उत्तमगुण ते समर्थलक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2020
Total Views |
samarth_1  H x


‘समाजसंघटन’ करणे हे तसे अवघड काम आहे. गप्पांच्या कट्ट्यावर माणसे एकत्र येणे किंवा भजन-कीर्तन ऐकण्यासाठी जनसमुदाय एकत्र येणे अथवा निवडणुकांच्या काळात नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी माणसांनी गर्दी करणे याला ‘समाजसंघटन’ म्हणता येणार नाही. एकाविशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन समाजहितासाठी माणसे आपणहून एकत्र येतात, त्याला ‘समाजसंघटन’ म्हणतात. ते संघटन सांभाळण्याची जबाबदारी नीतिमान, चारित्र्यवान नेत्याची असते. समर्थांच्या मते, लोकांना सन्मार्गाला लावून त्यांना एकत्र आणणे म्हणजे ‘समाजसंघटन.’ हे काम उत्तम पुरुष करीत असतो. अशा पुरुषाला समर्थांनी ‘भाग्यवान पुरुष’ म्हटले आहे. समाजात असे ‘भाग्यवान पुरुष’ थोडे असतात आणि ‘भाग्यहीन पुरुषां’ची संख्या जास्त असते. ‘भाग्यहीन पुरुषां’च्या ठिकाणी विवेकाचा अभाव असतो. त्यांची कष्ट करण्याची तयारी नसते. अशा विवेकहीन व आळशी माणसांना समर्थ ‘करंटे’ म्हणून संबोधतात. या ‘करंटे’ व आळशी माणसांची समर्थांना चीड आहे. ही माणसे निंद्य गोष्टी करण्यात आनंद मानतात.त्यामुळे ती समाजाला त्रासदायक ठरतात. ‘उत्तम पुरुष’ म्हणजे ‘भाग्यवान पुरुष’ समाजाला उपकारक असतो. तो लोकांना सन्मार्गाला लावतो. त्यामुळे समाजातील नैतिकता वाढीस लागून सुखी-समाधानी जीवन जगता येते. ‘उत्तम पुरुषा’च्या ठिकाणी जे गुण असतात, त्या गुणांची चर्चा दासबोधात येते. या चर्चेतून निवेदनाच्या ओघात समर्थ ‘उत्तम पुरुष लक्षणे’ सांगत जातात. ही लक्षणे समर्थांनी तत्कालीन महंतांना उपदेश करण्याच्या निमित्ताने सांगितली असली तरी अशा ‘उत्तम पुरुष’ लक्षणांनी युक्त नेतृत्वाची आज आपल्या समाजाला गरज आहे. ‘दासबोध’ अभ्यासातून ही लक्षणे ठळकपणे शोधता येतात. माणसाच्या अंगी काही काही उपजत गुण असतात. ‘परोपकार’ हा त्यापैकी एक आहे. असा परोपकारी पुरुष सर्वांना आवडतो.


उपजत गुण शरीरीं।
परोपकार नानापरी।
आवडे सर्वांचे अंतरी। सर्वकाळ॥

‘उत्तम पुरुषा’च्या ठिकाणी आणखीही अनेक चांगले गुण असतात. त्याचे अक्षर सुरेख असावे. समर्थांच्या काळी छपाईचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे ग्रंथ नीटनेटका लिहून काढून त्याचे जतन करावे लागे. म्हणून ‘उत्तम पुरुषा’चे अक्षर चांगले हवे. गचाळ अक्षरात लिहिलेला ग्रंथ कोणी वाचायला घेणार नाही.


सुंदर अक्षर लिहो जाणे ।
चपळ शुद्ध वाचू जाणे ।
अर्थांतर सांगो जाणे ।
सकळ काही ॥
नुसते अक्षर सुंदर असून भागत नाही, त्याला ग्रंथ शीघ्र व शुद्धपणे वाचता आला पाहिजे. ग्रंथातील सखोल अर्थ त्याला इतरांना सांगता आला पाहिजे. असा हा ‘उत्तम पुरुष’ कोणाचे मन दुखावत नाही. तो नेहमी चांगल्या माणसांच्या संगतीत राहतो. त्याचे आचरण नियमित असते. आपल्या विचारांवर तो ठाम असतो. विचार करताना तो मूर्खासारखे कल्पनांचे घोटाळे करीत बसत नाही. असा माणूस अर्थातच लोकांमध्ये प्रिय असतो. त्याचे पाठांतर चांगले असते. त्यामुळे बोलताना तो मोठ्यांचे विचार सहजपणे उद्धृत करू शकतो. कोणाला काही विचारायचे असेल तर तो ते नम्रपणे विचारतो. पुष्कळ लोक त्याला मान देतात. थोडक्यात, तो तेजस्वी असा पुण्यवान महापुरुष सर्वांना हवाहवासा वाटतो. अशा परोपकारी पुरुषाला जगात काही कमी पडत नाही. त्याच्या ठिकाणी एकच वासना असते, ती म्हणजे सर्वांनी सुखी असावे.

दुसर्‍याच्या दु:खे दुखावे ।
दुसर्‍याच्या सुखे सुखावे ।
अवघेचि सुखी असावे ।
ऐसी वासना ॥

स्वत:ला ‘मोठे’ समजणारे काही लोक सत्पुरुषांची निंदा करतात. ‘उत्तम पुरुष’ लक्षणे असणार्‍यांचीही हे लोक निंदा करतात, पण ‘उत्तम पुरुषा’वर त्या निंदेचा परिणाम होत नाही. कारण, कोणी निंदा केली, तर ती देहापुरती असे समजतो. त्याची देहबुद्धी नाहिशी झाली असल्याने निंदा त्याला स्पर्श करू शकत नाही.


मिथ्या शरीर निंदले ।
तरी त्याचे काये गेले ।
ज्ञात्यासि आणि जिंतिले ।
देहबुद्धीने ॥

माणसाने नेहमी उत्तम गुण आत्मसात करावे व काहीतरी गुण लोकात दाखवावे. लोक उत्तम गुणांकडे आकर्षित होतात. उत्तम गुण संपादन केल्यावर माणसाला सामर्थ्य प्राप्त होते. जगात अनेक प्रकारचे उत्तम गुण आहेत. ते आपण शिकावे. त्यावर चर्चा करावी. अशा गुणांचे वर्णन करणे आणि भगवंताचे निरुपण करणे याशिवाय एक क्षणही वाया घालवू नये. पुष्कळ अध्यात्मविषयक साहित्य आपण वाचले पाहिजे. त्यातील जे आवडेल ते आपण पाठ केले पाहिजे, असे करणारा ‘उत्तम पुरुष’ कोणत्याही प्रश्नांना शंकांना व्यवस्थित उत्तरे देतो. त्यांच्या नेमक्या बोलण्याने लोकांच्या मनाला शांती मिळते आणि लोक आपोआप त्याच्यावर प्रेम करू लागतात.

या समासातील काही ओव्या वाचून समर्थ जणू काही आपले चरित्रच सांगत आहेत, असे वाटते. समर्थांनी हिंदुस्तानभर पायी प्रवास केला. जेथे गेले तेथील लोक त्यांना ओळखत, पण नंतर समर्थ कुठे जात. हे लोकांना कळत नसे. चाफळला व सज्जनगडावर आल्यावर अनेक लोक त्यांना भेटायला येत असत. आता ‘उत्तम पुरुषा’चे वर्णन पाहा.


उपासना करूनियां पुढें ।
पुरवलें पाहिजे चहुंकडे ॥
भूमंडळी जिकडे तिकडे।
जाणती तया॥ (१९.१०.८)


जाणती परी आडळेना ।
काय करतो तें कळेंना ।
नाना देशीचे लोक नाना।
येऊनी जाती ॥ (१९.१०.९)


किती लोक ते कळेंना ।
किती समुदाय आकलेना ।
सकळ लोक श्रमणमनना ।
मध्यें घाली ॥ (१९.१०.११)
समर्थांनी अशा रीतीने जे ज्ञान त्यांच्यापाशी होते ते लोकांना देऊन सर्वांना शहाणे केले.

जितुके कांहीं आपणासी ठावे ।तितुके हळुहळु सिकवावें ।
शाहाणे करूनि सोडावे ।
बहुत जन ॥


आपल्याकडून होईल जेवढे आपण केले पाहिजे. तसेच इतरांकडूनही करून घेतले पाहिजे. आपण विवेक करावा, इतरांकडून करून घ्यावा. आपण भक्तिमार्ग धरावा. इतरांनाही त्याची महती सांगून त्यांना भक्तिमार्ग धरायला लावावा. असे करीत असताना त्याच त्याच लोकांचा कंटाळा आला, तर नवीन प्रांत शोधावे. पण, आळस करू नये. नव्या लोकांना शहाणे करावे. सांस्कृतिक उद्धाराची ही चळचळ समर्थांना महंतांद्वारे भारतभर न्यायची होती. आपल्या कार्याचा व्याप झेपेल तेवढाच करावा. अशक्य झाले तर दूर निघून जावे. करायचे ते आनंदाने करावे. व्यापात आपला आनंद गमावून निराश होऊ नये.

व्याप होईल तों रहावें ।
व्याप राहतां उठोन जावें ।
आनंदरूप फिरावें । कोठें तर्‍हीं ॥

हेही लक्षात ठेवावे की, आपल्यावाचून काही कार्य अडून राहत नाही. पण, आपण लोकांचे मनोगत राखले पाहिजे. हेच खरे चातुर्याने वागणे आहे. ज्यांना हे चातुर्य समजत नाही ते वेडे आहेत, असे समर्थ म्हणतात. समर्थ पुढे सांगतात की, अशा वेड्यांना उघडपणे ‘वेडे’ म्हणू नये, अन्यथा दुसर्‍यांचे अंतःकरण भंग पावून परस्परात संघर्ष निर्माण होईल. लोकांना लहान मुलांप्रमाणे हळूळळू शिकवावे लागते.



मुलाच्या चालींने चालावें ।
मुलाच्या मनोगते बोलावें।
तसै जनास सिकवावें ।
हळुहळु ॥ (१३.१०.२४)

आज सभोवार पाहिले तर अनेक दृष्टप्रवृत्ती समाजात धिंगाणा घालत आहेत. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी कायद्याची जरब हवी. पण, कायद्याच्या भीतीने दृष्टप्रवृत्ती तात्पुरत्या दबतात, पण नष्ट होत नाहीत. ‘उत्तम पुरुष’ लोकांना हळूहळू शिकवून सन्मार्गावर आणू शकतो. जे काही ‘उत्तम गुण’ ते ‘समर्था’चे लक्षण होय. त्याच्याप्रमाणे ‘अवगुण’ हे ‘करंट्या’चे लक्षण उघडच होय.


जितुके कांहीं उत्तम गुण।
तें समर्थांचे लक्षण ।
अवगुण तें करंटलक्षण ।
सहजचि जालें ॥


- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@