'क्लिक बीटल'चा पालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020   
Total Views |
tiger_1  H x W:

‘क्लिक बीटल’सारख्या सूक्ष्मजीवावर अभ्यास करून नुकतीच या जीवगटामध्ये ‘लॅम्प्रोस्पेफस सल्कॅटस’ या नव्या प्रजातीची भर घालणारे डॉ. अमोल प्रभाकर पटवर्धन यांच्याविषयी...

 
 
मुुंबई (अक्षय मांडवकर) -  'ढाल किडा’ म्हणजेच ’क्लिक बीटल’चा हा संशोधक. गेल्या १५ वर्षांपासून या कीटकांच्या गूढ साम्राज्याचा हा माणूस शोध घेत आहे. वाचनाच्या माध्यमातून त्यांची निसर्गाशी ओळख झाली. निसर्ग भ्रमंतीच्या निमित्ताने त्यांनी वन्यजीव संशोधन क्षेत्रात मुशाफिरी केली. ही मुशाफिरी केवळ ’क्लिक बीटल’पुरती मर्यादित ठेवून त्यात अमूल्य योगदान दिले. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी महाराष्ट्रातून ’क्लिक बीटल’च्या नऊ नव्या प्रजातींचा उलगडा केला आहे. वन्यजीव संशोधन क्षेत्रामध्ये दुर्लक्षित राहिलेल्या ’कीटकशास्त्र’ विषयात ते पारंगत आहेत. आज देशातील महत्त्वाच्या कीटकशास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नुकताच त्यांनी कोकणातून ’क्लिक बीटल’च्या नव्या प्रजातीचा शोध लावला. दुर्लक्षित विषयामध्ये काम करण्याची चिकाटी ठेवून एकाग्रपणे ध्येयाचा वेध घेणारा ’क्लिक बीटल’चा हा पालक म्हणजे डॉ. अमोल पटवर्धन.
 

tiger_1  H x W: 
 
 
ठाण्यातील सर्वसामान्य कुटुंबामध्ये दि. १३ फेब्रुवारी, १९७८ रोजी पटवर्धनांचा जन्म झाला. आई-वडील चोखंदळ वाचक असल्याने त्यांनाही वाचनाची गोडी जडली. ही गोडी पुढे निसर्ग, वन्यजीवन आणि पर्यावरणासंबंधी पुस्तक वाचनाकडे झुकली. वाचनातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे नववीत असताना त्यांनी ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ची आंतरशालेय वन्यजीव प्रश्नमंजुषा जिंकली. परंतु, केवळ वाचनापुरती मर्यादित असलेली निसर्गछंदाची त्यांची आवड महाविद्यालयीन वयात बहरत गेली. प्रसंगी एका टप्प्यावर कोणत्या विषयातून शिक्षण घ्यावे, याविषयी मनात गोंधळ निर्माण झाला. मात्र, जीवशास्त्र विषयाप्रतिचा रोख लक्षात घेऊन त्यांनी या विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणासाठी विषयांची निवड करताना दुर्लक्षित राहिलेल्या ’कीटकशास्त्र’ या विषयाने पटवर्धनांना खुणावले. त्यामुळे या विषयामधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. २००१ साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ’बीएनएचएस’मध्ये एका सागरी प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली. परंतु, विषय आवडीचा नसल्याने ते काम सोडून त्यांनी पीएच.डीची तयार सुरू केली. कीटकांमधील ’क्लिक बीटल’ या किड्यावर फार कमी अभ्यास झाल्याचे पटवर्धनांच्या लक्षात आले. त्यामुळे ’महाराष्ट्रातील क्लिक बीटल’ हा विषय त्यांनी पीएच.डीकरिता निवडला.
 
 

tiger_1  H x W: 
 
पीएच.डीच्या अभ्यासादरम्यान खर्या अर्थाने पटवर्धन कीटकांच्या विश्वात रममाण झाले. २००३ ते २००७ दरम्यान त्यांनी पीएच.डीचे काम पूर्ण केले. या दरम्यान त्यांनी वर्षभर ’भाभा अणुसंशोधन केंद्रा’तील एका प्रकल्पावर काम केले. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगालची भ्रमंती केली. या भ्रमंतीमागील निसर्गदर्शन हा मूळ हेतू असला, तरी त्याला ’क्लिक बीटल’च्या अभ्यासाची जोड होती. परंतु, पटवर्धनांचे पीएच.डीचे संपूर्ण काम आव्हानात्मक होते. कारण, ’क्लिक बीटल’वर भारतात फारच कमी काम झाल्यामुळे त्याविषयाचे साहित्य आणि किड्याचे नमुने उपलब्ध नव्हते. त्यावेळी केवळ एका बेल्जियमच्या डॉक्टरने ’बीटल’वर लिहिलेले फ्रेंच भाषेतील चार शास्त्रीय खंड उपलब्ध होते. भारतात या किड्यावर कोणीही अभ्यास न केल्यामुळे त्यांची ओळख पाकिस्तानमधील एका संशोधकाशी झाली. पाकिस्तानी संशोधकांकडून त्यांनी हे खंड मागवून घेऊन अभ्यास सुरू केला. परंतु, त्यामधील बरेसचे साहित्य फ्रेंच आणि जर्मन भाषेतील होते. त्यामुळे पटवर्धनांनी या दोन्ही भाषा मोघम स्वरूपात शिकून घेतल्या. पाच वर्ष ’क्लिक बीटल’वर अभ्यास केल्यानंतर २००७ मध्ये त्यांना ‘डॉक्टरेट’ मिळाली.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
२०१० मध्ये पटवर्धन सोमय्या महाविद्यालयात जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यापूर्वी २००८ पासूनच त्यांनी ’क्लिक बीटल’च्या नव्या प्रजातीच्या शोधार्थ महाराष्ट्र पालथा घालण्यास सुरुवात केली. गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये त्यांनी या ‘बीटल’च्या नऊ नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. मात्र, या संशोधनाचे काम बरेच वेळखाऊ असल्याचे पटवर्धन नमूद करतात. एखाद्या नव्या प्रजातीच्या नमुन्यावर अभ्यास करताना त्याच्या नावीन्याची खातरजमा करावी लागते. त्यासाठी त्याची इतर प्रजातींच्या नमुन्यांशी तुलना करणे आवश्यक असते. मात्र, भारतात ’क्लिक बीटल’चे नमुने उपलब्ध नाहीत. कारण, या किड्यावर इंग्रजांनी काम केले असल्याने बरेसचे नमुने हे परदेशातील संग्रहालयांमध्ये आहेत. शिवाय शास्त्रीय साहित्याचीदेखील अनुपलब्धता आहे. या दोन्ही गोष्टी परदेशातून मागविण्यासाठी बर्याच परवानग्या आणि वेळ लागतो. त्यामुळे ’क्लिक बीटल’वरील संशोधन वेळ आणि संयमाची परीक्षा घेणारे असल्याचे पटवर्धन सांगतात. २०१३ पासून ते ’संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त आढळणार्या ’क्लिक बीटल’वर संशोधनाचे काम करत आहेत. दोन वर्षांच्या या संशोधन कार्यात त्यांनी ’क्लिक बीटल’च्या अमूल्य ठेव्याचा शोध लावला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये यासंबंधीचा शोधनिबंध प्रकाशित होणार आहे. संशोधनाबरोबरच सध्या ते सोमय्या महाविद्यालयात ’कीटकशास्त्र’ विषयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे काम करत आहेत. सर्वसामान्य माणसांसाठी वाघ आणि बिबट्यांवरील अभ्यासापुरते मर्यादित असलेल्या वन्यजीव संशोधन क्षेत्रात आज पटवर्धन सूक्ष्मजीवांवर अभ्यास करून मोलाचे काम करत आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ’मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@