राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्हा स्तरावर जिल्हा सहकार्यवाह पदाचे दायित्व समर्थपणे सांभाळलेले, शिक्षण मंडळ भगूर या संस्थेचे संस्थापक सदस्य, रामदास मुरलीधर आंबेकर (७४) यांचे दि. १९ जानेवारी रोजी भगूर येथे दु:खद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
भगूरमधील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तथा राजकीय क्षेत्रात सातत्याने सक्रिय असणारे आदरणीय आंबेकर सर तथा दादा. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना अकस्मात सोडून गेले. खूपच चटका लावून गेलेत दादा, त्यांच्या सततच्या मार्गदर्शनाची, सहकार्याची सवयच मला त्यांच्या आठवणीतून दूर होऊ देत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी त्यांच्या मनातील आदरभावना, त्यांचे सावरकरांवरील प्रेम, सावरकरांविषयी सखोल अभ्यास, त्यांच्या नेहमीच्या वागण्यातून, बोलण्यातून कृतीतून मला सदैव जाणवत असे. सावरकरांविषयी कोणतेही कार्य असो, आंबेकर सर लगेचच उत्साहाने त्यात सहभागी होत. त्यासंबंधी जी काही मदत असे, स्वत: वेळ देऊन त्या प्रत्येक कार्यक्रमात तन, मन व धनपूर्वक त्यांचा सहभाग असे.
सावरकरांच्या जन्मदिनी व आत्मार्पण दिनी तर आंबेकर सरांमध्ये स्वत:च्या घरातील कार्य असल्याप्रमाणे एक वेगळीच ओढ, लगबग दिसून येई. स्वत: वेळ देऊन त्या प्रत्येक कार्यक्रमात स्वत:सोबत इतर माझ्यासारख्या अनेकांना त्या सावरकरीय कार्यात जोडून कार्यक्रम अधिक उठावदार कसा होईल, याकडे त्यांचे संपूर्ण लक्ष असे.
‘संस्कार भारती’, भगूर शाखेच्या कार्यात आंबेकर सरांची एक आधारस्तंभ, मुख्य मार्गदर्शकाची भूमिका खूपच महत्त्वाची होती. ‘संस्कार भारती’चा प्रत्येक कार्यक्रम सुव्यवस्थित व्हावा, याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. प्रत्येक बाबातीत काळजीने विचारपूस करून संस्कार भारतीच्या कामाचा वेगळेपणा व महत्त्व ते सर्वांच्या लक्षात आणून देत. भगूर परिसरातील संघ कामाकडे त्यांचे संपूर्ण लक्ष एखाद्या घरातील ज्येष्ठ पालकांप्रमाणे नेहमी असे. संघाची शाखा, कार्यक्रम, निवासीवर्ग, प्रशिक्षण वर्ग इत्यादी नित्य घडामोडींची विशेष काळजी सरांच्या वागण्यातून सहज जाणवत असे.
प्रत्येक संघ कार्यकर्त्याच्या घरी जाऊन संपर्क करण्यात घरातील कुटुंबीयांचा परिचय करून त्याची विशेष चौकशी करणे, हा त्यांच्या कार्यकर्त्याची काळजी घेणारा अनुभव माझ्यासह अनेकांना होता. प्रत्येक स्वयंसेवकाची जवळून विचारपूस करणे, काळजीने त्याला योग्य ती मदत करणारे आंबेकर सर आम्हा सर्वांपासून दूर गेले, असे वाटतच नाही. महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारप्राप्त आंबेकर सरांनी आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनातदेखील खूप आदर्श विविध क्षेत्रांत निर्माण केले.
अतिशय बुद्धीमान, हुशार, उत्तम वक्ते, कुशल प्रशासक, शिस्तप्रिय अशा आंबेकर सरांनी ३२ वर्षे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना नूतन विद्यामंदिरास खर्या अर्थाने नावारूपास आणले. त्यांचे हजारो विद्यार्थी आज या गुरुंच्या मार्गदर्शनाने अनेक क्षेत्रांत प्रगती करताना दिसत आहेत. संस्थेचे काम सरांनी मनापासून, अतिशय निष्ठेने करून शिक्षण मंडळ भगूर या संस्थेला नाशिक जिल्ह्यात सुप्रसिद्ध केले. म्हणूनच आंबेकर सरांची शाळा नूतन विद्यामंदिर आजही आपली गुणवत्ता व दर्जा टिकवून आहे.
शैक्षणिक क्षेत्रात आंबेकर सरांनी जिल्हा स्तरावर मुख्याध्यापक संघ संस्थामध्ये उल्लेखनीय कार्य केले. आतासुद्धा निवृत्त मुख्याध्यापक संघाच्या कामात ते सक्रीय होते. आंबेकर सरांनी भगूरमधील वसंत व्याख्यानमालांच्या कामातदेखील आपल्या कार्याचा ठसा उमटविला. सावरकर जन्मभूमी प्रतिष्ठान न्यास, भगूरच्या कार्यात त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. भगूरच्या राजकीय जीवनातदेखील आंबेकर सर मागे नव्हते. भगूर नगर परिषदेत दोन वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कामातील स्पष्टपणा, परखडपणा व प्रामाणिकता, सचोटीने काम करून भगूरकरांची सेवा केली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रमुख उपस्थितीत भगूरमध्ये आंबेकर सरांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा त्यांच्या संपूर्ण सेवेस शोभेल असाच दिमाखात पार पडला.
सेवानिवृत्तीनंतरदेखील तेवढ्यात उत्साहात आंबेकर सरांनी भगूर शहरात ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली व त्या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष म्हणून आपल्या कामाचा आदर्श त्यांनी निर्माण केला, आजही ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी, सेवेसाठी काम करीत असताना सरांच्या कामाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशा समाजाच्या विविध आयामांना स्पर्श करणारे आंबेकर सर हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी आपल्या कार्यातून संघाच्या आदर्श स्वयंसेवकाप्रमाणे सर्व क्षेत्रात अनेक प्रकारे कार्य करूनदेखील पुन्हा कोठेच नाही. या निःस्वार्थवृत्तीने, सहृदय भावनेने जगणारे सर्वांना हवेहवेसे वाटणारे, आपल्या प्रेमळ, सहवासातून सतत जवळ असल्याचे जाणवणारे आंबेकर सर हे सदैव आम्हां सर्वांच्या स्मरणात राहून आम्हाला संघकार्य करण्याची प्रेरणा देत राहतील. संघ गंगेचा हा रामदासी जरी हरपला असला तरीकै. आंबेकर सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सतत कार्यमग्न राहून संघ काम करत राहणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आदरणीय आंबेकर सरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
राष्ट्रास्तव जे झिजले कणकण’॥
- डॉ. मृत्युंजय कापसे