संस्कारधन फुलविणारी ’संस्कार निकेतन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020   
Total Views |

godakath_1  H x



शिक्षण... या तीन अक्षरी शब्दांत अवघ्या मानवजातीचे जीवन सामावले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून केवळ ज्ञान नव्हे, तर संस्कारांची बीजे पेरली जाणे आणि त्या शिदोरीवर भविष्यातील वर्तन फुलणेदेखील अभिप्रेत आहे. आधुनिक काळात असलेल्या जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी संधी उपलब्ध करून देणार्‍या अनेक शाळा आहेत. मात्र, गोदाकाठी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शौर्याने सामना करण्याची उर्मी लहान वयातच विद्यार्थ्यांच्या ठायी देणारी आणि खर्‍या अर्थाने जीवनमूल्यांची जोपासना करणारी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक संस्कार निकेतन-एक परिपूर्ण शाळा सन २००५ पासून अविरत आपले व्रत निभावत आहे.


माई सोसायटी संचालित पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक संस्कार निकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी वाळेकर या शाळेचे स्वरूप सांगतात की
, “शाळा सुरू करायची म्हणून या शाळेची सुरुवात झाली नाही. भोंसला सैनिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विष्णू पवार यांच्या संकल्पनेतून समविचारी व्यक्तींचा समूह एकत्र आला व त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करत संस्कारबीज रोवण्यास सुरुवात केली. जसे संस्कार संवर्धन उत्सव, अभ्यासवर्ग आदींचे आयोजन हा समूह करत असे. समूहातील पालकांनी आपल्या पाल्यासाठी सुरू केलेले हे उपक्रम पाहून इतर पालकांनी आपल्या अपत्यांसाठीदेखील आग्रह धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे मनुष्यबळ वाढले व त्यातून संस्कारधन फुलविणार्‍या संस्कार निकेतन - एक परिपूर्ण शाळेचा खर्‍या अर्थाने जन्म झाला. या शाळेत सो कॉल्ड सर, मॅडम पद्धत नाही. तर विद्यार्थी शिक्षकांना ताई, दादा या विशेषणाने संबोधतात. त्यामुळे या उच्चारापासूनच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात बदल केला जातो. शिक्षकांसाठी बी अ‍ॅण्ड मेक हे तत्त्व येथे अनुसरले जात आहे. जे नियम विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत, तेच नियम येथे शिक्षकांसाठीदेखील लागू आहेत. जसे, सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी शाळेचे द्वार बंद केले जाते. त्यानंतर येणार्‍या शिक्षकालादेखील विद्यार्थ्यांप्रमाणे घरी जावे लागते. येथे विद्यार्थ्यांसमवेत नियमितरित्या शिक्षकदेखील सूर्यनमस्कार घालतात. विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येत खेळाच्या तासाला खेळ खेळतात. येथील शिक्षकांचा विश्रांती कक्ष बर्‍याचदा रिकामा असतो. कारण, शिक्षक आणि विद्यार्थी दररोज एकत्र डब्यातील जेवण घेत असतात.


विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता वृद्धिंगत व्हावी
, त्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारज्ञानदेखील समजावे तसेच, सामाजिक जडणघडणीची माहिती व्हावी व त्यांचा सर्वंकष दृष्टिकोन विकसित व्हावा, याकरिता कुंभार चांभार यांचे कार्यस्थळ, बाजार, डॉक्टर यांच्या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात येत असते. याशिवाय दिवाळी, गणपती, राखी पौर्णिमा यावेळी विद्यार्थी विविध वस्तूंची निर्मिती त्याचे दर स्वतःच ठरवत विक्री करत असतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वत्वाची जाणीव होण्यास मदत होते.


याशिवाय
‘वसुंधरा दर्शन’ या उपक्रमाच्या माध्यमातून भूगोलाचा अभ्यास इयत्तापरत्वे तालुका, विभाग आणि राज्याच्या सीमेवर प्रत्यक्ष करवून घेतला जातो. पहिल्या सत्राच्या शेवटच्या दिवशी शाळेत सर्व विद्यार्थी शाळेत मुक्कामाला येत असतात. यावेळी कोजागिरी साजरी होते, शेकोटी होते, आकाशदर्शन, शिक्षकांसमवेत चर्चा या माध्यमातून मैत्रपूर्ण भाव जपण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होते. यावेळी शिक्षक गोष्टी सांगून विद्यार्थ्यांच्या शेजारी झोपतात. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात भावबंध निर्माण होण्यास मदत होते. शाळेतील मुले धीट आणि स्वावलंबी बनत असून पालकदेखील शाळेच्या या उपक्रमांचे कौतुक करताना दिसतात. इयत्ता चौथीच्या एका शाळेतील विद्यार्थिनीला शाळेत जाण्यात रस नव्हता. ती सुमारे सहा महिने शाळेतच गेली नाही. तिला जेव्हा या शाळेत दाखल केले, तेव्हा तिच्यात शिक्षणाची आवड निर्माण झाली व ती आता नियमित शाळेत येत आहे. हेच शाळेचे फलित आहे, असे वाटते.


या शाळेत प्रार्थना झाल्यावर मुले स्वतःला सकारात्मक सूचना देतात
. “मी शूर आहे, मी करू शकते, माझ्यात देव वसलेला आहे, देव माझी प्रत्येक कृती पाहत आहे,” या सूचनेमुळे शाळेतील इयत्ता दुसरीचा एक विद्यार्थी पडला असता त्याला मोठी जखम झाली, मात्र तो रडत नव्हता, हे पाहून डॉक्टर अवाक् झाले, तेव्हा त्याने डॉक्टरांना सांगितले की, शाळेत मी शूर आहे, हे म्हणतो, मग मी रडू कसा?


शाळेत प्रवेश करताच शरीराला बळकटी आणणारी आणि साहसमूल्य वृद्धिंगत करणारी खेळणी आपल्या सहज दृष्टीपथात येते
. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे इतर शाळेतील सवंगडी त्यांना जे मिळत नाही, ते या शाळेत मिळत असल्याने भाग्यवान समजतात. ही शाळेच्या कार्याची पावती असल्याचे मुख्याध्यापिका आवर्जून नमूद करतात.


godakath_1  H x


पालकांना त्यांच्या पाल्यांना नेहेमीच स्पर्धेत सहभागी करायला आवडते हेच एक आव्हान असल्याचे पल्लवी वाळेकर सांगतात. मात्र, संस्कार निकेतनमध्ये इयत्ता ७ वी पर्यंत स्पर्धाच नसून ७ वी, इयत्ता ८ वीसाठी कोणत्याही शाळेत प्रवेश घेतला तरी या संस्काररूपी धनामुळे हे विद्यार्थी आपली चमक दाखवितात. शाळेत प्रविष्ठ प्रत्येक विद्यार्थी हा मंचावर आलाच पाहिजे, या आधारावर आणि विशिष्ट संकल्पनेवर या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेषत्वाने आखणी केली जात असतेआज शाळेत २३० विद्यार्थी शिक्षण घेत असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष देता यावे, यासाठी पूर्व प्राथमिकच्या एका वर्गात १५ तर, इयत्ता पहिलीच्या पुढे २५ अशी विद्यार्थी संख्या आहे१६ शिक्षक संस्कारबीज फुलविण्याचे कार्य करत आहेत. राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असला तरी, संस्कृत अभ्यासक्रम खेळवाडीपासून देण्यात येतो


विद्यार्थी हा आतून फुलणे आवश्यक आहे
. त्यांच्या विकासाप्रती पालकांनी संयम ठेऊन कृती करणे आवश्यक असल्याचे मत मांडताना मुख्याध्यापिका या शाळेत याच मूल्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे सांगतात.



पंचरंगी विकासासाठी शिक्षण :


शाळेतील शिक्षण हे पंचरंगी विकासासाठी दिले जाते
. यात पुढील घटकांचा समावेश असतो.


राजकीय शिक्षण
: अस्मिता, राष्ट्रनिष्ठा, कर्तव्य आणि हक्काची जाणीव यावर आधारित आहे. यासाठी विद्यार्थी संसद प्रणाली असून यात पहिली ते सातवीचे विद्यार्थी निडणुकांचे आयोजन करतात. यात गुप्त मतदान होते. तसेच राष्ट्रीय उत्सवाचे नियोजन वर्गाकडे सोपविण्यात येत असते. त्याचे नियोजन आणि यशस्वी आयोजनाची जबाबदारी विद्यार्थी पेलतात.

मूल्यवृद्धीसाठी शिक्षक आणि मुले मिळून शाळेची स्वच्छता करतात. शाळेत शिपाई नसून मुख्याध्यापकदेखील हाती झाडू घेऊन शाळा स्वच्छ करतात.


आर्थिक
: शारीरिक सुदृढता, कौशल्यप्राप्ती, श्रमप्रतिष्ठा यावर भर देत उपक्रम हाती घेतले जातात.


भावनिक
: ईश्वर श्रद्धा, मनुष्याप्रती आदरभाव, मनाची कणखरता यासाठी योग, स्नेहभाव वाढविणारे उपक्रम शाळा राबवित आहे.


आध्यात्मिक
: स्वत्वाची ओळख, सृष्टीची ओळख, ईश्वर सान्निध्याची जाणीव यासाठी क्षेत्रभेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात भाव जागृत केले जातात.


सामाजिक
: समानता, बंधुभाव आणि नीतिमत्ता या मूल्यांसाठी जेवण एकत्र केले जाते.


सर्वच आर्थिक आणि सामाजिक स्तरातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून पाच ते सहा हजार पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय शाळेत आहे
. शिकण्याची तयारी असणारे शिक्षक येथे आपली सेवा देत आहेत. खर्‍या अर्थाने शिक्षणाचा अर्थ समजलेली आणि घडविणारी शाळा म्हणून ही शाळा सर्वार्थाने वेगळी ठरते.

@@AUTHORINFO_V1@@