खगोल अभ्यासक व संशोधक नीलेश ओक यांचे प्रतिपादन
मुंबई : “महाभारत युद्ध सध्याच्या हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र-थानेसर परिसरात झाले. अनेक संशोधक महाभारत युद्धाचा काळ ५००० वर्षांपूर्वीचा सांगतात, परंतु, तत्कालीन खगोलशास्त्रीय प्रमाणांचा अभ्यास करता महाभारत युद्ध चालू कालगणनेच्या आधी ५५६१ वर्षे म्हणजेच ७५०० वर्षांपूर्वी झाल्याचे सिद्ध होते,” असे प्रतिपादन नीलेश नीलकंठ ओक यांनी केले.
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या वतीने लोकमान्य टिळक जन्मशताब्दीच्या नीमित्ताने वर्षभर चालणार्या व्याख्यानमालेचे आयोजन लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी करण्यात आले होते. सारस्वत बँक आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’ माध्यम प्रायोजक असलेल्या या व्याख्यानमालेचे हे सहावे पुष्प होते आणि यावेळी व्याख्याते म्हणून नीलेश नीलकंठ ओक ‘महाभारताचे युद्ध नक्की कधी आणि कुठे झाले?’ या विषयावर बोलत होते. मंचावर यावेळी लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे उपस्थित होते.
अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड सायन्समध्ये कार्यरत खगोलविज्ञान अभ्यासक आणि अतिप्राचीन भारतीय संस्कृतीचे संशोधक असलेल्या नीलेश ओक यांनी रामायणासह महाभारताच्या कालनीश्चितीसंदर्भाने संशोधन केले असून सिद्धांत मांडला आहे. आपल्या सिद्धांतातून समोर आलेली माहिती उपस्थित प्रेक्षकांना यावेळी त्यांनी दिली. रामायणाचा काळ चालू कालगणनेच्या आधी साधारण १२,२०९ वर्षे आहे, तर ऋग्वेदाचा काळ चालू कालगणनेच्या आधी साधारण २४ हजार वर्षे असल्याचे त्यांनी खगोलशास्त्रीय पुराव्याच्या आधारे दाखवून दिले.
महाभारतासंबंधाने नीलेश ओक म्हणाले की, “महाभारताची कालनीश्चिती करण्यासाठी मी जवळपास ३०० हून अधिक खगोलशास्त्रीय संदर्भांचा अभ्यास केला. माझ्या संशोधनानंतर महाभारताचा काळ आजपासून ७५०० वर्षे आधीचा असल्याचे सिद्ध झाले. परंतु, आपल्यापैकी अनेकजण भारतीय संस्कृतीचा उल्लेख करताना ५ हजार वर्षे आधी असा करतात, जे चुकीचे आहे. कारण भारतीय संस्कृती त्याआधीपासून अस्तित्वात आहे.”
दरम्यान, महाभारत कालनीश्चितीसाठी अरुंधती तारा वसिष्ठ तार्याला मागे टाकतो आणि भीष्म नीर्वाणाचे शरशय्येवरचे ९२ दिवस आपल्या संशोधनासाठी बहुमोल पुरावा म्हणून सिद्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. आर्किओलॉजीचे पुरावे फार ग्राह्य धरण्यायोग्य नसल्याचेही ते यावेळी म्हणाले, कारण त्यात सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार होतो.
कार्यक्रमाच्या अखेरीस मुकुंद चितळे यांनी नीलेश ओक यांच्या अभ्यास, संशोधन व व्यासंगाचे कौतुक केले. तसेच व्याख्यानमालेचे उद्दिष्टही विशद केले.
जय वगैरे काही नाही!
“महाभारताच्या आधी जय नावाचा ग्रंथ होता. जय या छोट्या ग्रंथात नंतर भर घालून १ लाखहून अधिक श्लोकांचे महाभारत रचले गेले, असे म्हटले जाते. परंतु, त्याला काडीचाही आधार नाही,” असेही नीलेश ओक यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी आर्य आक्रमण सिद्धांत चुकीचा व नीराधार असल्याचे सांगितले.” सोबतच सूर्यसिद्धांत व आर्यभटीय सिद्धांतानुसार वारांची पद्धती साधारण १७ हजार वर्षे जुनी असल्याचेही ते म्हणाले.