मॉरिशसच्या राजकारणातील भीष्मपीतामह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2020   
Total Views |
mansa_1  H x W:


मॉरिशसचे माजी पंतप्रधान आणि माजी राष्ट्रपती, मूळ भारतीय वंशाचे असलेल्या अनिरुद्ध जगन्नाथ यांना यंदा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांचा अल्पपरिचय करुन देणारा हा लेख...


मुळ भारतीय वंशांच्या अनेक व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे कीर्तिमान प्रस्थापित केले आहे. मग ते ब्रिटनमधील भारतीय वंशाचे पहिले सांसद ठरलेले दादाभाई नौरोजी असो वा आताचे अमेरिकेतील गर्व्हनर बॉबी जिंदाल किंवा आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर. अशा जागतिक पटलावर झळकलेल्या नामदार व्यक्तिमत्त्वांची यादीही मोठी होईल. याच यादीमध्ये निश्चितच मानाचे, अभिमानाचे स्थान द्यावे लागेल ते अनिरुद्ध जगन्नाथ यांना. मॉरिशसचे जवळपास १८ वर्षं पंतप्रधानपद आणि नंतर राष्ट्रपतीपदही त्यांनी भूषविले. आता अनिरुद्ध यांचे सुपुत्र प्रविंद जगन्नाथ २०१७ पासून मॉरिशसच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत. तेव्हा, अनिरुद्ध यांना ‘मॉरिशसच्या राजकारणातील भीष्मपीतामह’ म्हटल्यास अजिबात वावगे ठरणार नाही.



अनिरुद्ध यांचा जन्म भारतात झाला नसला तरी त्यांचे पूर्वज फार पूर्वी म्हणजे जवळपास १८३४ मध्ये मॉरिशसमध्ये दाखल झाले. ब्रिटिशांनी जवळपास चार लाख भारतीय मजदुरांना बोटीने मॉरिशसमध्ये नेले आणि ही भारतीय मंडळी मग मॉरिशसमध्येच स्थायिक झाली. जगन्नाथ यांचे पूर्वज मूळचे बिहारच्या यादव कुळातील ‘अहिर’ जातीचे. मूलत: मॉरिशसमध्ये शेती आणि खासकरून उसाची लागवड करण्याकरिता या मजुरांचा ब्रिटिशांनी पुरेपूर वापर करुन घेतला. पण, हे मजूर आपली भारतीय संस्कृती विसरले नाहीत. आपल्या संपन्न संस्कृतीची बीजे त्यांनी मॉरिशसच्या मातीतही रुजविली. त्यामुळे ज्यांच्या पूर्वजांनी मॉरिशसच्या मातीत मजुरी करून मळे फुलविले, आज त्यांचेच वंशज मॉरिशसचे सत्ताधारी आहेत, हे सर्वार्थाने कौतुकास्पद म्हणावे लागेल.



वाचून आश्चर्य वाटेल, पण मॉरिशसच्या माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद भूषविलेल्या अनिरुद्ध यांचे प्राथमिक शिक्षण भोजपुरी माध्यमातून झाले, तर माध्यमिक शिक्षण रिजंट महाविद्यालयातून त्यांनी पूर्ण केले. पुढे १९५१ मध्ये त्यांनी विधी शिक्षणासाठी ब्रिटन गाठले. त्यानंतर मॉरिशसला परतल्यानंतर १९६४ साली पलामा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर संसदेत अपक्ष उमेदवार, मग मॅजिस्ट्रेट, सिनियर क्राऊन कौन्सिल सदस्य असा त्यांचा प्रारंभीचा राजकीय प्रवास राहिला. इतकेच नाही, तर ब्रिटनच्या वसाहतवादापासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रक्रियेतही अनिरुद्ध यांचा सक्रिय सहभाग होता. १९७० साली त्यांनी ‘मॉरिशन मिलिटंट मूव्हमेंट’ (एमएमएम) मध्ये सहभागही घेतला. हळूहळू त्यांचे राजकीय वजन मॉरिशसमध्ये वाढत गेले. ‘पीएसएम’ पक्षाबरोबर युती करून १९८२ साली पहिल्यांदा मॉरिशसच्या पंतप्रधानपदी ते विराजमान झाले. पण, पुढे पक्षीय मतभेदांमुळे जगन्नाथ यांनी ‘एमएमएम’शी फारकत घेत ‘मूव्हमेंट सोशलिस्ट मिलिटंट’ (एमएसएम) हा स्वतंत्र पक्ष स्थापित केला. १९८७, १९९१ सालीही देशामध्ये घडवून आणलेले आमूलाग्र बदल आणि लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत जगन्नाथ पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. पण, सत्ता आज नसते, उद्या नाही. जगन्नाथ यांच्या बाबतीतही तसेच घडले. त्यांनाही विरोधी पक्षाच्या बाकावर बसावेच लागले. पुढे २००३ साली पक्षाची सूत्रे आपल्या पुत्राकडे जगन्नाथ यांनी सोपविली असली तरी राजकीय महत्त्वाकांक्षा काही त्यांना शांत बसू देत नव्हती. म्हणूनच, २००३-२००८ आणि पुढे २००८-२०१२ मॉरिशसचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कारभार पाहिला. मॉरिशसच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा कल लक्षात घेता, २०१४ साली जगन्नाथ यांनी सहाव्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. पण, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच २०१७ साली त्यांनी आपल्या जागी सुपुत्राची पंतप्रधानपदी वर्णी लावली.



त्यामुळे जवळपास तीन दशकांहून अधिक काळ अनिरुद्ध जगन्नाथ मॉरिशसच्या राजकीय क्षितिजावरचा एक तळपता तारा म्हणून चमकत राहिले. त्यांच्या कारकिर्दीत निश्चितच मॉरिशसने आर्थिक, सामाजिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. मॉरिशसला जागतिक पर्यटनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठीही जगन्नाथ यांनी अवलंबलेली धोरणे कारणीभूत ठरली. जगन्नाथ यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे.



भारताशी मॉरिशसचे कायमच घनिष्ठ संबंध राहिले आहेत. खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत आणि जगन्नाथ यांच्या अखेरच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारत-मॉरिशस दरम्यान विविध क्षेत्राशी संबंधित करारांवरही स्वाक्षर्या् करण्यात आल्या. आज मॉरिशसमध्ये बहुसंख्येने भारतीय आणि मूळ भारतीय वंशांचे लोक स्थायिक आहेत. त्यामुळे अरबी समुद्रातील या द्वीपराष्ट्राशी भारताची नैसर्गिकच एक सांस्कृतिक नाळ जोडलेली आहे. इतके की, २०१८ साली मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईमध्ये तीन दिवसीय विश्व हिंदी संमेलनाचेदेखील शानदार आयोजन करण्यात आले होते. याच सोहळ्यादरम्यान बोलताना भारत आणि हिंदी भाषेविषयी गौरवोद्गार काढताना जगन्नाथ म्हणाले होते की, “मॉरिशसच्या स्वातंत्र्यलढ्यामागे हिंदी भाषेचे फार मोठे योगदान आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदीने मॉरिशसच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासामध्ये फार मोलाची भूमिका बजावली आहे. आपण भारताला ‘माता’ मानतो, तर मॉरिशसच हा याच भारतमातेचा सुपुत्र आहे.”


तेव्हा, मॉरिशसच्या या भारतीय वंशाच्या सुपुत्राचा ‘पद्मविभूषण’ जाहीर करून भारत सरकारने उचित सन्मानच केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@