अजून दोन थेंबांवरच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2020   
Total Views |
polio_1  H x W:



‘आपल्या पाच वर्षांच्या खालील मुलाला पोलिओचे दोन थेंब जरूर पाजा,’ अशा उद्घोषणापर जाहिराती सुरू होऊन भारतात एक अवकाश लोटला आहे. सुरुवातीला जॅकी श्रॉफ, त्यानंतर अमिताभ बच्चन आणि इतर कलाकार मंडळींनीही व्यापक जनजागृती अभियानात सरकारची साथ दिली. पोलिओ अभियान दिवसानंतर घरोघरी ‘आशा’ किंवा वैद्यकीय चिकित्सा अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात अभियान चालवले जाते. अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीत सांगितल्यापासून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याची शपथ प्रत्येक भारतीयाने घेतली खरी आणि ही मोहीम प्रचंड यशस्वीही ठरली. भारत पोलिओमुक्त झाल्याचा दाखला खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेही दिला. हे सतत सुरू असलेल्या जनजागृतीमुळे आणि लसीकरण मोहिमांमुळे शक्य होऊ शकले आहे. मात्र, पाकिस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तान आदी देश पोलिओच्या विळख्यातून अद्याप सुटलेले नाहीत. या देशांतून पोलिओ हद्दपार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कंबर कसली आहे. मात्र, त्यांच्या या मार्गात दहशतवादी आडवे येत असल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे.


पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठ्या संख्येने पोलिओचे रुग्ण दरवर्षी आढळतात. पाकिस्तानने याही बाबतीत धडा घेतला नसला तरीही अफगाणिस्तानात मात्र पोलिओ विरोधात व्यापक मोहीम उघडण्यात आली आहे. देशातील एकूण ९१ लाखांहून अधिक मुलांना पोलिओ लस देण्याची तयारी अफगाणिस्तान सरकार करत असून तेथील आरोग्य संघटनेने पोलिओ निर्मूलनाच्या राष्ट्रव्यापी अभियानाची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानात बर्‍याचशा ठिकाणी खराब हवामान, दळणवळण सुविधांचा अभाव यामुळे हे अभियान तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. देशातील बामियान, दयाकुंडी, घोर आणि बादंगी आदी भागांमध्ये असा अभाव प्रकर्षाने दिसून येतो. याच ठिकाणांहून आत्तापर्यंत पोलिओचे २९ रुग्ण आढळले आहेत. यानंतर सरकारने व्यापक प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे. मात्र, यात मोठा अडसर आहे तो दहशतवादी संघटना आणि फुटीरतावाद्यांचा.


पर्वतीय आणि दुर्गम भागांमध्ये याच कारणांमुळे १२ लाख मुलांचे लसीकरण शक्य झालेले नाही. तालिबानी संघटनांनीही याला विरोध दर्शवला आहे. ही मोहीम यशस्वी होऊ न देण्याचा निर्धार या संघटना करत आहेत. यामागे अनेक अफवांचा बाजार आहे. ‘दो बूंद’ पाजल्यावर दोनपेक्षा जास्त मुले होऊ शकत नाहीत, असा समज इथल्या दहशतवादी संघटनांमध्ये आहे. त्यामुळे लस पाजण्यासाठी येणार्‍या स्वयंसेवकाला, आरोग्य अधिकार्‍याला थेट गोळ्या घालून ठार केले जाते. लसीकरणासाठी पालकही पुढाकार घेताना दिसत नाहीत. अनेकांच्या डोक्यात पोलिओच्या डोसविषयी बर्‍यावाईट गोष्टी भरवण्यात या संघटनांचे प्रमुख यशस्वी ठरतात. तसेच तालिबानी संघटनांना भीती अशी की, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा मोहिमांद्वारे सरकार माणसे पाठवत आहेत. त्यामुळे पोलिओची लढाई अफगाणिस्तानला अजून जिंकता आलेली नाही.


नायजेरियाला पोलिओमुक्त करण्याचा विडा आरोग्य संघटनेने उचलला आहे. मात्र, त्यानंतर प्रामुख्याने अफगाणिस्तानसारख्या देशांतून हा रोग डोके वर काढत आहे. या देशाच्या जोडीला पाकिस्तान आहेच. पाकिस्तानात पोलिओ रुग्णांची संख्या ही २६ इतकी आहे. अनेक स्वयंसेवक वैद्यकीय अधिकारी लसीकरण मोहीम राबविताना दहशतवाद्यांच्या चकमकीत मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे अनेकजण या मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी अनुत्सुक आहेत. मात्र, तरीही अफगाणिस्तान या मोहिमेबद्दल सकारात्मक आहे. अस्वच्छता, सांडपाणी निचरा न होणार्‍या जागांवर पोलिओबाधित रुग्णांच्या विष्ठेतून हा रोग पसरतो, दूषित पाण्याच्या संपर्कातून याची लागण इतरांना होते.


पोलिओचा असाच एखादा रुग्ण आपल्या देशात आला, तर त्याच्या माध्यमातूनही हा रोग पसरण्याची भीती आहेच. त्यामुळे निव्वळ पोलिओ लसीकरण करून निर्मूलन शक्य नसल्याचा अंदाज वेळोवेळी तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मुळात म्हणजे पोलिओ बाधित देश हे भारताचे शेजारी असल्याने सीमावर्ती भागांत मोठी काळजी घेतली जाते. या भागांतून येणार्‍या व जाणार्‍या प्रवाशांना आवश्यक ती लस पुरवली जाते. जगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हजारो आजारांवर उपचार मिळवणे शक्य असताना, अद्याप भारताचे शेजारी देश दोन थेंबांवरच अडकून आहेत, हे दुर्देवीच!
@@AUTHORINFO_V1@@