नवी दिल्ली : शबरीमलासह विविध धर्मांच्या धार्मिक स्थळांमध्ये महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाविषयी सर्वोच्च न्यायालयाचे नऊ सदस्यीय घटनापीठ दहा दिवसात सुनावणी पूर्ण करेल, असे निर्देश सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मंगळवारी दिले.
शबरीमलाप्रकरणी यापूर्वी १३ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकीलांना एकत्रित चर्चा करून प्रकरणाच्या सुनावणीसाठीचा कालावधी निश्चित करण्यास सांगितले होते. मात्र, एकत्रित चर्चेनंतरही खटल्यात मांडावयाचे मुद्दे याविशयी एकमत होत नसल्याचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयास सांगितले.
त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या प्रकरणाचा युक्तिवाद दहा दिवसात पूर्ण करावा, सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायमूर्तींचे घटनापीठ याप्रकरणी सुनावणी करेल, असे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे घटनापीठाचे अध्यक्ष असतील. त्यामुळे आता शबरीमलासह विविध धर्मांच्या धार्मिक स्थळांमध्ये महिलासोबत होणाऱ्या भेदभावाविषयीच्या साठ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने नऊ सदस्यीय घटनापीठ सुनावणी करणार आहे.