सावध, ऐका पुढल्या हाका...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |


agralekh jamia university

 


गुरुवारी दिल्लीच्या जामिया विद्यापीठाच्या दारात 'सीएए'विरोधी मोर्चात झालेल्या गोळीबाराचे कदापि समर्थन करता येणार नाही. पण, यानिमित्ताने अशा मोर्चांमधील असामाजिक तत्त्वांची घुसखोरी, दिल्ली निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न याकडे गांभीर्याने पाहायलाच हवे.


"हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते, तेव्हा ते यश तात्पुरते असते. मात्र, त्यामुळे होणारे नुकसान हे दीर्घकालीन असते," हे आयुष्यभर अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींचे विचार कालातीत आहेत. पण, गुरुवारी या महात्म्याच्याच स्मृतिदिनी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या बाहेर घडलेला प्रकार सर्वथा निंदनीय आणि क्लेषदायकच म्हणावा लागेल. जामियासह दिल्लीतील जेएनयु आणि उत्तरेकडील राज्यांचे काही विद्यार्थी 'सीएए' विरोधात राजघाटापर्यंत पदयात्रा-मोर्चा काढायच्या तयारीत होते. त्याचवेळी एका १९ वर्षीय युवकाने 'ये लो आझादी', 'दिल्ली पोलीस जिंदाबाद'च्या घोषणा देत बंदुकीतून एकाएकी गोळी झाडली. त्या गोळीबारात एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. एकच खळबळ उडाल्यानंतर या बंदुकधारी तरुणाला अटकही झाली. अटकेनंतरच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार या तरुणाचे नाव गोपाळ असून तो उत्तर प्रदेशचा निवासी असल्याचे समजते. तिरंगा यात्रेदरम्यान काही मुस्लीम कट्टरतावाद्यांनी चंदन गुप्तानामक तरुणाची हत्या केली आणि त्याविरोधात म्हणे हा गोपाळ रस्त्यावर उतरला. पण, हे प्रकरण वरकरणी दिसते तेवढे सरळ, सोपे, स्पष्ट नक्कीच नाही. यामागे हिंदूंच्या बदनामीचे, हिंदूंना दहशतवादी ठरवण्याच्या जुन्याच कटकारस्थानाचे धागेदोरे गुंतल्याचीही दाट शंका आहेच.

 

'सीएए', 'एनआरसी' आणि 'एनपीआर' विरोधी आंदोलनांनी गेल्या महिन्याभरापासून देशाचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले. जेएनयु, जामिया, अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील मुस्लीमबहुल विद्यार्थ्यांच्या झुंडीच प्रामुख्याने या आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिल्या आणि आजही आहेत. सरकारकडून, खुद्द गृहमंत्री, पंतप्रधानांकडून देशातील मुसलमानांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नसल्याचे वारंवार आश्वस्त केल्यानंतरही हा अतिरेकी उद्रेक शमलेला नाही. उलट या विरोधाची धार अधिकच तीक्ष्ण करण्याच्या उद्देशाने बुरखाधारी मुस्लीम महिलांना मुद्दाम आंदोलक म्हणून पुढे करून 'शाहीनबागे'चा शरमनाक अंक रचला गेला. त्यातही देशद्रोही, असामाजिक तत्त्वांनी कहर केला. जेएनयुमधून पीएच.डी करणाऱ्या शरजील इमामने तर चक्क आसाम आणि ईशान्य भारताला हिंदुस्थानापासून तोडण्याची देशद्रोही भाषा केली. आता त्याच्या अटकेनंतर त्याचे व त्याच्या साथीदारांचे भारताला 'इस्लामिक राष्ट्र' करण्याचे दहशतघातकी मनसुबेही धुळीस मिळाले आहेत. शाहीनबाग, 'सीएए' विरोधी आंदोलनं कशी मुस्लीमधार्जिणी, इस्लामपूरक आहेत, याचा एक एक करून अशाप्रकारे पर्दाफाश होताना दिसताच, 'शूटआऊट अ‍ॅट जामिया'च्या नाट्याचा पद्धतशीर प्रयोग रचला गेल्याची दाट शंका आहेच. गोळीबार करणाऱ्या गोपाळची जानेवारीमध्ये दिल्ली निवडणुका जाहीर झाल्यानंतर एकाएकी सक्रीय झालेली फेसबुक प्रोफाईल असो वा एका फोटोमधील गोपाळच्या गळ्यातला काँग्रेसचा स्कार्फ, यांसारखी बरीचशी माहिती आता हळूहळू उजेडात येत आहे. त्यामुळे शरजील इमाम, शाहीनबागेवरून माध्यमांचे, सरकारचे आणि एकूणच हिंदुस्थानची दिशाभूल करण्यासाठी रचलेल्या या घटनेला कुटील षड्यंत्राचाच वास येतो. इतकेच नाही तर या घटनेनंतर इतरही काही संवेदनशील प्रश्न उपस्थित होतात.

 

आधीही म्हटल्याप्रमाणे हिंसेचे यत्किंचितही समर्थन करण्याचा प्रश्नच नाही, पण यानिमित्ताने अशा आंदोलनांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर लगाम कोण घालणार? ही जबाबदारी आंदोलकांची की पोलिसांची? विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआड अगदी कुणीही, इतक्या सहज घुसखोरी करून भर रस्त्यात बंदुकीतून गोळ्या झाडू शकत असेल, तर ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. त्यामुळे अशा घटनांचा फायदा घेणारे माथेफिरू भविष्यातही चाल करून आले, तर आश्चर्य वाटायला नको. कारण, मोर्चांना परवानगी नाकारल्यानंतरही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्यामागील काळबेरं नाकारून कसे चालेल? बरं, तो बंदुकधारी गोपाळ कोण, त्याच्या विचारसरणीचा नेमका रंग कोणता, यावरून माध्यमांमध्ये खमंग चर्चा झडत असताना, औरंगाबादमध्ये झालेल्या पोलिसांच्या मारहाणीचा कोणी एका चकार शब्दानेही साधा निषेधही नोंदवला नाही? जेएनयुच्या विद्यार्थ्यांना नुसते खरचटले तरी त्याची 'ब्रेकिंग न्यूज' करुन राईचा डोंगर करणाऱ्या माध्यमांना, या आंदोलनात दगडांच्या वर्षावात स्वत:चा जीव वाचवणाऱ्या पोलिसांच्या जीवाचे काहीच मोल नाही का? वरकरणी, तरी तसेच दिसते. म्हणूनच पोलिसांनी आंदोलकांच्या हातात बेड्या टाकण्याऐवजी, मुस्लीम महिलांना मुद्दाम पुढे करून पोलिसांचेच हात बांधण्याचा हा केविलवाणा प्रकार दुर्दैवीच!

 

त्यामुळे अशाप्रकारे काही धर्मांध मुसलमान रस्त्यावर उतरून बळजबरीने समाजाला जो वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्या 'जशास तशा' संतप्त प्रतिक्रिया साहजिकच उमटणार. अशाप्रकारे जर मूलतत्त्ववादी रस्त्यावर उतरणार असतील, तर त्याला उत्तर म्हणून मूलतत्तवादीच रस्त्यावर उतरतील, याची जाण ठेवायला हवी. कारण, 'सीएए', 'एनआरसी' का नको, याचं कोणतंही स्पष्टीकरण रस्त्यावर उतरलेल्या मुस्लीम आंदोलकांकडे आणि त्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्या हस्तकांकडेही नाहीच. मुंबईतील रझा अकादमीचाही हिंसक हिरवा मोर्चा जरा आठवून पाहा. हजारो किमी दूर म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात या रझाकारांनी मुंबईला वेठीस धरले होते. महिला पोलिसांच्या अब्रूवर हात टाकून 'अमर जवान ज्योती'सह कायदाही त्यांनी पायदळी तुडविला होता. त्यामुळे मुस्लीम समाजाची माथी भडकावून त्यांचा हवा तसा राजकीय स्वार्थासाठी वापर करण्याचेच प्रयत्न सध्या 'आझादी' आणि 'तुकडे तुकडे गँग'च्या माध्यमातून सुरू आहेत. खरं तर 'सीएए' असो वा 'एनआरसी', ते मुळातच मुस्लीमविरोधी नसून देशहितासाठीच आहेत. पण, उगाच मुसलमानांच्या मनात धर्मद्वेषाचे विष कालवून दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाललेला हा काही राजकीय पक्षांचा खटाटोप देशाचे सामाजिक स्वास्थ्य निश्चितच बिघडवणारा आहे. इतकेच नाही तर आप, काँग्रेसच्या आमदार, नेतेमंडळींचा या आंदोलनामागील छुपा आर्थिक सहभागही यापूर्वीच चव्हाट्यावर आला आहेच. आज या आंदोलकांविरोधात केवळ एक बंदुकधारी रस्त्यावर उतरला, उद्या अशाच प्रकारे दोन परस्पर विरोधी गट आमनेसामने आले, तर दंगलसदृश परिस्थिती उफाळून येईल. म्हणूनच सांगावेसे वाटते, सावध, ऐका पुढल्या हाका...

 
@@AUTHORINFO_V1@@