महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाची ‘साठी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |

pg8_1  H x W: 0



दि. ७ जानेवारी रोजी ६०व्या राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यांच्याच हस्ते विविध सन्मान आणि गौरव प्रदान केले जाणार आहेत. तेव्हा या ऐतिहासिक प्रदर्शनाची पार्श्वभूमी आणि स्वरूप यांवर प्रकाश टाकणारा हा लेख...


महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनहा कलानुभव म्हणजे महाराष्ट्रातील कलाकारांसाठी एक हक्काचे कला व्यासपीठ. जून १९६५ साली जेव्हा तत्कालीन शिक्षणमंत्री आणि कलेबद्दल नितांत आवड तसेच श्रद्धा असणारे कलाप्रेमी बाळासाहेब तथा मधुकरराव चौधरी आणि दादा आडारकर यांच्या सकारात्मक विचारमंथनातून केवळ चारच दिवसांत ‘कलासंचालनालया’चा आकृतीबंध आराखडा करून देशातील पहिले आणि आजही देशातील एकमेव असे कलासंचालनालय स्थापन करण्यात आले.


सर जेजे स्कूलचे तत्कालीन अधिष्ठाता दादा आडारकर हे कलासंचालनालयाचे पहिले कलासंचालक बनले. तेव्हापासून मधली चार वर्ष वगळता या वर्षापर्यंत राज्य कला प्रदर्शन ‘विद्यार्थी विभाग’ आणि ‘कलाकार विभाग’ अशा दोन विभागांद्वारे शासनातर्फे आयोजित केले जाते. वर्ष २०२० हे या आगळ्यावेगळ्या शासकीय उपक्रम असलेल्या राज्य कलाप्रदर्शनाचे ६० वे वर्ष...


महाराष्ट्रातील चित्रकार-शिल्पकार आणि उपयोजित कलाकार यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने निर्माण झालेल्या कलासंचालनालयाने निर्माण केलेले अनेक कलाकार देश-विदेशात महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कलासंस्कृतीचा वारसा जपत आहेत. सर्वांचीच नावे कथन करायची झाल्यास मोठा संदर्भग्रंथच निर्माण होईल. परंतु, या राज्याचा राजा अर्थात या राज्याचा मुख्यमंत्री या कलासंचालनालयांतर्गत असलेल्या सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. ही ओळख, या कलासंचालनालयाच्या महानतेचे वर्णन करण्यासाठी पुरेशी आहे.


pg8_1  H x W: 0


यंदाच्या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून एकूण ५९० कलाकृती या विभागाकडे प्राप्त झाल्या. पैकी २१४ कलाकृतींची निवड, खास परीक्षकांकडून परीक्षण करून करण्यात आली, ज्या कलाकृती या राज्य कला प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आहेत. उपयोजित कला विभाग, चित्रकला विभाग शिल्पकला विभाग, मुद्राचित्रण (ग्राफिक कला) विभाग, धातुकला व अंतर्गत गृहसजावट अशा विविध तंत्र व शैली विभागांद्वारे कलाकार त्यांच्या कलाकृती सादर करतात. याशिवाय खास महिला कलाकारांसाठी एक पारितोषिक असून अपंग/दिव्यांग कलाकारासाठीही एक पारितोषिक जाहीर झाले आहे. रुपये ५० हजार प्रत्येकी अशा एकूण १५ कलाकारांच्या कलाकृतींची निवड रोख पारितोषिके तसेच प्रशस्तिपत्रके या स्वरूपात प्रदान करण्यासाठी झालेली आहे. रु. ७ लाख, ५० हजार एवढी रक्कम रोख स्वरूपात कलाकारांना देण्यात येणार असून महाराष्ट्र शासनातर्फे एका ज्येष्ठ कलाकाराचा यथोचित सन्मान केला जातो. यावर्षी ज्येष्ठ कलाकार अरुण मोरघडे यांना शासनातर्फे रु. १ लाख रुपये रोख पुरस्कार, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळासह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येत आहे. मोरघडे यांचे कला क्षेत्रातील कार्य आणि कलाविषयक योगदान यांचा विचार शासन नियुक्त समितीने करून त्यांची निवड केली आहे. याशिवाय या वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडून ‘कै. वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ हा रु. ५ लाख रोख, सन्मानपत्र स्वरूप असलेला सन्मान ‘पद्मभूषण’ अकबर पदमसी यांना प्रदान करण्यात येणार आहे.


एकूणच ६० वे वर्ष हे वेगळ्या नकारात्मक आशयासाठी उल्लेखिले जाते. कलासंचालनालयासाठी किमान पुरस्काराच्या रकमांची संख्या ५ ते १० पट वाढविल्यामुळे का होईना, परंतु ६० वे वर्ष हे तारुण्य घेऊन आलेले आहे, असे कलाक्षेत्रातून बोलले जात आहे.


तैलरंग, अ‍ॅक्रेलिक रंग, जलरंग, चारकोल, टेराकोटा व धातू, दगड, कागद, कॅनव्हास, पत्रा (धातू), पेन्सिल, पेस्टल, इंक अशा विविध रंगमाध्यमे आणि पार्श्व अर्थात पृष्ठभागावर विविध शैलीतील सुमारे २१४ कलाकृती एकाचवेळी जहांगीर कलादालनात पाहण्यास वा खरेदी करण्यास मिळणार आहेत. ही फारच दुर्मीळ योगायोगाची संधी आहे.


‘कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’चे प्राचार्य व कलासंचालनालयाचे प्रभारी कलासंचालक प्रा. राजीव मिश्रा आणि प्रदर्शन अधिकारी म्हणून काम पाहणारे संदीप डोंगरे यांच्यासह सर्व सहाध्यायी वर्गाने या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केलेले आहे.

- प्रा. गजानन शेपाळ

 

@@AUTHORINFO_V1@@