मुंबई : नगरसेवकांचा अभ्यास दौरा यंदा रद्द!

    28-Jan-2020
Total Views |
BMC_1  H x W: 0





मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नगरसेवकांचा यंदाचा अभ्यास दौरा रद्द करण्यात आला आहे.

 
मुंबई : दरवर्षी आयोजित केला जाणारा मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा अभ्यास दौरा यंदा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या अभ्यास दौऱ्यावर आक्षेप घेतल्यामुळे यंदा वैधानिक आणि विशेष समित्यांमधील सदस्य नगरसेवकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. दरवर्षी डिसेंबर, जानेवारीमध्ये नगरसेवकांच्या अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येते. अभ्यास दौऱ्याचा खर्च मुंबईकरांनी दिलेल्या करातून करण्यात येतो.
 
 
अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली साजऱ्या होणाऱ्या नगरसेवकांच्या सहलीला मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला, त्यामुळे अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली म्हैसूर, उटी, उत्तराखंड, अंदमान, जयपूर, केरळ, तसेच शांघायला जाण्याची तयारी करणाऱ्या वैधानिक आणि विशेष समित्यांमधील सदस्य नगरसेवकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
 
 
दरवर्षी डिसेंबर, जानेवारीमध्ये वैधानिक आणि विशेष समित्यांमधील सदस्यपदी विराजमान झालेल्या नगरसेवकांच्या अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येते. अभ्यास दौऱ्याचा संपूर्ण खर्च करदात्या मुंबईकरांनी कराच्या रूपात पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या निधीतून करण्यात येतो. यंदाही वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्याची तयारी पालिकेत सुरू झाली होती
 
 
सुधार समितीचा म्हैसूर, उटी, शिक्षण समितीचा उत्तराखंड, विधि समितीचा राजस्थानमधील जयपूरला, महिला आणि बाल कल्याण समितीचा केरळमध्ये, शहर (स्थापत्य)चा अंदमानला अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. तर आरोग्य समितीचे सदस्य शांघाय येथे अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. हे अभ्यास दौरे २९ जानेवारीपासून सुरू होणार होते.
 
 
मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांशी संवाद साधताना पालिकेतील अभ्यास दौऱ्यांवरून नगरसेवकांचे कान टोचले होते. अभ्यास दौरे म्हणजे सहल नव्हे अशी टिप्पणीही त्यांनी केली होती. मात्र त्यानंतरही शिवसेनेचे नगरसेवक अभ्यास दौऱ्यांच्या स्वप्नात रंगले होते. अखेर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनाई केल्यामुळे आता हे अभ्यास दौरे रद्द करण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे.
 
 
गेली अनेक या अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे. नगरसेवक अभ्यास दौऱ्यात भेट दिलेल्या शहरातील नागरी सुविधांची पाहणी करतात. मात्र तेथील एखादी चांगली सुविधा मुंबईत राबविण्याबाबत कोणतीच शिफारस करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अभ्यास दौऱ्यांचा उद्देश साध्य होत नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.