जेल के ताले टूट गये; व्ही. टी. दादा छुट गये!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |

Tusedada _1  H

 
 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते व्ही. टी. तुसेदादा यांचे नुकतेच निधन झाले. तुसेदादा यांच्या कार्याची ओळख करुन देणारा हा श्रद्धांजलीपर लेख...

 

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली. आणीबाणी म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर प्रहारच होता. कोणतेही कारण न देता राजकीय विरोधकांची ‘मिसा’ कायद्याखाली संपूर्ण देशभर धरपकड सुरू झाली होती. देशात अराजकता, दहशत निर्माण झाली होती. इंदिरा गांधींना विरोध करणारा तो देशद्रोहीच ठरवून हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात येत होते. सर्वदूर अंध:कार पसरलेला होता. सकाळी व्ही. टी. तुसेदादा देवपूजा करीत बसले होते आणि दारावर हवालदार हजर. दादांनी हसतमुखाने हवालदाराचे स्वागत केले. सर्व मुले लहान, कुटुंबामध्ये प्रचंड चलबिचल, गल्लीतील सर्व लोक जमा झालेले. स्थितप्रज्ञ असणार्‍या व्ही. टी. दादांनी सर्वांना धीर दिला आणि अंगावरच्या कपड्यानिशी पोलीस ठाण्यात हजर झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय कार्यवाह असणार्‍या वाल्मिकराव तुसे तथा व्ही. टी. दादांना अटक झाल्याची बातमी वार्‍यासारखी नांदगावमध्ये पसरली. स्थानिक पुढार्‍यांनी पोलीस ठाण्याला हजेरी लावली होती.

 

पोलीस अधिकार्‍यांनी दादांसमोर व मध्यस्थी करणार्‍या स्थानिक पुढार्‍यासमोर प्रस्ताव मांडला. दादांनी लिहून द्यावे माझा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी कुठलाही संबंध नाही व भविष्यातही असणार नाही. दादा ज्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते होते, त्या मुशीत ‘तडजोड’ हा शब्द नव्हताच. दादांनी स्पष्टपणे तेथे उपस्थित असणार्‍यांसमोर पोलीस अधिकार्‍यास सांगितले, "कायद्याप्रमाणे तुम्ही कार्यवाही करा मी स्वयंसेवक आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वयंसेवकच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळ दवडू नका. नांदगावातील हजारो लोकांमधून आपण माझी निवड केली, हा मी माझा सन्मानच समजतो" आणि दादांची रवानगी नाशिक सेंट्रल जेलमध्ये झाली. ऐन उमेदीच्या काळात १८ महिन्यांचा आगळा वेगळा प्रवास सुरू झाला होता. महाराष्ट्रातील ‘आर्थर’ जेलचाही अनुभव दादांना याच काळात आला. तुरुंगामध्ये अनेक विचारांचे, अनेक पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. व्यक्तीस्वातंत्र्याचा आवळलेला फास मोकळा करण्यासाठी तुरुंगामध्ये व बाहेर जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. तुरुंगामध्ये मोहन धारिया, दादा रत्नपारखी, बापुसाहेब काळदाते, अनंत भालेराव, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यासारख्या कार्यकर्त्यांसोबत रोज दादांचा संवाद घडत होता.

 

या १८ महिन्यांच्या कालावधीबद्दल दादा भरभरून बोलतात. मतपेटीतून जनतेने रोष व्यक्त केला आणि जनता दलाचे उमेदवार प्रचंड मताने निवडून आले. दहशतीचा पराभव झाला होता. कार्यकर्त्यांना तुरुंगामध्ये डांबले. मात्र, विचारांना इंदिराजी डांबू शकल्या नव्हत्या. जनता या ‘मिसा’खाली अटक झालेल्या कार्यकत्यांची १८ महिन्यांपासून वाट बघत होती आणि तो दिवस उजाडला. तुरुंगातून सन्मानपूर्वक अटकेतील कार्यकर्त्यांची सुटका झाली होती. नाशिक सेंट्रल जेलच्या गेटवर भगिनी आपल्या या भावांना ओवाळण्यासाठी निरांजनाचे ताट घेऊन वाट बघत होत्या. घोषणांनी संपूर्ण परिसरामध्ये नवचैतन्य आले होते. ‘अंधेरे में एक प्रकाश... जयप्रकाश... जयप्रकाश...’

 

व्ही. टी. दादांचीही सुटका झाल्याची बातमी वार्‍यासारखी नांदगावमध्ये पसरली होती. रेल्वे स्थानकावर आपल्या या लाडक्या निर्भीड, कार्यकर्त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण नांदगावकरांनी गर्दी केली होती. सेवाग्राम एक्सप्रेस स्थानकावर पोहोचली. उत्साही कार्यकर्त्यांनी व्ही. टी. दादांना खांद्यावर घेतले. ढोलताशांच्या गजरात प्रचंड मिरवणूक नांदगाव नगरीत निघाली होती. दिवाळी-दसर्‍याला असणारा उत्साह नांदगावकरांमध्ये दिसत होता. ठिकठिकाणी माताभगिनी औक्षण करीत होत्या. ‘जेल के ताले टूट गये; व्ही. टी. दादा छुट गये!’ या घोषणांनी १८ महिन्यांच्या काळरात्रीच्या आठवणी दादा विसरले होते. जीवन सार्थ झाल्याचा भाव दादांच्या चेहर्‍यावर झळकत होता. आजच्या काळात पावलोपावली तडजोडी करणारे कार्यकर्ते आपण बघतो. सर्व पक्षांना प्रदक्षिणा घालून स्वगृही परत फिरणार्‍या कार्यकर्त्यांच्या सवयीची लोकांना सवय झाली आहे. परंतु, मुशीतील व्ही. टी. दादासारखा कार्यकर्ता आणीबाणीच्या प्रसंगीही आपल्या विचारांशी प्रतारणा करीत नाही. साध्या लेखी माफीनाम्यावरही १८ महिन्यांचा कारावास दादांना टाळता आला असता. परंतु, असा प्रमाद हाडाचा कार्यकर्ता करूच शकत नाही, हे दादांच्या कृतीतून स्पष्ट होते.

 

दादांचे वडील तुकाराम खेमजी तुसे लोकल बोर्ड बांधकामाचे लहानमोठे काम करायचे. परिस्थिती बेताचीच. परंतु वारकरी संप्रदायावर प्रचंड श्रद्धा असणारे. व्ही. टी. दादा थोरले तर डी. टी. तुसे हे लहान चिरंजीव, आजच्यासारखा ठेकेदारी व्यवसाय त्याकाळी नव्हता. त्यामुळे प्रचंड मेहनत करुनही पैसा दिसायचा नाही. त्यातच दादांच्या वडिलांचे १९४८ साली निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी दादांवर पडली. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. दादा व्ही. जे. हायस्कूलमध्ये त्यावेळी शिकत होते. शालेय शिक्षणाबरोबरच न. ना. कुलकर्णी सरांचा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतप्रचारक मधुकर पंडित यांचा प्रभाव दादांवर होता. लहान वयात पडलेली कौटुंबिक जबाबदारी आणि संघविचाराने बालवयात होणार्‍या संस्कारानेच दादा मार्गक्रमण करीत होते. आजच्यासारखा संघ-जनसंघाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा नव्हता. नांदगाव तर समाजवादी चळवळीचे माहेरघर होते. अशा वातावरणात संघाचे काम उभे करणे म्हणजे प्रवाहाच्या विरोधात पोहणे होते. यासाठी प्रचंड सामर्थ्य व निश्चय लागतो. संघाच्या संस्कारामुळे या कार्यकर्त्यांमध्ये ते सामर्थ्य निर्माण झाले होते. दादा मुळात साधे-सरळ आपल्या विचारांना राजकीय कोशात न बसविता साध्या पद्धतीने मांडणे. त्यामुळे त्यांच्या कार्याला लोकमान्यता मिळत गेली. सामाजिक काम करताना कौटुंबिक जबाबदारीचे भानही दादांना होते.
 

व्ही. टी. दादांनी तहसील कार्यालयात कॉपिंग क्लार्क म्हणून काही वर्ष सेवा केली. चांदवड येथील प्रसखाराम भागूजी आणि पलोड या फर्ममध्ये काम केले. १९५२ साली दुष्काळात तात्पुरत्या स्वरुपाचे काम केले. ‘बी अ‍ॅण्ड सी’मध्येही सेवा केली, त्र्यंबकला बदली झाल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला. फुलूशेट लोहाडे यांच्याबरोबर भागीदारीत बांधकाम व्यवसायात उडी घेतली. योगायोगाने गिरणाडॅमचा मोठा प्रोजेक्ट नांदगाव तालुक्यात सुरू झाला होता. दगड वाहतुकीचा ठेका दादांना मिळाला. डी. टी. तुसेंसारख्या प्रचंड मेहनत करणार्‍या लहान भावाची साथ त्यामुळे व्ही. टी. तुसे फर्म बांधकाम व्यवसायात नावारुपात आली होती. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडताना संघाचे काम मात्र दादांचे चालूच होते. संघाने दादांवर जी जबाबदारी दिली तिला न्याय देण्याचा दादांचा प्रयत्न चालूच होता. शहर कार्यवाह, जिल्हा कार्यवाह, जिल्हा संघचालक, विभाग संघचालक त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेची प्रांत कार्याध्यक्ष पदाची जबाबदारीही दादांनी समर्थपणे सांभाळली. कामाच्यानिमित्ताने प्रवास घडत होता. नवनवीन कार्यकर्त्यांशी संबंध येत होता. सरसंघचालक बाळासाहेब देवरस, भाऊ गोविलकर, बाबा भिडे अशा महनीय व्यक्तींशी संपर्क येत होता. आजच्यासारखी दळणवळणाची साधने नसताना खेडोपाडी कार्यकर्त्यांशी भेटी घेण्यासाठी केलेल्या प्रवासाच्या आठवणी दादांच्या आजही स्मरणात आहे. माणूस प्रवासाने शहाणा होतो हेही दादा आवर्जून सांगतात. महाराष्ट्रातील अनेक लहान कार्यकर्त्यांची एकदाच घेतलेली भेट त्याच्या नाव-गावासह दादांच्या आजही लक्षात आहे, याचेच आश्चर्य वाटते.

 

दादांचा जसा अनेक ठिकाणी प्रवास असायचा तसाच अनेक कार्यकर्ते, प्रचारक यांची दादांच्या घरी वर्दळ असायची. दादांच्या या घेतलेल्या व्रताची कल्पना वत्सलाबाई अर्थात दादांच्या धर्मपत्नीस होती. त्यामुळे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी रोजच अधिकचा स्वयंपाक ही माऊली करीत असे. घरी आलेल्या उच्चशिक्षित कार्यकर्त्यांची समर्पित भावना, संघ विचार, देशभक्ती, साधी राहणी, कोणत्याही परिस्थितीत तणावविरहित वावर याचे बाळकडूही आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न न बोलता घडत होता. आर्थिक परिस्थिती सुधारली असली तरी दादांनी बडेजाव कधी केला नाही. पैसा आज आहे, उद्या नाही. त्यामुळे भौतिक सुविधेमागे फार पळू नये, याकडे दादांचा नेहमीच कटाक्ष राहिला. इंग्रजी माध्यमाची ‘क्रेझ’ असताना आणि तशी अनुकूल आर्थिक परिस्थिती असतानादेखील ख्रिश्चन संस्काराच्या शाळेत डॉ. सुनीलची इच्छा असतानाही मातृभाषेतच शिकले पाहिजे, हा अट्टाहास मुलांच्या बाबतीत तसाच नातवंडांच्या बाबतीतही दादांचा कायमच राहिला.
 

अशा या विचारांशी प्रामाणिक असणार्‍या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा एकसष्टीचा कार्यक्रम नांदगावकरांनी २७ मार्च, १९८८ रोजी साजरा केला. या नागरी सत्कारास गिरीश कुबेर, भैय्याजी जोशी, डॉ. मधुकरराव आचार्य, प्रल्हाद अभ्यंकर, नानासाहेब पुणतांबेकर, भाऊसाहेब गोविलकर, अण्णासाहेब कवडे, भिकूसेठ दुधावट, माणिकराव पाटील, दौलतराव कवडे यासारख्या अनेक राजकीय, सामाजिक, विविध संघटना, विविध विचारांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती म्हणजे दादांच्या कार्याची पावतीच होती.

 

सामाजिक क्षेत्रात वावरताना अजातशत्रू असणार्‍या दादांना नांदगावमधील एक मस्त माणूस म्हणून ओळखले जाणारे अमरचंद सेठी यासारख्या समाजवादी कार्यकर्त्याचा नगरपालिकेच्या निवडणुकीत केलेला पराभवही नांदगावकरांना लक्षात राहिला. मुस्लीम बांधवांनीही अमरचंद सेठी यांच्या प्रचाराला निहाल अहमद यांच्यासारखा नेता येऊनही मलाच मते दिली, हे दादा अभिमानाने सांगतात. संघकार्यासाठी तर दादांनी वाहून घेतलेले होतेच. परंतु, अनेक सामाजिक विषयावर पुढाकार घेऊन हुंडा प्रथेविरुद्ध स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी व नातवाच्या लग्नाच्यावेळी समाजात आदर्श घालून दिला आहे. हिंदू पंच असताना देवी मंदिराचा जीर्णोद्धारअसेल किंवा नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेत केलेले कार्य लक्षात राहण्यासारखेच आहे.

 

- भैय्यासाहेब चव्हाण

@@AUTHORINFO_V1@@