कोरोना आणि पोटाला महाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2020   
Total Views |
japa_1  H x W:



आशिया खंडातील छोट्या छोट्या देशांना येनकेनप्रकारे आपले मांडलिक करण्याची संधी चीनने कधीही सोडली नाही. कधी मदतीचा हात देऊन, तर कधी छोट्या देशांच्या भूभागावर लबाडीने कब्जा मिळवून, चीनने साम्राज्य पसरवायचे एककलमी धोरणच आखले आहे. हे सगळे सांगण्याचे कारण हे की, सध्या कोरोना व्हायरसमुळे चीन चिंतेत आहे. एकटा चीनच नाही तर सगळे जग या व्हायरसच्या राक्षसी प्रतापाने चिंतेत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चीनमध्ये या विषाणूमुळे शेकडो माणसे हकनाक मृत्युमुखी पडली, तर हजारो माणसे या आजाराच्या चक्रात अडकून मृत्यूची घटिका मोजत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी चीनने काही निर्बंध तातडीने लादले आहेत. या सगळ्या गदारोळातही चीनने आपल्या दडपशाहीची एकही संधी सोडली नाही.


चीनविरोधात हाँगकाँग आणि तैवानही ‘जिंकू किंवा मरू’च्या तयारीत आहे. हाँगकाँगची जनता तर रस्त्यावरच उतरली आहे. रक्तपिपासू वृत्तीचा माओवादी इतिहास असलेल्या चीनने यापूर्वी कितीतरी आंदोलने चिरडून टाकली. किड्यामुंग्यांसारखे आंदोलकांना मारून टाकले, पण कम्युनिस्ट मानसिकतेच्या चीनमधून त्या खुनी वार्ता सहजासहजी जगापर्यंत पोहोचल्या नाहीत. जागतिकीकरणामुळे जग एक खेडे झाले, तर समाज प्रसारमाध्यमामुळे जग एक खुले घर झाले. ज्या घरात कुणीही, कुठेही डोकावून अंदाज घेऊ शकतो की, कुठे नक्की काय चालले आहे. त्यामुळे चीनची कृत्ये जगाच्या चव्हाट्यावर उघडी पडत आहेत. मग, आंदोलनकर्त्या हाँगकाँगवासीयांवरचा चीनने केलेला हिंसात्मक हल्ला असू दे की, तैवानला दिलेली सूचनावजा धमकी असू दे, जगाने पूर्वीची सरंजामशाही वृत्ती वरवर तरी सोडली असल्याने आणि अमेरिका स्वत:ला महासत्ता ठरवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असल्याने चीनला आता पूर्वीप्रमाणे खुलेआम दडपशाही करता येत नाही.


तरीसुद्धा ज्या देशांवर कब्जा केला आहे, त्या देशांवर दडपशाही करणे चीनने सोडले नाही. उलट या ना त्या कारणाने चीन आपली विस्तारवादी वृत्ती कायम राखत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसने मृत्यूचे थैमान घातले आहे. जगण्यामरण्याची सीमा रेषा धूसर होत असताना चिनी हतबल झालेत. मात्र या परिस्थितीचा फायदा उठवत चीनने जबदरस्तीने ताब्यात ठेवलेल्या देशांवरची दडपशाही आणखी वाढवली आहे. हाँगकाँगच्या आंदोलकांना आंदोलनापासून रोखण्याचे चीनचे सगळे प्रयत्न वायफळ ठरले, तेव्हा चीन कोरोना व्हायरसचे भय दाखवत हाँगकाँगमध्ये आणीबाणी लादण्याच्या प्रयत्नात आहे. हाँगकाँगमध्ये आणीबाणी लादली की, कुणीही आंदोलक चीनविरोधात रस्त्यावर उतरला की, त्याला चीन आणीबाणीचे कारण दाखवत तुरुंगात धाडू शकतो.


दुसरीकडे चीनने कोरोना व्हायरसची भीती दाखवत तिबेटवरही दडपशाही सुरू केली आहे. तिबेटचे पोटाला पॅलेस हे दलाई लामांचे निवासस्थान. बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान. १३ मजल्याची ११० मीटर उंचीची ही विशाल वास्तू. जवळजवळ एक हजार दालने यामध्ये आहेत. इथे पूर्वी दलाई लामांचे वास्तव्य होते. पण, साठाव्या दशकाच्या आसपास चीनच्या आक्रमणाविरुद्ध दलाई लामांनी तिबेट सोडले, ते भारतात आले. मात्र तिबेटच्या राज-समाज-धर्मकारणाचे ते कायम केंद्रबिंदू आहेत. दलाई लामांचे निवासस्थान पाहण्यासाठी करोडो लोक पोटाला महालाला भेट देतात. धर्म आणि दलाई लामांवरची त्यांची श्रद्धा आणखी दृढ होते. लामा संस्कृती मानणार्‍यांना चीनचे तिबेटवरील आक्रमण बिलकुल आवडत नाही. त्यातच पोटाला महाल जागतिक वारसा लाभलेली वास्तू आहे. त्यामुळे चीनची पोटाला महालावर पूर्वीपासून वाकडी नजर. पण, पोटाला महालाला भेट देण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना चीन रोखू शकत नव्हता. आता कोरोना व्हायरसचे भय दाखवत चीनने पोटाला महाल अनियंत्रित काळासाठी बंद केला आहे.


तसे तिबेट काही नैसर्गिकरित्या चीनचा भाग नाही. तरीही केवळ दलाई लामांशी निगडित असलेल्या वास्तूवर निर्बंध लादता यावेत म्हणून चीनने खेळलेला हा डाव आहे. दलाई लामा आणि तिबेटने कितीही प्रतिकार केला तरी तिबेटवर आपलेच राज्य आहे, हा संदेश चीनने जगाला दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@