रोमांचकारी ‘सुपरओव्हर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |
cricket_1  H x

हॅमिल्टन येथील मैदानावर झालेल्या सुपर-ओव्हर सामन्याने क्रिकेट रसिकांची उत्कंठा पुन्हा एकदा शिगेला पोहोचली. पूर्ण ‘पैसा वसूल’ आणि अगदी रोमांचकारी सामना अशी अनुभूती क्रिकेटप्रेमींना आली. २०१९च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर यंदाच्या वर्षी सुपर-ओव्हरमध्ये एखाद्या सामन्याचा निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या सामन्यात भारतीय संघाने अंतिम टप्प्यात उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. टी-२० सामन्यांमध्ये यापूर्वीही अनेकदा सामन्यांचा निकाल सुपर-ओव्हरमध्ये लागण्याची परंपरा आहे. आत्तापर्यंत एकूण १७ सामन्यांमध्ये दोन्ही संघांची धावसंख्या एकूण बरोबरीत सुटली असून त्यांचा निकाल सुपर-ओव्हरमध्ये लावण्यात आल्याचा इतिहास आहे. २००५ सालापासून म्हणजेच जवळपास १५ वर्षांआधी टी-२० क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात झाली. १७ फेब्रुवारी, २००५ साली क्रिकेट विश्वात पहिलावहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळविण्यात आला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये हा पहिला सामना पार पडला. त्यानंतर अनेक देशांनी या क्रिकेट प्रकाराचे स्वागत करत या सामन्यांच्या मालिकांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. भारताने २००६ साली आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला टी-२० सामना खेळला. आपला पहिला सामना जिंकण्यात भारतीय संघ यशस्वीही झाला. मात्र, २००७ सालच्या आपल्या पहिल्याच टी-२० सामन्यात भारताला ‘बॉल आऊट’ची परीक्षा द्यावी लागली. पाकिस्तानविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्याने ‘बॉल आऊट’मध्ये सामन्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने पाकिस्तानला धोबीपछाड देत ‘बॉल आऊट’ प्रक्रियेत पहिला विजय संपादन करण्याचा मान मिळवला. २००८ सालानंतर मात्र आयसीसीने नियमांत बदल करत ‘बॉल आऊट’ प्रक्रियेऐवजी सुपर-ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लावण्याची पद्धत रुजू केली. त्यानंतर आत्तापर्यंत क्रिकेट विश्वात १४ सामने सुपर-ओव्हरमध्ये निकाली काढण्यात आले असून केवळ तीन सामन्यांमध्ये ‘बॉल आऊट’ प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ‘बॉल आऊट’ प्रक्रियेत सामना रंगत नसल्यानेच ‘सुपर-ओव्हर’ ही पद्धत आयसीसीने लागू केली. म्हणूनच ‘सुपर-ओव्हर’ म्हणजे रोमांचकारी सामनाच असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.



हारी बाजी को जितना...

वह सिकंदरही दोस्तो कहलाता है...
हारी बाजी को जितना जिसे आता है...
या सिनेमातील गाण्यांच्या ओळी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्तृत्वाला तंतोतंत लागू होतात. न्यूझीलंडच्या भूमीत नुकताच इतिहास रचणार्‍या भारतीय संघाने क्रिकेटमधील ‘सिकंदर’ आपणच असल्याचे दाखवून देत आगामी टी-२० विश्वचषकाचे दावेदारही असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. न्यूझीलंडच्या संघाचा त्यांच्याच भूमीवर ‘३-०’ असा पराभव करत भारताने आपल्या मागील पराभवाचा वचपाही काढला. गेल्या वर्षी इंग्लंडच्या धर्तीवर झालेल्या या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले होते. भारतीय संघाचे पारडे हे न्यूझीलंडच्या संघापेक्षा जड होते. तरीही पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने भारतीय संघाला कमी धावसंख्येचे आव्हान पेलवले नाही. परिणामी, भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर झाला. भारताला विजय न मिळवून देता आल्याची सर्वाधिक खंत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आहे. त्या सामन्यानंतर धोनीने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलेले नाही. त्यामुळे पराभवाचा वचपा काढणे, हे फार महत्त्वचे होते. हॅमिल्टन येथील तिसर्‍या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ‘सुपर-ओव्हर’मध्ये मिळविलेला विजय हा फार प्रशंसनीय आहे. भारतीय संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने ४८ चेंडूंत ९५ धावांची खेळी साकारली. विल्यमसनच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडचा संघ हे आव्हान सहज पूर्ण करेल, असे चित्र सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात होते. अखेरच्या षट्कात न्यूझीलंडच्या संघाला ४ चेंडूंत केवळ दोन धावांची गरज होती. संघाकडे ६ गडीही होते. त्यामुळे हा सामना भारत जिंकेल, याची आशा फार कमीच होती. मात्र, मोहम्मद शमीने चतुराईने गोलंदाजी करत हा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांची धावसंख्या समान असल्याने ‘सुपर-ओव्हर’मध्ये या सामन्याचा निर्णय लागला. ‘सुपर-ओव्हर’च्या अंतिम टप्प्यात ‘हिटमॅन’ रोहित शर्माने प्रतिस्पर्ध्यांच्या घशातून विजयाचा हार कसा हिरावून घेता येतो हे दाखवून दिले. अशक्यप्राय गोष्ट शक्य करणार्‍या या संघाचे कौतुक करावे तितके कमीच.


- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@