लोकमान्य टिळक आणि शिवजन्मोत्सव भाग-२

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |
Shivaji _1  H x


शिवजयंतीच्या संदर्भात बोलताना आजकाल जोतिराव फुले समाधीपाशी गेले आणि त्यांना पोवाडा स्फुरला आणि त्यांच्या प्रेरणेतून शिवजयंती उत्सव सुरू झाला, असा दावा अनेकदा केला जातो. टिळकांनी हा उत्सव सुरू केला याचे पुरावे उपलब्ध असतानाही असे वारंवार पसरवले जाते. पुन्हा एकदा जातीय तेढ निर्माण व्हावी, माथी भडकावीत, वाद व्हावा असे सुप्त हेतू, मनाला येईल ते तथ्यहीन लिहिणार्‍या बोलणार्‍यांच्या मनात असावेत. आश्चर्य म्हणजे गुगल, विकीपीडियासारख्या समाज माध्यमांवर अशी तथ्यहीन माहिती ठोकून दिली आहे. दुर्दैवाने कोट्यवधी लोक या चुकीच्या माहितीला भुलून आजही बळी पडत आहे. त्यापैकी काहींना तरी नेमके सत्य काय याची जाणीव व्हावी, लोक आतातरी शहाणे व्हावे, हाच हे सारे विवेचन करण्याचा हेतू!

 

शिवजयंतीचा उत्सव महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर सुरू झाला आणि शिवजन्मोत्सव लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सुरू आला, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. टिळकांनी तत्कालीन स्थितीचा आणि वादाचा फायदा घेऊन हिंदूंची जूट घडवून आणण्यासाठी शिवजयंतीचा घाट कसा घातला हे आपण पाहिले, प्रतापगडाचा प्रश्न उभा राहिला, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या समाधीचा वादही पुन्हा उफाळून वर आला आणि दरम्यानच्या काळात या दोन्ही वादांचा लोकमानस जागृत करण्यासाठी टिळकांनी पुरेपूर फायदा करून घेतला. अशा रीतीने शिवजयंतीचा उत्सव लोकमानसात रुजवण्याची प्रथा सुरू केली.

 

टिळकांच्या पूर्वीच काही काळ शिवजन्मोत्सव महाराष्ट्रात साजरा केला जात असे आणि त्या उत्सवाची सुरुवात जोतिराव फुले यांनी केली होती, अशी माहिती आजकाल सोशल माध्यमांवर फिरत असते. आमचे तरुण मित्र ती वाचतात, अनेक जण प्रश्न विचारतात की नेमके कोण? लोकमान्य टिळक की महात्मा जोतिबा फुले? जोतिराव फुल्यांच्या प्रेरणेतून शिवजन्मोत्सव सुरू झाला, असे म्हणणार्‍या लोकांचे पीक आताशा वाढते आहे. जोतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचे गुणवर्णन करणारा पोवाडा रचला यावरून हा उत्सव त्यांनीच सुरू केला, असे सांगणारे आणि त्यावर विश्वास ठेवणारे बरेच लोक आजूबाजूला दिसतात तेव्हा मात्र नेमके खरे काय, हे समजून घ्यावे लागेल.

 

पेशवाईनंतर मुख्यतः शाळा-शाळातून ग्रॅन्ट डफने लिहिलेला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जाई, असे म्हणतात. तो पुरेपूर खरा नसला तरी त्याने किमान शिवाजी महाराजांचे स्मरण तरी होत असे. लोकहितवादींनी शिवाजी महाराजांनी कशी क्रांती केली याबद्दल लिहिले होते. नीलकंठ जनार्दन कीर्तने यांनी शिवस्मृतीच्या माध्यमातून ग्रॅन्ट डफने जे चुकीचे लिहिले आहे त्यावर हल्ला चढवला होता. दरम्यानच्या काळात १८६५ च्या सुमारास जोतिबा फुले रायगडावर गेले होते, त्या प्रसंगाचे वर्णन धनंजय कीर यांनी जोतिरावांच्या चरित्रात केले आहे. ते लिहितात, 'त्याच सुमारास जोतिरावांनी मोठ्या उत्सुकतेने आणि अभिमामाने रायगड पाहिला. शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरवस्था पाहून त्यांचा जीव हळहळला. त्यांनी दगडधोंडे, कचर्‍याचे ढीग समाधीवरून दूर केले. तेथे स्फूर्ती घेऊन शिवाजी महाराजांवर एक मोठा पोवाडा केला. तो १८६९ मध्ये प्रसिद्ध केला.' (महात्मा जोतिराव फुले, धनंजय कीर - पान १२७ ) जोतिबा फुल्यांचा हा पोवाडा प्रसिद्ध आहे.

 

सुरुवातीला ब्राह्मण-क्षत्रिय संघर्ष, परशुराम या विषयावर असला तरी नंतर शिवाजी महाराजांच्या चरित्रातील ठळक संदर्भ देणारा आणि त्यांचे गुणवर्णन करणारा असाच आहे. पोवाड्याचे नावच मुळी 'पोवाडा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा' असे आहे. जोतिरावांचा पोवाडा त्या काळात बराच गाजला, ब्रिटिश राजवटीमध्ये कुण्या मराठी लेखकाने शिवाजी महाराजांचे गुणवर्णन पोवाड्यातून करावे, असा तो पहिलाच पोवाडा असावा बहुदा, असे म्हटले जाते. परंतु, त्याच काळात उदास यांचे 'धौम महाबळेश्वर वर्णन' गुंजीकर यांची 'मोचनगड' कादंबरी यानेही शिवाजी महाराजांचा विषय समोर आला होता हे विसरायला नको. जोतिबा फुले यांनी शिवजन्मोत्सव सुरू केला, असा दावा जेव्हा केला जातो तेव्हा नेमका याच पोवाड्याचा संदर्भ दिला जातो. जोतिबा रायगडावर गेले, त्यांना स्फूर्ती झाली आणि त्यांनी पोवाडा लिहिला इथवर संदर्भ सापडतात. मात्र, यावरून जोतिबांच्या प्रेरणेतून एका उत्सवात रुपांतर होऊन शिवाजी महाराजांचा उत्सव महाराष्ट्रात सुरू झाला, असे मानणे तथ्याला आणि पुराव्याला धरून होणार नाही, ती कल्पनारम्यता ठरेल.

 

शिवाजी महाराज यांच्या समाधीची कशी दैना झाली आहे, ती किती वाईट अवस्थेत आहे, याबद्दल खुलासा करणारे उद्गार जेम्स डग्लस याने 'मुंबई आणि पश्चिम हिंदुस्थान' या पुस्तकात काढले. नंतरच्या काळात १८८५ च्या सुमारास गोविंद आबाजी वसईकर-जोशी हे रायगडावरील समाधीची अवस्था पाहून आले आणि त्यांनी हा वाद निकराने लढवला. त्यांनी यावर सविस्तर पुस्तक लिहिले. दरम्यान, पुण्यात महादेव गोविंद रानडे आणि तेलंग यांनी सभा भरवून याबद्दल लोकजागृती केली. या सगळ्याच्या एकत्रित परिणामाने सरकारचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी सरकारकडून पैसेही मंजूर करून घेतले गेले, हे मागे सांगितले आहेच.

 

पोवाडा लिहून उत्सव सुरू झाला असता तर उत्सवाच्या निमित्ताने लोक रायगडावर येत राहिले असते आणि शिवाजी महाराजांच्या समाधीची डागडुजी वारंवार होतच राहिली असती. त्यामुळे जेम्स डग्लस किंवा मग पुढे वसईकर-जोशी यांना हा विषय उचलून धरण्याची काय गरज पडली असती? मात्र, तसे झाले नाही. कारण, स्पष्ट आहे की, फुल्यांच्या काळात असा उत्सव सुरू झालाच नव्हता. तेव्हाच जर तो सुरू झाला असता तर तो दीर्घकाळ सुरूच राहिला असता. वसईकर गुरुजींनी, रानड्यांनी सभा घेऊन सरकारने देणगीची व्यवस्था केली, पण ती इतकी तोकडी होती की हा प्रश्न कायमचा सुटला नाही. नंतर पुन्हा १८९४ मध्ये करकेरिया यांच्या भाषणाने हा विषय उसळून आला आणि नेमके याच वेळी टिळकांनी लक्ष घातले. टिळकांनी लक्ष घातल्यानंतर खर्‍या अर्थाने शिवाजी महाराजांचा उत्सव आपल्या देशात सुरू झाला, जो त्या काळी भरपूर गाजला आणि आजही बर्‍या-वाईट प्रमाणात सुरू आहे.

 

हा सगळा इतिहास आणि घटनाक्रम पाहता जोतिराव समाधीपाशी गेले आणि त्यांना पोवाडा स्फुरला या घटनेवरून जोतिराव फुल्यांनी हा उत्सव सुरू केला, असा दावा करणे मात्र हास्यास्पद ठरते. पुन्हा एकदा जातीय तेढ निर्माण व्हावी, माथी भडकावीत, वाद व्हावा असे सुप्त हेतू, मनाला येईल ते तथ्यहीन लिहिणार्‍या बोलणार्‍यांच्या मनात असावेत. आश्चर्य म्हणजे गुगल, विकीपीडियासारख्या समाज माध्यमांवर अशी तथ्यहीन माहिती ठोकून दिली आहे. दुर्दैवाने कोट्यवधी लोक या चुकीच्या माहितीला भुलून आजही बळी पडत आहे. त्यापैकी काहींना तरी नेमके सत्य काय याची जाणीव व्हावी, आतातरी शहाणे व्हावे, हाच हे सारे विवेचन करण्याचा हेतू!
 

सुरुवातीपासून टिळकांनी शिवरायांच्या समाधीचा प्रश्न लावून धरला असला तरी हा उत्सव टिळकांनी सुरू केला, तो त्यांचाच आहे, अशी धारणा लोकांची होऊन चालणार नव्हते. लोकांना तो उत्सव स्वतःचावाटावा, आपलेपणा जाणवावा यासाठी टिळक प्रयत्नशील होते. टिळकांनी सुरू केलेला कुठलातरी उत्सव आहे. आपण कशाला त्याच्या फंदात पडा? अशी भूमिका तयार होणे हिताचे नाही हे टिळकांना चांगलेच ठाऊक होते म्हणूनच लोकसहभागातून शिवाजीचा उत्सव व्हावा अशी मागणी जोर धरते आहे. लोकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदरभाव आहे. रायगडावरील समाधीच्या निमित्ताने लोकमानसातील भावना प्रकट होत आहेत, असे टिळकांना दाखवायचे होते.

 

पुढील काळात एके ठिकाणी या लोकसहभागाबद्दल टिळक लिहितात, "सर्व ठिकाणच्या हकिकतीवरून हा उत्सव चांगल्या रीतीने पार पडला व यंदाप्रमाणेच अशा प्रकारचा उत्सव नेहमी करावा अशी लोकांची बुद्धी आहे, असे दिसून येते." (समग्र टिळक, पान क्र. ३४) यातील अशी लोकांची बुद्धी आहे असे जे टिळक जे लिहितात ते फार महत्वाचे आहे. उत्सव लोकांच्या इच्छेने सुरू झाला असल्याने अनेकांच्यात मतमतांतरे असणे स्वाभाविक होतेच, असे गणेशोत्सवाच्या प्रसंगी मेळे आणि इतर नाट्यमय प्रकाराने सुधारकांतून काहीसा टीकेचा सूर लावला गेला होता. परंतु, त्यांच्या शंकांचे पुरेपूर निरसन एक प्रगल्भ पुढारी या नात्याने टिळकांनी केले होते. शिवजन्मोत्सवाबद्दल अशी धारणा होतीच. याबद्दल आक्षेप, टीका करण्यात लोक मागे नव्हते. टिळकांना प्रतिस्पर्धी एक नव्हे तर दोन होते. एकाच वेळी इंग्रज आणि आपल्याच देशातील काही मंडळी या दोहोंशी त्यांचा एकतर्फी सामना सुरूच होता. त्यातून वाट काढत काढत त्यांना टिळकांनी हा उत्सव लोकप्रिय कसा केला, विरोधकांना कशी उत्तरे दिली आणि आपले ध्येय कसे साध्य करून घेतले हे पुढील भागात बघूया...



- पार्थ बावस्कर

९१४६०१४९८९

parthbawaskar93@gmail.com

@@AUTHORINFO_V1@@