उद्योगातून पर्यावरणरक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020   
Total Views |
Madhukar-Nailk_1 &nb
 


अ‍ॅक्वाकेम एन्वायरो इंजिनिअर प्रा. लि. यांच्यातर्फे पूर्नजीवित केलेला तळोजा सीईटीपी प्रकल्प 

उद्योगधंदे, कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असली तरी हेच उद्योगधंदे प्रदूषणाला आमंत्रण देऊन पर्यावरणाची हानी करताना दिसतात. मात्र, पर्यावरणाचा हाच र्‍हास रोखण्यासाठी मधुकर नाईक उद्योगात उतरले. 'अ‍ॅक्वाकेम एन्वायरो इंजिनिअर प्रा. लि.' या कंपनीच्या माध्यमातून उद्योगासह पर्यावरणरक्षणाचा आदर्श त्यांनी इतरांसमोर ठेवला आहे.

काही वर्षांपूर्वी नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा विषय राज्यभर गाजला होता. पर्यावरण संस्थांनीही या प्रकरणी हरकत घेत, या भागांत होणार्‍या सांडपाणी निचर्‍याला विरोध दर्शविला होता. 'एमआयडीसी'तर्फे 'तळोजा सीईटीपी' (सामाईक सांडपाणी प्रक्रिया) केंद्र उभारणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. नव्याने कार्यान्वित झालेल्या याच 'सीईटीपी' केंद्रामुळे तळोजातील प्रदूषण नियंत्रणाने वेग घेतला. या सर्व घडामोडींमागे महत्त्वाची भूमिका बजावणारा चेहरा म्हणजे 'अ‍ॅक्वाकेम एन्वायरो इंजिनिअर्स प्रा.लि.'चे व्यवस्थापकीय संचालक मधुकर नाईक...

 

 

मधुकर नाईक यांना पर्यावरण रक्षणासाठी काहीतरी करण्याची निकड भासत होती. उद्योेगधंद्यांमुळे निर्माण होणार्‍या प्रदूषणाला नियंत्रित करण्याचा व्यापक विचार करणे गरजेचे होते. याच हेतूने 'अ‍ॅक्वाकेम एन्वायरो इंजिनिअर्स प्रा.लि.'ची नाईक यांनी मुहूर्तमेढ रोवली आणि आज इतकी वर्षे सुरू असलेल्या या व्यावसायिक प्रदूषणाच्या लढाईला यश आले आहे.

 

मधुकर नाईक यांचा जन्म मूळचा मराठवाड्यातील निलंग्याचा. त्यांनी आपले शालेय शिक्षण निलंगा आणि अंबाजोगाईतून पूर्ण केले, तर रासायनिक अभियांत्रिकीतील शिक्षणासाठी मुंबईतील 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी'मध्ये प्रवेश घेतला. या संस्थेतील बरेचसे विद्यार्थी परदेशात गलेगठ्ठ पगाराची नोकरी मिळवून तिथे कायमचे स्थायिकही झाले. मात्र, नाईक यांनी शिक्षण घेऊन देशसेवेतच योगदान देण्याचा निश्चय केला होता. १९७६ साली नाईक यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले. अभियंता म्हणून सुरुवातीची सात वर्षे त्यांनी नोकरी केली. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून व्यवसायाची वीट रचणे, हे नाईक यांना कदापि मान्य नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात एक 'सल्लागार संस्था' म्हणून ते व्यवसायात उतरले. सहा वर्षे सल्लागार संस्थेच्या स्वरुपात व्यवसाय केल्यानंतर १९८९ साली 'अ‍ॅक्वाकेम एन्वायरो इंजिनिअर्स प्रा.लि.' या कंपनीची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली.

 


Taloja-CETP_1  


सल्ला देणे, जलप्रदूषण नियंत्रण, सांडपाण्याचा पुनर्वापर, सामाईक सांडपाणी नियंत्रणासह ११ प्रकारच्या सेवा सध्या 'अ‍ॅक्वाकेम एन्वायरो इंजिनिअर्स प्रा.लि.' तर्फे पुरवल्या जातात. याच धर्तीवर शून्य सांडपाणी निचरा करणारा प्रकल्प कार्यरत करून चालवण्याची तयारीही नाईक यांनी केली आहे. नाईक यांच्या व्यवसायात पत्नी उषा आणि मुलगी मंजिरी यांचाही मोलाचा वाटा आहे. सांडपाणी प्रदूषण नियंत्रण क्षेत्रात कार्यरत असणार्‍या 'अ‍ॅक्वाकेम एन्वायरो इंजिनिअर्स प्रा.लि.' आणि 'के. डी. पाटील कन्स्ट्रक्शन्स' यांच्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवामुळे तळोजा सीईटीपी (कॉमन एफ्लुएन्ट ट्रीटमेंट प्लान्ट) या केंद्राचे नूतनीकरण सुरू झाले. 'तळोजा सीईपीटी' प्रकल्प हा प्रदूषणामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकला होता. हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादापर्यंत गेल्यानंतर याबद्दल पर्यावरणप्रेमींमध्येही रोष होता. एमआयडीसीला या केंद्राचे नूतनीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान फार मोठे होते. मात्र, मधुकर नाईक यांचा इथवरचा प्रवास आणि स्वभाव पाहता ते हार मानणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या सहकार्‍यांना होता आणि झालेही अगदे तसेच!


Taloja-CETP_1  
 

नोव्हेंबर २०१८ मध्ये रितसर कंत्राट मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम नाईक यांच्याकडे सोपविण्यात आले. प्रकल्पाशी संबंधित अडचणींसाठी नाईक तयार होतेच. मात्र, त्याव्यतिरिक्त येणार्‍या अडचणीही होत्याच. इथे बसवण्यात आलेली यंत्रणा पावसाळ्यात तीनदा पाण्याखाली गेली होती. या प्रकारामुळे सर्व कामगारांचा धीर खचून गेला होता. मात्र, या प्रकरणी सुनावणी करणार्‍या निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी केलेल्या एका सकारात्मक वक्तव्यामुळे नाईक यांना एक ऊर्जा मिळाली.

 

Taloja-CETP_1  

''तुम्ही याकडे एक व्यवसाय म्हणून पाहता, पण आता एक 'मिशन' म्हणून पाहा," हे न्यायमूर्तींचं वाक्य प्रेरणा देऊन गेलं. सर्वजण पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले. 'के. डी. पाटील कन्स्ट्रक्शन'चे पाटील यांच्यासाठी या प्रकल्पाचे स्थान हे जन्मभूमी आणि कर्मभूमी होते. इथल्या प्रदूषणाची समस्या सुटल्याने त्यांनाही आनंद झाला. या कार्यात सहभागी होण्याचा मान मिळाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या सहभागात केंद्राचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. हा प्रकल्प संपूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर देशातील अद्ययावत 'सीईटीपी' प्रकल्प म्हणून गणला जाईल, असा विश्वास कंपनीला आहे. या प्रकल्पाने सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची एकूण २२.५ दशलक्ष लीटर इतकी क्षमता गाठली आहे व लवकरच ती २७.५ दशलक्ष लीटर इतकी क्षमता होईल. पर्यावरणरक्षणाच्या टप्प्याकडे वळताना एक खूप मोठे कार्य नाईक यांच्या हातून घडले. प्रदूषण नियंत्रण हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून यापुढील वाटचालीबद्दल नाईक म्हणतात की, "प्रदूषणाविरुद्ध हा त्यांचा लढा असाच सुरू राहील." विशेषतः जल प्रदूषण नियंत्रण हा त्यांचा मुख्य प्रांत आहे.


Taloja-CETP_1  

 
@@AUTHORINFO_V1@@