नवी दिल्ली : १५ डिसेंबर रोजी झालेल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरणातील ७० जणांचे छायाचित्र दिल्ली पोलिसांनी बुधवारी जाहीर केले. या आरोपींची माहिती देणाऱ्यांना दिल्ली पोलिसांकडून बक्षीस देखील दिले जाणार आहे. या आरोपींवर नागरिकता दुरुस्ती कायद्यासंबंधी (सीएए) अपप्रचार तसेच हिंसाचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जामिया नगर पोलीस ठाणे व न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तर याप्रकरणी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेचे विशेष पथक तपास करत होते.
या तपासात पोलिसांच्या हाती या हिंसाचाराचा व्हिडिओ व काही व्यक्तींचे फोटो लागले आहेत. या आधारावरच पोलिसांनी या हिंसाचारातील सहभागी आरोपींचे फोटो सादर केले आहेत. दिल्लीतील हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत एकूण ११८ जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या आंदोलकांनी पोलिसांवर बल्ब, ट्यूबलाइट आणि बाटल्या फेकल्या होत्या. रस्त्यातील एका हॉस्पिटलवरही दगडफेक करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ४ डीटीसी बस, पोलिसांच्या एका दुचाकीसह १०० पेक्षा अधिक वाहने पेटवण्यात आली होती. यामध्ये बहुतेक दुचाकी आणि काही चार चारचाकी वाहनांचा समावेश होता. एवढेच नाहीतर काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.