भीष्म शरशय्येवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2020
Total Views |
bhishma_1  H x



युधिष्ठिराला राज्य परत मिळाले म्हणून तो श्रीकृष्णाप्रति कृतज्ञ होता. तो श्रीकृष्णाला भेटायला आला व हात जोडून म्हणाला, “हे देवा, तू मला माझं राज्य परत मिळवून दिले आणि कितीतरी गोष्टी आमच्यासाठी केल्या. देव असूनही तू सामान्य मानवासारखाच वागला. मर्त्य मानवजन्माची सुखदु:खं तू आपलीच मानली. तू आमच्या सोबत राहून अश्रू ढाळलेस, आनंदही व्यक्त केलास, सत्याचा मार्ग आम्हाला दाखविला. आम्ही तुझे उपकार कसे फेडू? मी तुझे चरण अश्रूंनी धुवून तुझे थोडेतरी ऋण फेडू शकतो.” कृष्णाने त्याला वर उठवून हृदयाशी धरले. मग श्रीकृष्ण म्हणाला,“मी तुझे आजोबा भीष्म यांचाच विचार करत होतो. आता दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होणार आहे व त्यांचे अखेरचे दिवस जवळ आले आहेत. तुला त्यांच्याकडून खूप काही शिकून घ्यायचे आहे. म्हणून आपण सारे त्यांच्या भेटीस जाऊया.” त्याच्या या प्रस्तावाला युधिष्ठिराने त्वरित मान्यता दाखवली. युधिष्ठिर म्हणाला, “हे देवा, तू जे म्हणशील तसेच आम्ही करू.” मग कृष्णाने सात्यकीस सांगितले, “दारुक, याला माझा रथ तयार ठेवण्यास सांगा. तूही तयार राहा. तिथे रणांगणी शरपंजरी पडलेल्या भीष्मांना आपल्याला भेटायचे आहे.” त्याच्या इच्छेनुसार सारे रणांगणाकडे निघाले. भीष्मांच्या जवळ पोहोचले. कृष्णाने त्यांना विचारले,”महाराज कसे आहात? तुमची सहनशक्ती पाहून आम्हाला आश्चर्य वाटते. तुम्ही ज्या रितीने मृत्यूला रोखून धरले आहे ती शक्ती इथे कुणातही नाही. आम्हाला एक सुई जरी टोचली तरी वेदना होतात. तुम्ही तर शेकडो बाण शरीरात घुसले असूनही त्या सर्व वेदना सहन करत आहात. तुम्ही सर्व ज्ञानाचे भांडारच आहात. सर्वश्रेष्ठ वीर आहात. तुम्ही कधीही चळला ढळला नाहीत. सदाचरणी राहिलात. सर्व वसुंमध्ये तुम्हीच श्रेष्ठ वसु आहात. तुम्हाला एकच विनंती करायची आहे. ती अशी की, या युधिष्ठिराचा भ्रम दूर करा. कारण, त्याला असे वाटते आहे की, त्याच्या चुलत भावांच्या मृत्यूला तोच एकमेव कारणीभूत आहे. म्हणून तो महादु:खी झाला आहे. व्यास व नारदमुनींनी त्याचे सांत्वन केले. परंतु, आता त्याला ध्यास आहे तो म्हणजे उत्तम राजकारणी बनण्याचा! तुम्ही तुमच्याजवळील जे ज्ञान आहे ते या युधिष्ठिराला शिकवावे.”

भीष्म म्हणाले, “वासुदेवा, तू स्वत: शाश्वत परमात्मा असताना मी का म्हणून हे करावे? तूच तर सर्व ज्ञान आणि शहाणपणा यांचे भांडार आहेस! तुझ्यापुढे माझी काय पाड? मी सत्यव्रतीचे ऋण पूर्ण अंशी फेडून आता फक्त उत्तरायणाची वाट पाहतो आहे. मला तुझ्या विश्वरूप दर्शनाची आस आहे.” श्रीकृष्णाने त्यांना आश्वस्त करून सांगितले, ”तुम्ही जेव्हा या भूतलावरून जाल, तेव्हा तुमचे ज्ञानही तुम्हा समवेत लयाला जाईल म्हणून मी आग्रह करतो की, त्यापूर्वी तुम्ही हे ज्ञान युधिष्ठिरास द्यावे.” यावरती भीष्म म्हणाले,“तू स्वतः इथे हजर असताना मी युधिष्ठिराला ज्ञान शिकवावे हे औधत्यच नाही का? मला हास्यास्पद व्हायचे नाही.” यावर श्रीकृष्ण म्हणाला, “तुमची ही नम्रता खूप वाखाणण्यासारखीच आहे. तुम्हीच हे ज्ञान युधिष्ठिराला सांगावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे.” यावर भीष्मांनी पुन्हा युक्तिवाद केला की, “माझ्या देहाला झालेल्या जखमांमुळे मी आता खूप अशक्त झालो आहे. शिवाय माझी स्मरणशक्ती पण आता मला दगा देते. या वेदनांपुढे मी हतबल आहे व ही जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ आहे.” श्रीकृष्ण यावर म्हणाला, “मी तुम्हाला वरदान देतो की, तुमची स्मरणशक्ती तल्लख होईल आणि विचारशक्ती तरतरीत होईल. या विश्वातील रहस्ये तुम्ही सुलभपणे उलगडून सांगू शकाल आणि जे जे ज्ञान आवश्यक आहे ते सर्व तुम्हाला आठवेल.” त्याच क्षणी श्रीकृष्ण आणि भीष्म पितामह यांच्यावर स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली.

त्या रात्री श्रीकृष्णालाही खूप समाधान मिळाले व शांत झोप लागली. सकाळी कृष्ण, सात्यकी, युधिष्ठिर व सर्व पांडव रणांगणावर भीष्म पितामहांना भेटण्यासाठी निघाले. भीष्म लखलखीत सूर्यासारखे तेजःपुंज दिसत होते. कृष्णाने दिलेल्या दिव्य वरदानामुळे ते अधिकच तरतरीत व ताजेतवाने झाले होते. श्रीकृष्ण भेटल्यावर ते म्हणाले, “श्रीकृष्णा, तू मला वर दिल्यापासून माझ्या सर्व वेदना दूर झाल्या आहेत. माझे मनसुद्धा शांत व प्रसन्न झाले आहे. पण मला एक सांग, क्षत्रिय धर्म याविषयी मीच युधिष्ठिरास सांगावे असे तुला का वाटते? तू का नाही सांगू शकत?” यावर श्रीकृष्ण हसून म्हणाला, “पितामह, तुमचा प्रश्न योग्यच आहे. मी नक्कीच बोलू शकलो असतो. परंतु, तुम्हाला यामुळे शाश्वत कीर्तीचा लाभ व्हावा, हा माझा हेतू आहे. यासाठी जग तुमची कायम आठवण काढेल. तुमचा शब्द म्हणजे वेदवाक्ये होतील. यापुढे तुम्ही दाखवलेल्या नियमांनुसार जग वागेल. म्हणून मी हे तुम्हाला सोपवत आहे.” यावर भीष्म खूपच आनंदीत झाले. त्यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, “कृष्णा, युधिष्ठिराला सांगा की, त्याला हवा तो प्रश्न त्याने करावा, मी त्याच्या सर्व शंकांचे निरसन करेन.” कृष्णाने कथन केले की, “हजारो क्षत्रियांच्या आणि आपल्याच बांधवांच्या विनाशास आपणच कारणीभूत झालो, अशी अपराधी भावना युधिष्ठिराच्या मनात आहे.” यावर भीष्मांनी युधिष्ठिरास जवळ येऊन त्याला त्याच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. ते म्हणाले, “तू खरा क्षत्रिय आहेस व तू तुझे कर्तव्य केले. त्याकरिता तुला दुःख करायचे काहीच कारण नाही.”
(क्रमशः)
- सुरेश कुळकर्णी
@@AUTHORINFO_V1@@