'रामसर' दर्जा प्राप्त नांदुरमधमेश्वर अभयारण्यासमोरील आव्हाने कायम !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2020   
Total Views |
tiger_1  H x W:
राज्यातील पहिले 'रामसर' स्थळ 
जैवसमृद्धतेने परिपूर्ण असलेल्या पाणथळ जागांच्या सर्वांगीण संवर्धनाकरिता त्या जागांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ’रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात येतो. महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यातील ’नांदुरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य’ नुकतेच ’रामसर’ स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे राज्यातील पहिलेच ’रामसर’ स्थळ आहे. ’रामसर’ म्हणजे काय? तर, १९७१ साली इराणमधील ’रामसर’ शहरात ‘रामसर परिषद’ पार पडली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. यासाठी पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा करण्यात आला. भारताने ’रामसर’ करारावर १९८२ साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले. सध्या जगातील २,४१० पाणथळींना ’रामसर’चा दर्जा प्राप्त आहे, तर गेल्या ३५ वर्षांमध्ये भारतातील २७ पाणथळींना ’रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला आहे. त्यामध्ये प्रथमच महाराष्ट्रातील पाणथळीचा समावेश झाला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यामधील गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर वसलेले नांदुरमधमेश्वर अभयारण्य पक्ष्यांच्या जैवविविधेकरिता प्रसिद्ध आहे. १९०७ ते १९१३ च्या दरम्यान या संगमावर मोठा बंधारा बांधण्यात आला. गेल्या शतकभरात त्यामध्ये गाळ साचून पाणवनस्पतींची वाढ झाली. त्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांकरिता खास करून स्थलांतरित पक्ष्यांसाठी उत्कृष्ट अधिवास निर्माण झाला. १९८६ साली नांदुरमधमेश्वरला ‘वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. १० गावांतील ११९८.६५७ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यात २६५ प्रजातींचे पक्षी आढळतात. यामधील १४८ प्रजातींचे पक्षी स्थलांतरित आहेत. आता या परिसराला आंतरराष्ट्रीय पातळीवर ’रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला आहे. ही बाब आनंदाची असली, तरी प्रशासनासमोर या परिसराचे संवर्धन आणि विकासाच्या अनुषंगाने काही आव्हाने उभी राहिली आहेत.
 
आव्हानांवरील तोडगा गरजेचा
'रामसर’ स्थळाचा दर्जा मिळालेल्या नांदुरमधमेश्वर अभयारण्याचा समावेश ’सेंट्रल एशियन फ्लाय-वे’ या पक्षीस्थलांतराच्या महत्त्वाच्या पट्ट्यामध्ये होतो. नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यामुळे या ठिकाणी गोदावरी आणि कादवा नदीच्या पाण्याचा संचय झाला आहे. या बंधाऱ्यातील पाण्याच्या व्यवस्थापनाचे काम सिंचन विभागाकडून पाहिले जाते. बंधाऱ्यातून मराठवाडा व नगरसाठी पाणी सोडताना सिंचन विभागाकडून वनविभागाशी समन्वय साधला जात नाही. त्यामुळे बर्याचदा बंधार्यातून पाण्याचा निचरा केल्यावर अभयारण्यातील पाण्याची पातळी कमी होते. ही पातळी कमीअधिक झाल्याने पक्ष्यांच्या अधिवासात बदल होऊन त्यांची संख्याही कमीअधिक होत राहते. परिणामी, पक्षी त्या ठिकाणी थांबत नाहीत. आता या परिसराला ’रामसर’चा दर्जा प्राप्त झाल्यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत दोन्ही विभागांनी समन्वय साधणे गरजेचे आहे. शिवाय वनविभागाने या अभयारण्यातील वनकर्मचार्यांची संख्या वाढविणेही आवश्यक आहे. ११९८.६५७ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्याची धुरा केवळ २ वनरक्षक, १ वनपाल, १ वनपरिक्षेत्र अधिकारी आणि १ सहायक वनसंरक्षक अधिकार्याच्या खांद्यावर आहे. त्यामुळे अभयारण्याचे व्यवस्थापन अधिक सुरळीत करण्यासाठी कर्मचार्यांच्या संख्येत वाढ करणे नितांत गरजेचे आहे. या अभयारण्याच्या निर्मितीवेळी जमिनीचे हस्तांतरण करताना सिंचन विभागाची धरणासाठी संपादित जमीन अभयारण्यामध्ये वळती करण्यात आली. मात्र, सिंचन विभागाकडून वळती झालेल्या सुमारे ३०० ते ४०० हेक्टर क्षेत्रावर आजही गाळपेराची शेती केली जाते. त्यामुळे अभयारण्याच्या संवर्धनाकरिता या शेतीवर एका मर्यादेनंतर रोख लावणे आवश्यक आहे. अभयारण्याचा सीमांकनाचा प्रश्नदेखील खितपत पडला आहे. तो देखील येत्या काळात मार्गी लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. गेल्या वर्षी लोणावळा येथे पार पडलेल्या 'बीएनएचएस'च्या पाणपक्ष्यांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत या अभयारण्यातील वन अधिकाऱ्यांनी दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले होते. नाशिक शहरातून गोदावरीच्या पात्रात कोणतेही प्रकिया न करता सोडलेले दूषित पाणी अभयारण्यात येते. त्यामुळे नाशिक महापालिकेबरोबर यासंबंधी समन्वय साधणार असल्याचे अधिकाऱ्यांनी परिषदेत म्हटले होते. ’रामसर’ स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्याने अभयारण्य प्रशासनासमोर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या सुविधा निर्माण करण्याचेही आव्हान आहे. आज राज्यात लोणार सरोवर, जायकवाडी पक्षी अभयारण्य, वेंगुर्ला रॉक्स, माहूल शिवडीची खाडी, ठाण्याची खाडी, उजनीचे धरण, हतनूर धरण आणि नवेगावबांध ही पाणथळे क्षेत्र 'रामसर' दर्जाची आहेत. एखाद्या पाणथळीला ‘रामसर स्थळ’ घोषित करण्यासाठी एकूण नऊ जागतिक निकषांची पूर्तता करावी लागते. राज्यातील काही पाणथळी या निकषांची पूर्तता करणाऱ्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने अधिकाधिक पाणथळींना 'रामसर'चा दर्जा प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी आता होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@