मातृहृदयी प्रमिलामावशी!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2020
Total Views |
dayitva 3_1  H


जीवनकार्याच्या गौरवार्थ नुकताच राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व संचालिका व वंदनीय प्रमिला मेढे यांना ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा’ने नुकताच ‘डी.लिट’ देऊन गौरव केला आहे. मावशी म्हणजे आईची बहीण. एक मायेचा झरा. एक आधार. आईसारखेच प्रेम व माया करणारी हक्काचे आश्रयस्थान. आज अहिल्या मंदिरात अर्थात मातृतीर्थावर ज्यांचा सहवास, भेट प्रत्येकाला समृद्ध करते आणि पुन्हा ओढीने भेटण्याचा कायमच आग्रह धरतात अशा वंदनीय प्रमिलामावशी मेढे.


वंदनीय प्रमिला मेढे यांना भेटल्यावर प्रत्येक जण अद्भुत व्यक्तिमत्त्व हेच संबोधन करेल. राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व संचालिका असताना संपूर्ण भारत भ्रमण, अनेक संस्कृती स्वतः जवळून बघितलेल्या असताना त्यावर अभ्यासपूर्ण माहिती असणारे असे हे व्यक्तिमत्त्व. स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून आज त्या पूर्णवेळ राष्ट्र सेविका समितीत जीवन व्यतीत करत आहेत. प्रदीर्घ काळ संघटनेचा असलेला अनुभव याही वयात आश्चर्यकारक वाटतो. त्यांना भेटल्यावर प्रत्येक वेळी नवनवीन माहिती मिळत असते. खरे सांगायचे तर प्रमिलामावशी म्हणजे चालता-बोलता शब्दकोशच म्हणता येईल. मनाने चिरतरुण आणि सतत क्रियाशील असणार्‍या मावशी नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. कोणतेही काम करताना एक ध्येय, एक साध्य, एक आदर्श, एक दैवत असावे, हे प्रमिलामावशी आवर्जून सांगतात. राष्ट्राची उपासना करताना उपास्यदैवत हे भारतमाताच असावे, हेच त्या नेहमी सांगतात. स्त्रीही नैसर्गिकदृष्ट्या अष्टावधानी असतेच. स्त्रीने काळानुसार स्वतःत बदल करावे. नव्या गोष्टी आत्मसात करण्याची तयारी असावी हाच त्यांचा आग्रह आहे. खरेतर राष्ट्र सेविका समितीचे कार्य बघताना प्रमुख संचालिका हे सर्वोच्च दायित्व आहे. बरेचदा आपण एखाद्या मोठ्या दायित्व असणार्‍या व्यक्तीला भेटलो, तर आपल्यात आणि त्यात एक वेगळे दुरत्व जाणवते, पण वंदनीय प्रमिलामावशींना भेटल्यावर असे जाणवणारच नाही. त्यांच्याशी भेटून, बोलून कुठेही मोठेपणा जाणवतच नाही. मातृहृदयी प्रेमाने बहरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे वंदनीय प्रमिलामावशी. आजही वंदनीय प्रमिलामावशी यांचा सततचा सहवास आणि मार्गदर्शन हे कायमच विचार देत असतात. कुठल्याही घटनेवर त्यांची दृष्टी सकारात्मकता प्रदान करत असते. त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर गीतेतील हाच श्लोक आठवतो

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङकारः समदुःखसुखः क्षमी ॥

आज सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर होत असताना स्वकर्तृत्वाने आणि राष्ट्रकार्यात मौलिक योगदान दिल्याने आणि सद्गुणी व्यक्तिमत्त्व म्हणून आदरणीय, पूजनीय आहेत. नुकतीच डी.लिट मिळाल्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वंदनीय प्रमिलामावशी यांचे अहिल्या मंदिरात जाऊन अभिनंदनही केले. एक हृद्य सोहळा उपस्थित प्रत्येकाने अनुभवला. आपले कार्य आणि कर्तृत्व आम्हाला सदैव प्रेरणादायी ठरावी, हीच सदिच्छा आहेच. आई भवानी उदंड आयुष्य व निरामय आरोग्य प्रदान करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना!


- सर्वेश फडणवीस 
@@AUTHORINFO_V1@@