नवी दिल्ली : दिल्लीतील जामिया परिसरात अज्ञात माथेफिरूकडून गोळीबार करण्यात आला असून, या गोळीबारात विद्यार्थी जखमी झाला आहे. नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान एका माथेफिरू तरुणाने गोळीबार केला, अशी माहिती मिळाली आहे.
सीएए आणि एनआरसी विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापाठीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने, निदर्शने सुरू आहेत. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जामिया विद्यापाठ ते राजघाट मार्गादरम्यान मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात एका अज्ञात माथेफिरू तरुणाने गोळीबार केला. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. अज्ञात माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आमचा मोर्चा सुरु असताना अचानक एक तरुण अचानक समोरच्या दिशेने आला आणि हवेत गोळीबार करत म्हणाला, "या...मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो आणि मग त्याने गोळी झाडली."
शेजारी उभा असलेल्या शादाब आलम या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्याला गोळी लागली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी जामिया ते राजघाटपर्यंत आंदोलन करण्याला परवानगी नाकारली होती तरीही निषेध करण्यासाठी स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत.