मैत्रकुल जीवन विकास केंद्र : समाजाच्या अपंगत्वाला विद्यार्थ्यांच्या मदतीने मैत्रीपूर्ण हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2020   
Total Views |
dayitva 1_1  H



समाजातील अत्यंजांचे दु:ख जाणून त्या उपेक्षितांचे दु:ख दूर करण्याचे कार्य ‘मैत्रकुल जीवन विकास केंद्र’ करत आहे. संस्थेचे संस्थापक किशोर जगताप हे विविध सामाजिक चळवळींशी संबंधित होते आणि आहेत. विविध सामाजिक संस्था स्थापन केल्यानंतर, त्यांना जाणवले की वंचित, पीडित आणि समाजप्रवाहापासून सर्वार्थाने दूर असलेल्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचायला हवी. त्यातूनच मग निर्मिती झाली ‘मैत्रकुल जीवन विकास केंद्रा’ची.


अपंगत्वावर मात करत समाजासाठी तन-मन-धन वेचून कार्य करणारे आणि सशक्त सकारात्मक समाजव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून प्रचंड मेहनत करणारे किशोर जगताप. किशोर यांना पोलिओमुळे अपंगत्व आले. पण त्या अपंगत्वावर मात करत त्यांनी समाजाला उत्तुंग दिशा दाखवण्याचे कार्य केले. किशोर यांची आई पवित्रा जगताप. परिस्थितीची झळ सोसलेल्या या आईचे वाचन अफाट असल्याने बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले चळवळीच्या विचारांचे संस्कार तिचाकडूनच होत गेले. किशोर यांनी त्यांच्या चढउताराच्या काळात अनेक वाचनालये चालवली. इतकेच नव्हे, तर वस्तीवस्तीमध्ये साने गुरुजी वाचनालयेसुद्धा उभारली. त्यांच्या आई पवित्रा जगताप यांनी त्यांच्या अपंगत्वाला मजबुरी नाही, तर वाचनाची मजबुती दिली. किशोर यांचे वडील भगवान जगताप हे वरळीच्या बीडीडी चाळीतील एक ‘किंगमेकर’ म्हणून प्रसिद्ध होते.


ज्या हातांनी पाटी-पेन्सिल सोडली होती वा परिस्थिती अभावी सोडावी लागली, त्या भाकरीच्या प्रश्नासाठी झुंज देणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ठप्प प्रवास त्यांनी सहज पुन्हा सुरू करून दिला. त्यासाठी जागा मिळेल तिथे बिनभिंतींची शाळा आणि आयुष्याचा वर्ग सुरू होई. मैदान, बाग, फुटपाथ वगैरे वगैरे ठिकाणी दादाने या होतकरू विद्यार्थ्यांच्या मेंदूवर शिक्षणाचे छत उभारले. अभ्यासाची गोडी नसलेल्यांना तालबद्ध गाण्यांच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून अभ्यास सोपा करून दाखवला. त्यामुळे नारायण सुर्वे म्हणतात, त्याप्रमाणे हे भोवताल तुमचे विद्यापीठ आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देत असे. नापासांच्या शाळेच्या उपक्रमास जुन्या साथीदाराने विनोद मळाळेने ‘बागशाळा’ नाव दिले व तेच नाव लोकप्रिय झाले. आज बागशाळेचा पसारा कुलाबा ते पालघर, कल्याण असा वाढला आहे.


दादांसाठी असे कोणते क्षेत्र नाही, ज्यासाठी काम केले गेले नाही. समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकांसाठी त्यांनी कार्य केले. महिला सक्षमीकरण, तृतीय पंथी, अगदी एड्सग्रस्तांच्या निवारणासाठी दादा माहितीचे प्रयोग करायचे ते दंगलीच्या काळात दंगल निवारण्यासाठी दादाचा सक्रिय सहभाग होता. इथपासून रमाबाईनगर हत्याकांड झाल्यानंतर जातीय तेढ मिटवण्यासाठी दादा सतत कार्यरत राहिले. चळवळ, संघटना, लिखाण, बागशाळा अशा कित्येक बाबींना सांभाळत सांभाळत दादांनी घर सोडले आणि सर्वांगाने स्वतःलासमाजाला, देशाला अर्पण केले. पाणी साचले की डास निर्माण होतात. त्यामुळे आपण प्रवाही असले पाहिजे आणि प्रसंगी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ही वाहता आले पाहिजे, ही शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे. कार्यकर्त्याने आजारी पडणे हा एक गुन्हा आहे मग आपण अपवाद ठरता नये. हा चळवळीचा प्रवाह पुन्हा वेगाने वाहू लागला. या अपघातानंतर त्यांचे मित्र त्यांचे विद्यार्थी काहीतरी करू पाहत होते म्हणून त्यांना घर घेऊन देण्याचे ठरवले. पण एका घरात मी एकटाच राहण्यापेक्षा माझे विद्यार्थी माझ्या सोबत राहतील, शिकतील आणि पुढे इतरांनाही शिकवतील हा विचार करून त्यांनी मित्रांकडे एका घराची मागणी केली. पण दादासोबत आपले घरदार, आईवडील, परिवार सोडून दादासोबत विद्यार्थी राहतील का? हा प्रश्न सर्वांना पडला होता आणि नंतर प्रवास सुरू झाला तो ‘मैत्रकुल जीवन विकास केंद्रा’चा! दादांनी स्थापन केलेल्या ‘छात्रशक्ती’ संस्थेंतर्गत ‘मैत्रकुल जीवन विकास केंद्र’ हे कल्याण येथील बापगाव गावात वसले आहे.


येथे बागशाळेच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना एकत्र आणले गेले आहे. यातील कुणी व्यसनाधीन आहेत, तर कोणी चोरीमारी करणारे तर कुणी परिस्थिती नाही म्हणून शाळा सोडलेले असा तळागाळातील विद्यार्थ्यांना दादांनी मैत्रकुल जीवन विकास केंद्र’ येथे आणून त्यांच्या चुकीच्या सवयी सोडल्या आणि प्रत्येकास पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आज ‘मैत्रकुल’मध्ये दुसरीपासून ते पीएच.डी करणारे विद्यार्थी राहतात. त्यांच्या शिक्षण राहण्या-खाण्याचा खर्च, त्यांच्या जीवनविकासाची जबाबदारी ‘मैत्रकुल’ ने घेतली आहे. १० मे, २०१६ रोजी ‘मैत्रकुल जीवन विकास केंद्रा’ची स्थापना झाली. ४७ मुलांचा खर्च करणारी संस्था फार मोठी असेल असे अनेकांना वाटते. त्यांना अनुदान मिळते असेल असे अनेकांना वाटते. परंतु, चित्र मात्र पूर्णतः उलट आहे. सरकार या उपक्रमास कोणत्याही प्रकारचे अनुदान देत नाही. कारण, अनुदान देण्याच्या कोणत्याही प्रवर्गात ‘मैत्रकुल’ बसत नाही. इथे कोणत्याही एका जातिधर्माची मूलं नाहीत. त्यांना इथे त्यांच्या परिस्थितीमुळे यावे लागले आहे.


‘मैत्रकुल’चा सगळा भार हा लोकनिधीतूनच उचलला जातो. ‘मैत्रकुल’च्या सुरुवातीच्या दिवसात लोकांना आव्हान केले गेले की, तुमच्याकडे जे काही ‘टाकाऊ सामान’ आहे, मग कपडे असो व भांडी जे आहे ते तुम्ही आम्हाला द्या त्याचा आम्ही वापर करू. या आव्हानातूनच ‘मैत्रकुल’साठी अनेकांनी मदत केली. कोणी भांडी दिली तर कुणी कपडे तर कुणी धान्य यातूनच ‘मैत्रकुल’ उभारले गेले आणि आजही हा प्रवास असाच सुरू आहे. मदत म्हणून आलेल्या जुन्या वस्तूंमधूनच ‘मैत्रकुल’च्या विद्यार्थ्यांनी फर्निचर बनविले. मग जुन्या खराब फ्रिजचे कोणी कपाट बनविले तर अनेक उपकरणांना जोडून फॅन, संगणक अशा वस्तू. इथली मुलेच हा सारा कारभार सांभाळतात, मग महिन्याचा खर्च उभा करण्यापासून ते मुलांना अभ्यास घेण्यापर्यंत सगळेच. येथील भिंतीचा रंग कधी ‘मैत्रकुल’ निवासींच्या आयुष्यात रंग भरत गेले कळलेच नाही. सिमेंटला ज्या मुलांनी कधी हात लावला नव्हता त्यांनीच इथे बांधकाम केला आहे नि घरातील लहान भावंडांचे आई बाबाही झालेत. ‘मैत्रकुल’ने विद्यार्थ्यांना जबाबदार बनविलेले आहे. येथील मुलांमध्ये मातृत्व पेरले आहे. आपापल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रचंड संघर्षातून पुन्हा उभे राहणारे एक-एक चेहरे जेव्हा एकमेकांचे संघर्ष समजून घेतात. तेव्हा त्यांना त्यांचाच संघर्ष नव्याने ताकद देत असतो. इथे राहणार्‍या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाची जीवन कहाणी वेगळी आहे. इथे भूतकाळाचा निरोप सकारात्मक घेतला जातो आणि वर्तमानाचे स्वागतही सकारात्मकतेनेच केले जाते.


इथे राहणारे विद्यार्थी फक्त शिक्षण नाही घेत, तर शिक्षणाशी जोडलेली समाजाची जबाबदारी ही तरुणांचीच आहे, हे समजून घेतो. टोकाची चुकी केल्यानंतर ही ती मान्य करण्याची वृत्ती येथील प्रत्येकाकडे आहे. ही वृत्ती इथेच आल्यावरच आली आहे. इथे चुकी करणार्‍याला चूक सुधारण्याची संधी असतेच. त्याव्यतिरिक्त इथे चुकण्याचीही संधी असते. प्रत्येक घडलेली व्यक्ती ही चुकलेलीच असते. कारण, घडतो तोच जो चुकतो. हे इथे सर्वांना कळले. येथील सकाळ ५.३०च्या राष्ट्रगीताने होते. त्यानंतर संविधानाचा सरनामा आणि त्यानंतर मंगलमय प्रार्थना होते. त्यानंतर ध्यान आणि बोधमृत, मग व्यायाम असा दिनक्रम चालतो. ना आचारी, ना माळी, ना सफाई कामगार, ना शिक्षक इथे या सगळ्या जबाबदार्‍या येथील विद्यार्थीच पाहतो. येथील ४७ विद्यार्थ्यांना सहा गटांमध्ये विभागले जाते. आतील साफसफाई, बाहेरील साफसफाई, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, दुपारची भांडी, रात्रीचे जेवण इत्यादी प्रत्येक गटामध्ये सहा ते सात जणं असून आपापल्या गटाची कामे वेळोवेळी जबाबदारीने करतात. मग तिथे मुलगा असला तरी तो लादी पुसतो, भांडी घासतो, पोळ्या लाटतो, कांदे कापतो आणि मुलगी असली तरीही तिला कामे समानच! ‘मैत्रकुल’मध्ये सगळे सण साजरे केले जातात, मग ईद असो व नाताळ असो! पण सगळे सण हे विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने साजरे करतात. रक्षाबंधनाला मुलगे मुलींना राखी बांधतात नि हीच मुले देशाच्या संविधानालाही राखी बांधतात. येथील प्रत्येक उपक्रमाला सामाजिक जोड असतेच जी देशाप्रति विद्यार्थ्यांमध्ये आदरभावना निर्माण करते. कोणी डॉक्टर होण्याची स्वप्न पाहतोय, तर कोणी अगदी पंतप्रधानसुद्धा! त्यामुळे ‘मैत्रकुल’ हा फक्त एक रचनात्मक उपक्रम नसून ती एक चळवळ आहे, इथे छोटा भारत घडवला जातोय! आणि हे सारे दादा अगदी निर्मळ भावनेने करतात. अशा अनेकांना घडविण्याचे कार्य दादा करतात. ‘तुम मुझे समय दो मे तुम्हे जिंदगी दुंगा’ हे दादांचे ब्रीद आहे! आजही ‘मैत्रकुल’ भाडे तत्त्वावर आहे आणि मुलांचा पसारा वाढतोय. लवकरच ही जागा सोडावी लागणार आहे. नवीन ‘मैत्रकुल’च्या बांधणीसाठी जागेचा शोध सुरू आहे, पण कुणीही खचले नाही. कारण, परिस्थितीने येथील मुलांना छलांग मारण्यास शिकविले आहे. कितीही संकटे आली तरी ही मुले लढतील. कारण, ‘आपत्तीसेही आविष्कार होता हैं’ हे सारेच जाणतात.


‘मैत्रकुल’साठी आपल्या मदतीची नितांत गरज आहे. मैत्रकुल जीवन विकास केंद्राच्या बांधणीसाठी दहा हजार लोकांकडून प्रत्येकीदोन हजार रुपये जमा करायचे आहेत, तरी मदतीसाठी हात पुढे करावा ही नम्र विनंती.
@@AUTHORINFO_V1@@