विकासाचा हा कसला मार्ग ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020   
Total Views |


nashik godakath_1 &n


मेट्रो प्रकल्प देशासाठी आदर्श ठरल्याने तिचा गौरव केंद्र सरकारनेदेखील करत याबाबत कौतुक केले. मात्र, दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतरण होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे साहजिकच नाशिकचे पालकत्वदेखील मंत्रिमंडळातील बहुबली (बाहुबली) नेत्यांकडे गेले. त्यांना असलेला सर्वंकष असा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव याचा फायदा नाशिककर नागरिकांना होईल, अशी आस होती. मात्र, चौकशीचा धाक असणारी व्यवस्था बदलण्यासाठी तोडफोड करून नवनिर्मिती करण्याकडे असलेला त्यांचा कल असे निर्णय समोर येऊ लागल्याने विकासाचा हा कोणता मार्ग असा प्रश्न आता नाशिककर नागरिकांना सतावू लागला आहे.


राज्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकमध्ये उत्पादित होणारा कृषिमाल, आध्यात्मिक, पर्यटनदृष्ट्या असणारे महत्त्व यामुळे नाशिक हे कायमचा भारताच्याच नव्हे तर जगातील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असते. नाशिकचे असणारे हेच महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेत नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात आधी सत्तेत असलेल्या भाजप सरकारनेदेखील नाशिकमध्ये विविध सोयीसुविधा निर्माण होण्यासाठी कार्य हाती घेत अनेकविध योजना नाशिकमध्ये राबविण्यास सुरुवात केली. तसे आखीव-रेखीव नियोजनदेखील त्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आले. यासाठी वेळप्रसंगी तज्ज्ञांची मदत घेत त्यांचे मार्गदर्शनदेखील घेण्यात आले. नुकतीच नाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आढावा बैठक पार पडली. यात त्यांनी मुंबई आणि पुण्यासोबत नाशिक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन केले. मात्र, मुंबई आणि पुणे येथे जाण्यासाठी नाशिकमधील ज्या द्वारका चौकातून मार्गस्थ व्हावे लागते. तेथे आताचे असणारे वाहतूक बेट तोडून मुंबई येथील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा उभी करण्याचा मनोदय नाशिकच्या पालकमंत्र्यांनी बोलून दाखविला. त्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाशी त्यांनी चर्चादेखील केली. नाशिककर जनतेने नुकताच अशोकस्तंभ ते त्र्यंबक रोड या 'स्मार्ट' रस्त्याचा 'जाच' सहन केल्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या मनोदयाप्रमाणे द्वारका येथे काम सुरू झाल्यास पुन्हा नवीन जाच नाशिककर नागरिकांना सहन करावा लागणार आहे. मुळात द्वारका येथे असणारे वाहतूक बेट हे अनेक वर्षापासून आहे. याच चौकात पुण्याच्या दिशेने, मुंबईहून जळगावच्या दिशेने आणि नाशिक रोडहून नाशिक शहराच्या दिशेने येणारी वाहने ही सतत चालू असतात. नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाताना द्वारका चौकापासून हाकेच्या अंतरावर भाभा नगरचा सिग्नल आहे. त्यामुळे द्वारका चौकात दाखल होणार्या वाहनांची संख्या नियंत्रित होण्यास मदत होते. अशा स्थितीत वाहतूक बेट काढून टाकणे कितपत सोयीचे आहे, हाच प्रश्न समोर येत आहे. वाहतूक बेट काढणे, पुन्हा नव्याने रस्ता तयार करणे, तेथे सिग्नल यंत्रणा उभारणे या सर्व कामांत जनतेचा पैसा आणि वेळ वाया जाण्याबरोबरच नागरिकांना प्रचंड मनस्तापदेखील सामोरे जावे लागेल, याचा विचार होणे आवश्यक आहे.

 

निश्चितच द्वारका चौकात वाहतूककोंडी होते. मात्र, त्यावर रोगापेक्षा भयंकर इलाजाची आवश्यकता नाही. गरज आहे सुयोग्य वाहतूक नियोजनाची. द्वारका चौकात रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग आहे. तसेच सर्व्हिस रोडदेखील आहे. उड्डाण पुलावर चढण्याचा मार्गदेखील आहे. या सर्व मार्गाचा नियमित आणि उत्तम वापर झाल्यास चौकातील वाहतूक समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल. शहर पोलिसांनी नुकतेच त्या दृष्टीने नियोजन करून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केवळ हाती अधिकार आले म्हणून असणारे सर्व काही तोडायचे आणि आपला विचार खरा करण्यासाठी नागरिकांच्या अडचणीत भर टाकायची हे योग्य आहे का, याबाबत विचारमंथन आणि आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. द्वारका येथील वाहतूक बेटाबाबत जेव्हा हा मनोदय व्यक्त केला गेला त्यावेळी तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई नाका येथील फुटबॉल ग्राऊंडसम असलेल्या सर्कलबाबत भाष्य का केले गेले नाही, हा प्रश्न नाशिककरांना निश्चितच सतावत असणार. द्वारकासारखीच वाहतूककोंडीची समस्या मुंबई नाका येथेदेखील सातत्याने अनुभवास मिळत असते. हे येथे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहर बस सेवा सुरू करण्याबाबत विचार करण्याचा सल्ला नाशिकच्या महापौरांना दिला. तसेच त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हटले. शहरवासीयांना सार्वजनिक वाहतुकीची साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था प्रयत्न करत असेल, तर शासन म्हणून या संस्थेच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असताना, चौकशीची धास्ती घालण्यात धन्यता का मानली जात आहे? हा प्रश्न यानिमिताने सुज्ञ नाशिककरांना सतावत आहे. यानिमिताने चौकशी त्या अनुषंगाने दाखल झालेले गुन्हे आणि केलेली तुरुंगवारी यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही, हे नक्की.

 

शहराच्या 'निओ मेट्रो'बाबतदेखील आडकाठीची भूमिका घेतली जाते. त्यासाठी मेट्रो इतका शहराचा विस्तार नाही, हे कारण दिले जाते. मात्र, नाशिक शहर आहे असेच राहणार आहे की आपण आहे असेच ठेवू इच्छित आहात? हा प्रश्न यानिमिताने पालकमंत्र्यांना विचारावासा वाटतो. शहराच्या विकासाबरोबरच मेट्रोचीदेखील 'एन्ट्री' झाली तर त्यात गैर काय आहे? हा प्रश्न यानिमिताने पुढे येत आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील समाविष्ट असणारे नाशिकचे सेना खासदार नाशिकच्या 'निओ मेट्रो' मार्गी लागावी म्हणून मुख्यमंत्र्यांना मागणीचे पत्र देतात आणि मुख्यमंत्रीदेखील त्यास सकारात्मक प्रतिसाद देतात. त्यामुळे सत्तेच्या मांदियाळीतील दोन पक्षांच्या वैचारिक मतभेदाची ओळख यानिमिताने सध्या नाशिककरांना होत आहे. नाशिक-औरंगाबाद रस्ता म्हणजे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पालकमंत्र्यांचा मतदारसंघदेखील याच मार्गावर आहे. मात्र, अजूनही हा रस्ता महामार्गाला साजेसा नाही. विकासाची कास धरलेली असताना हा रस्ता अद्याप उत्तम स्थितीत का आला नाही ? हादेखील एक प्रश्नच आहे. याशिवाय रस्त्याची कामे आणि तोडफोडीपेक्षा जिल्ह्यात उद्योग येणे, महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविणे हे जास्त महत्त्वाचे प्रश्न नाशिकनगरीत आहेत. त्याकडे लक्ष देऊन आणि मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत जे जे कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे ते ते कार्य कसे तडिस जाईल, याबाबत कार्य होण्याची आस नाशिककरांना आहे. त्यातच नाशिक साखर कारखाना आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे, शेतकरी वारंवार संकटांचा सामना करत आहे, शहरात नवीन उद्योग नाही अशा बाबींवर काम होणे जास्त आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झाली, तर, प्रदूषण होणार नाही. नवीन उद्योगधंदे आकर्षित होतील याचादेखील पालकमंत्र्यांनी विचार करणे आवश्यक आहे. तसेच गोदावरी स्वच्छता आणि संवर्धन हा मुद्दादेखील महत्त्वाचा आहे असे असताना असणारे रस्ते तोडणे, सर्कल तोडणे, सिग्नल यंत्रणा लावण्याचे उऱफाटे सल्ले देणे, नवनिर्मिती होत असताना चौकशीची भीती दाखवून काम सुरू होण्यापूर्वीच खोट घालणे हे किती संयुक्तिक? हे सर्व करून आपण विकास पुरुष होण्याचा अट्टाहास करत आहोत काय, हाच प्रश्न यामुळे पुढे येत आहे. दत्तक पित्याने काय केले, असे विचारताना आताचे पालक हे पालकत्व निभावत मागे उभे राहण्याऐवजी धाक दाखवत एकटे पाडण्याचाच प्रयत्न जास्त करत असल्याचेच यानिमिताने जाणवत आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@