‘नारी तू नारायणी’चा वसा : नगरसेविका सुधा सिंह यांच्या ‘अलंकार क्रिएशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’चा प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2020   
Total Views |
dayitva 2_1  H


तुम्ही लोकांमध्ये जाऊन जोपर्यंत मिसळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना समजू शकणार नाहीत, या विचारांवर कायम चालणाऱ्या सुधा सिंह यांनी आजवर अनेक निराधारांचे प्रश्न लावून धरत त्यांना न्याय मिळवून देण्याचा वसा गेली कित्येक वर्षे सुरू ठेवला आहे. याच कामाचे फलित म्हणून त्यांचा राजकारणातील वावरही त्यांना यशाच्या शिखरापर्यंत नेऊ शकला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘अलंकार क्रिएशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ हे व्यासपीठ उभे करून अव्याहतपणे हे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त सिंह यांच्या इथवरच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा...

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुधा सिंह यांनी एखाद्या कामाचा निश्चय केला की, ते पूर्णत्वाकडे नेल्याशिवाय शांत बसायचे नाही, असा बालपणापासून त्यांचा स्वभाव. एखाद्या कामाची ध्येयनिश्चिती केली की, ती पूर्णत्वास नेईपर्यंत स्वस्थ न बसणे ही त्यांच्या कामाची पद्धती सर्वश्रुत आहे. आजही लोकांमध्ये मिसळून त्यांचे कामे जातीने लक्ष घालून पुढे नेण्याच्या स्वभावाने त्या राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकल्या.

सुधा सिंह यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपटसृष्टीतून केली. अभिनयाच्या मंचावर त्या यशस्वी ठरल्या. दूरदर्शनवर त्यावेळी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या विविध मालिकांमध्ये त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला होता. यासोबतच सामाजिक क्षेत्रातील काम त्यांनी सुरूच ठेवले होते. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, महिलांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी सुरुवातीपासूनच केले होते. मात्र, समाजकार्यात जनतेची कामे करताना येणार्या मर्यादा आणि अडथळे लक्षात घेत त्यांनी सक्रीय राजकारणात येण्याचा निर्धार केला. २००० साली भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात पूर्वीपासून गाठीशी असलेल्या समाजकार्याच्या अनुभवामुळे राजकीय वर्तुळातही त्या लोकप्रिय ठरल्या. पक्षाचे काम करत असताना आपल्या विभागातील महिलांचे प्रश्न हाताळण्याचे काम त्यांनी सचोटीने केले.


पक्षातर्फे त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली. ज्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते, त्यावेळी लोकप्रतिनिधींसमोर जाऊन अनेक प्रश्न मांडून ते पूर्णत्वास नेण्याचे काम त्यांनी त्यावेळीही केले होते. ज्यामुळे पक्षातर्फे त्यांच्यावर उत्तर भारतीय जनता परिषद, मुंबईच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडली. या मंचाच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची पाळेमुळे आणखी मजबूत केली होती. यानंतर त्यांना अंधेरी विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अर्थात, ही जबाबदारी त्यांच्यासाठी आव्हानात्मक होती. मात्र, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप इथेही पाडली. भाजपतर्फे मुंबई महापालिका निवडणुकीत ६७ क्रमांक विभागातून त्यांना निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. या भागातून निवडून येणे हे पक्षासाठी आव्हान होते. मात्र, तेही त्यांनी यशस्वीरित्या पेलले. २०१७च्या पालिका निवडणुकांमध्ये त्या तीन हजार मतांच्या फरकाने निवडून आल्या.


राजकीय कौशल्य आणि काम करण्याच्या त्यांच्या पद्धतींमुळे आपल्या विभागात एक लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून त्यांनी छाप उमटवली आहे. या पसार्यात त्यांनी अलंकार क्रिएशनच्या माध्यमातून आपले काम सुरूच ठेवले आहे. राजकारणात आल्यानंतर या सेवेसाठी जोडणारे अनेक हात त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. एक नगरसेविका म्हणून पाणी, वीज, अतिक्रमणे, रस्ते, शौचालये आदी मूलभूत समस्यांवर त्यांनी काम केलेच. मात्र, त्याचसोबत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने सुस्थितीत करणे, अनेक पालिका शाळांच्या मैदानांवर झालेली अतिक्रमणे हटवणे, विभागातील उद्यानांची डागडुजी नूतनीकरण आदी कामेही त्यांनी युद्धपातळीवर सुरू केली. विभागातील नागरिक एखादी समस्या घेऊन त्यांच्याकडे पोहोचतात, तेव्हा लगेचच यातून मार्ग काढण्याचे पर्याय त्या खुले करतात. आपल्या कामाच्या जोरावर पुन्हा निवडणुकीत कुठल्याही पक्षाच्या आव्हानावर आपण निवडून येऊ, असा विश्वास त्या व्यक्त करतात. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातील आ. अमित साटम यांच्या मार्गदर्शनात राज्य स्तरावरील अनेक कामे आणि उपक्रम त्यांनी आपल्या विभागात राबवले आहेत. एक सर्वसामान्य महिला कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या इथवरच्या प्रवासात मला मिळालेला मान आणि काम करण्याची संधी हे माझे भाग्य आहे, असे त्या सांगतात.


अभिनय असो किंवा राजकीय क्षेत्र, त्यांनी सामाजिक क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. 'अलंकार क्रिएशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट'च्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. दरवर्षी महिला दिनानिमित्त आपल्या विभागात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा या मंचाच्या माध्यमातून सन्मान करण्यात येतो. ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. ‘अलंकार क्रिएशन’तर्फे अंधेरीतील कापसवाडी आणि डी. एन. नगर या भागात दोन केंद्रांच्या माध्यमातून ही कामे केली जातात. या केंद्रात महिलांना स्वयंरोजगार, व्यक्तिमत्त्व विकास, कला, क्रीडा आदी क्षेत्रात महिला सक्षमीकरणाचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे. कुठलाही प्रसंग असो, कुठलेही संकट असो आपल्या भगिनींसाठी धावून येणारी हक्काची राजकारणापलीकडचे व्यक्तिमत्त्व, अशी ओळख त्यांनी आपल्या विभागात तयार केली आहे. हजारो महिलांचा आधारस्तंभ म्हणून सदैव पाठीशी राहणार्या नगरसेविका सुधा सिंह यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!
@@AUTHORINFO_V1@@