ज्ञानपेटी देई ज्ञानाचे दान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2020   
Total Views |
anchor story_1  


कल्याण :
कल्याण येथील युथ ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातून एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला जातो. गणपती आणि देवीच्या सणासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडळात ज्ञानपेटी लावून पुस्तके गोळा करण्याचा एक प्रयत्न केला जातो. मुंबई, ठाणे, नाशिकमधील युथ मेंबर्सच्या मदतीने १००० हून अधिक पुस्तके या माध्यमातून गोळा करण्यात आली आहेत. तसेच, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घोरवड तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या मोफत वाचनालयात ही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या आधी या संस्थेने बदलापूर येथे मोफत वाचनालय सुरू केले असून त्याचा फायदा येथील आसपासच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना होत आहे.


दरम्यान, नाशिक येथील घोरवड येथे संस्थेने दुसरे मोफत वाचनालय सुरू केले आहे. यात लहानग्यांच्या गोष्टी, कथा-कादंबऱ्या , प्रेरणार्थक, सामान्य ज्ञान, इतिहास स्पर्धा परीक्षा अशी अनेक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘युथ ऊर्जा फाऊंडेशन’ने समाजातील विविध समस्यांबाबत नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे.


दुष्काळग्रस्त गावांच्या मदतीसाठी पाणी फाऊंडेशनच्या मदतीने जलमित्र म्हणूनदेखील काम केले आहे. घोरवड येथेच या सर्व मित्रांनी मिळून गावकऱ्यांच्या मदतीने चर पाडून पावसाळ्यात येथे पाणी अडवून ठेवण्यासाठी मदत केली आहे.


‘युथ ऊर्जा फाऊंडेशन’च्या माध्यमातून २०१६ पासून विविध समाजोपयोगी कार्यक्रम केले जातात. यात प्रामुख्याने वृक्षारोपण मोहीम, जनजागृती मोहीम, जाणीव वृद्धाश्रम येथे नवीन खोल्या बांधण्यास मदत, चारशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शैक्षणिक साहित्याचे वितरण, रक्तदान शिबीर, शाळा व रुग्णालयांमध्ये वृक्षारोपण, माझे कर्तव्य ही कार्यशाळा, मोखाडा तालुक्यात रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट, सायकल रिसायकल प्रोजेक्टद्वारे ७७ गरजूंना सायकल वाटप, केरळमधील पूरग्रस्तांना मदत तसेच गरजवंतांना रक्तपुरवठा करण्यासाठी युथ ऊर्जा फाऊंडेशनची टीम सतत कार्यरत असते. शाहूराज साळवी व वैभव खैरे संस्थापक तर गौरव पाटील, संदेश वारखंडकर, अमेय आचरेकर, सुशांत शिरसाट हे या संस्थेचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@