रिक्षा माझी सखीसोबती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |
MANSA_1  H x W:





महिला रिक्षाचालक म्हणून स्वाभिमान, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कल्पना पवार आपला संसारगाडा हाकत आहेत. मुंबईच्या भांडूप उपनगरातील पहिल्या महिला रिक्षाचालक ठरलेल्या कल्पना पवार यांच्या आयुष्याची ही कहाणी...

‘ती’ महिला रिक्षाचालक आहे म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या, काही जणांनी नाकं मुरडली, काहींनी आश्चर्य व्यक्त केलं, तर पुरुष रिक्षाचालकांनी चक्क “अरे हे काय बाईचं काम आहे का? दोन दिवसांत कंटाळून घरी बसतील,” अशा तिरकस टोमणेबाजीलाही त्यांना सामोरं जावं लागलं. टीकाटिप्पणीच्या या भाऊगर्दीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे, हे कोणत्याही महिला रिक्षाचालकासाठी तसं आव्हानचं. मात्र, हेच आव्हान मुंबईतील भांडूपच्या कल्पना पवार यांनी स्वीकारलं, आणि केवळ स्वीकारलचं नाही, तर ‘हम किसीसे कम नही’ म्हणत तीनचाकी रिक्षा घेऊन त्या रस्त्यावर उतरल्या.


मूळच्या सातार्‍याच्या कल्पना यांचा विवाह भांडूपमधील श्रीधर पवार यांच्याशी झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. कल्पना यांचे पती श्रीधर पवारदेखील टॅक्सीचालक. कल्पना यांचे शिक्षणही फारसे नसल्याने त्यांना मनासारखी नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे अखेरीस त्यांनीही रिक्षा चालविण्याचे ठरविले. कल्पना यांना चारचाकी चालविता येत होती, मात्र मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात तीनचाकी रिक्षा चालविण्याचा अनुभव त्यांना अजिबात नव्हता.. रिक्षा चालविण्याविषयीची कल्पना त्यांनी घरी सांगितली. याकरिता घरातूनही त्यांना प्रोत्साहनच मिळाले. उलट त्यांचे पती श्रीधर यांनी कल्पना यांना रिक्षा चालवायला शिकवलीसुद्धा. कल्पना यांनी पहिल्यांदा भाड्याची रिक्षा घेऊन सुरुवात केली खरी, पण प्रारंभीच त्यांना काही अडीअडचणींना सामोरे जावे लागले.


एक महिला रिक्षा चालवतेय, हे भांडूपमधील काही जुन्या मताच्या नागरिकांना आणि खासकरून पुरुष रिक्षाचालकांना पटणारं नव्हतंच. पण, आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कल्पना यांनी कंबर कसली आणि या प्रवासात त्या अजिबात खचल्या नाहीत की मागे हटल्या नाहीत...


आपला संसार अगदी व्यवस्थित सांभाळून कल्पनाताई रिक्षा चालवतात. सकाळी १० पर्यंत घरातली सगळी कामे आवरून त्या रिक्षा चालवायला घराबाहेर पडतात. दुपारी २ पर्यंत रिक्षा चालवून पुन्हा सायंकाळी ६ वाजता त्यांची तीनचाकी सवारी सुसाट निघते. रात्री साडे अकरा किंवा लांबचे भाडे असेल तर घरी यायला त्यांना उशीरही होतो. मात्र, दोन पैसे जास्त मिळाल्याचे तेवढेच समाधान त्यांना सुखावून जाते. दिवसभर एवढे कष्ट घेऊन दिवसाला किमान एक हजार रुपयांची कमाई होत असल्याचेही कल्पना सांगतात. तेव्हा, घरातील सर्व सदस्यांच्या पुढाकारामुळेच हे काम करायला मिळाल्याचा कल्पना यांना सार्थ अभिमान आहे.


मात्र, कल्पना यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केल्यानंतर त्यांना प्रारंभी अनेक बरेवाईट अनुभव आले. पण, त्याचबरोबर त्यांना रिक्षा चालवताना बघून अनेक महिलांनी आणि पुरुषांनीही कौतुक केल्याचे त्या अभिमानाने सांगतात. सुरुवातीला या सर्व महिला रिक्षाचालकांना पुरुष रिक्षाचालकांकडून त्रास दिला जायचा. या महिला रिक्षाचालकांमुळे त्यांचा रिक्षाचा व्यवसाय बसला, असे पुरुष रिक्षाचालकांचे म्हणणे. मात्र, हळूहळू का होईना, पुरुष रिक्षाचालकांनीही त्यांना स्वीकारलेच.


कल्पना सांगतात की, “रिक्षा चालवताना माझा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. रिक्षा चालविताना अनेक अडचणीसुद्धा येतात. नैसर्गिक विधींसाठी अडचणही होते. कारण, प्रत्येक ठिकाणी महिला शौचालयांची व्यवस्था असलेच असे नाही.”


रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कल्पना यांना इतर वाहनचालकांप्रमाणे कंबर, मणकेदुखीच्या त्रासालाही सामोरे जावे लागले. आरोग्यविषयक तक्रारींबरोबर कल्पना यांना भांडूपच्या रहदारीत रिक्षा चालवण्याचे एक दिव्यच पार करायला लागायचे. अनुभव नसल्याने चुकाही व्हायच्या. मात्र, आता थोडी सवय झाल्याने रिक्षा चालवण्याचा त्रास कमी झाल्याचे कल्पना सांगतात.


आज कल्पना यांना रिक्षा चालवून तीन वर्षं पूर्ण झाली. सुरुवातीला भाड्याने रिक्षा चालविणार्‍या कल्पनाताईंनी स्वकमाईतून रिक्षा विकतही घेतली. त्यामुळे पतीसह, मुलांनाही त्यांच्या आईचा अभिमान वाटतोच. आपली आई काही तरी वेगळे करतेय, याचे त्यांना विशेष अप्रूप वाटते. भांडूपमध्ये सुरुवातीला फक्त दोन महिला रिक्षाचालक होत्या. आज त्यांची संख्या जवळपास १५च्या घरात आहे आणि यापुढेही ती वाढेलच, यात शंका नाही. कारण, कल्पना केवळ स्वत:च्या पायावर उभं राहून नामानिराळ्या झाल्या नाहीत, तर त्यांनी अनेक महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. त्या इतर महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षणही देतात. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने कित्येक अनेक महिला आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळत आहेत.कल्पना त्या प्रत्येक महिलेसाठी आदर्शवत आहेत, ज्यांना शिक्षणाअभावी नोकरीची वाट धरता आली नाही. पण, त्यांनी रिक्षा चालवण्याचा पर्याय निवडून आपला वेगळा मार्ग निवडला. काही महिला घरच्यांचा विरोध पत्करूनही हे काम करीत आहेत.


कोणतेही चांगले काम करताना नकारात्मक गोष्टी प्रत्येकाच्या वाट्याला येतात. मात्र, त्यातून मार्ग काढण्याची प्रेरणा कल्पना यांच्या जीवनप्रवासावर नजर टाकल्यावर मिळते. कल्पनाताईंना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून अनेक शुभेच्छा!

- कविता भोसले
@@AUTHORINFO_V1@@