हणत अनेकांनी सावरकरांच्या गुणांचे उस्फूर्तपणे वर्णन केले आहे. स्वतः हुतात्मा भगतसिंग, सावरकरांचे, पायाखाली येणारे गवताचे कोवळे पातेही चिरडू नये म्हणून काळजी घेत चालणारा मानवतावादी वीर क्रांतिकारक. असे वर्णन करतो. ज्या वेळी मदनलाल धिंग्रांची बाजू घेणारे कोणी नव्हते तेव्हा आमच्या सावरकरसाहेबांनी निधड्या छातीने धिंगांची उघडपणे बाजू घेतली, असे अत्यंत आत्मीयतेने सावरकरांकर हुतात्मा भगतसिंग लिहितो (समय भगतसिंग, मराठी भाषांतर मनोविकास प्रकाशन) इतकेच काय, पण हुतात्मा भगतसिंग यांनी आपल्या जेल डायरीमध्ये आवडलेल्या काही महत्त्वाच्या वाक्यांचे टिपण काढले आहे. त्यात भारतीय लेखकांपैकी सर्वाधिक जास्त वाक्ये म्हणजे सहा अवतरणे सावरकरांच्या 'हिंदुपथपादशाही' या पुस्तकातून टिपून घेतली आहेत.

 

अशा परिस्थितीत सावरकरांनी स्वप्रसिद्धीसाठी काही लिहावे, असा आरोप करणारे, स्वत:लाच स्वप्नसिद्धी आणि आत्मप्रस्थापनासाठी धडपडत असण्याचीच दाट शक्यता आहे. हे वरील माहितीवरून वाचकांच्या सहज लक्षात येईल. पण, सावरकरांविषयी गैरसमज पसरवण्याचे जे प्रयत्न चालू आहेत, त्यास वेळच्या वेळी सडेतोड उत्तरे देणे आवश्यक आहे. कारण, 'गोबेल्स' प्रचारतंत्राप्रमाणे शंभर वेळा एकच खोटे बोलले तर कदाचित काही जणांना ते खरे वाटू शकते. म्हणून सत्य सामोरे आणत राहिले पाहिजे.

 

- चंद्रशेखर साने 

संदर्भ पुस्तके
:

हिंदुसभा पर्व १. लेखक- कै. बाळाराव सावरकर

भारतीय स्वातंत्र्यसंग्राम - कै. ग. प्र. प्रधान

समग्र भगतसिंग, मराठी भाषांतर, मनोविकास प्रकाशन

(लेखक, गुंतवणूक सल्लागार असून

इतिहासाचे अभ्यासक जाहेत.)

 
@@AUTHORINFO_V1@@