यशस्वी उद्योजिका घडताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2020   
Total Views |
kanchan bhalekar_1 &


मुंबईतील गोवंडीच्या बैंगनवाडी वस्तीमध्ये नकारात्मक परिस्थितीमध्ये एका मुलीने उद्योजिका होण्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न पाहणेही धाडसच होते. पण, तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. अशा कांचन भालेकर यांची कथा...



“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र विषयाचा गहन अभ्यास केला होता अर्थशास्त्राविषयीचे त्यांचे विचार कालातीत आहेत. बाबासाहेबांचे अर्थशास्त्राचे विचार वाचून, ऐकून मीही कला शाखेचे शिक्षण घेताना अर्थशास्त्र हा विषय निवडला,” असे ‘ओरम’ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका कांचन भालेकर सांगत होत्या. एक यशस्वी उद्योजिका म्हणून कांचन भालेकर यांची ओळख आहे. तरुण आणि तडफदार, तितक्याच समाजशील असलेल्या कांचन भालेकर यांचे उद्योजिका असणे हीदेखील एक वेगळीच कहाणी आहे.


कांचन यांचे पिता उदय भालेकर हे मूळ अकोल्याचे. पण, उदय यांचा जन्म मुंबईतला. गोवंडी येथे उदय आणि त्यांची पत्नी रोहिणी राहत होते. त्यांना दोन अपत्ये. त्यापैकी एक कांचन. उदय आणि रोहिणी यांचे शिक्षण बेताचे असले तरी दोघेही सुसंस्कारीत आणि समाजभान जपणारे. उदय दर रविवारी कांचनला घेऊन बौद्धविहारात जात. धम्म वंदना करत. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार-गोष्टी ऐकवत. तिथेच कांचन यांच्या मनात एक ज्योत जागृत झाली की, आपण समाजाचे देणेकरी आहोत. आपल्याला शिकून सवरून काहीतरी चांगले करायचे आहे, पण त्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागणार होता.


उदय यांचा वांद्रे येथे ज्यूस विकण्याचा व्यवसाय होता, तर रोहिणी घरी कपडे शिवत, मसाले बनवून विकत. एके दिवशी महानगरपालिकेने तिथे खाण्यापिण्याचे पदार्थ विकण्यास बंदी घातली. त्यामुळे उदय यांचा धंदा बंद झाला. घराचे वासे फिरले. रोहिणी यांच्या अनिश्चित व्यवसायावर घर कसे चालणार? कधी कधी तीन-तीन दिवस पाणी पिऊन राहावे लागे. तीन दिवसांतून एकदा अन्न मिळाले तरी नशीब. त्यावेळी कांचन यांनी ठरवले की, आपणही आई-वडिलांना मदत करायची. कांचन दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करू लागल्या. त्यावेळी त्या आठवीला होत्या. सकाळी शाळेत जायचे, तेथून दुपारी दवाखान्यात जायचे. संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांची खाजगी शिकवणी घ्यायची. त्यामध्ये आईही मदत करे. घरात एक वेळचे अन्न शिजू लागले. या काळात कांचन कराटे शिकत होत्या. कारण, आई म्हणे, “आम्ही जे शिकू शकलो नाही, ते तुला शिकायलाच हवे. दोन घास कमी खाऊ, पण तू शिक.” आईवडिलांचे हे विचार ऐकून कांचनने ठरवले की, ही परिस्थिती बदलायलाच हवी.


पुढे कांचन महाविद्यालयात जाऊ लागल्या. चार वर्षांतून एकदा साधे नवीन कपडे मिळत, याही परिस्थितीमध्ये महाविद्यालयाचे जीवन हे रंगीत होते, असे म्हणूच शकत नाही. त्याच काळात उदय कपडे विकण्याचा व्यवसाय करू लागले. परिस्थिती थोडी फार सुधारली. कांचन यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. पुढे त्यांनी एक-दोन ठिकाणी नोकरीही केली. पण, नोकरीमध्ये कांचन यांना स्वारस्य नव्हतेच. कारण, आई-वडिलांनी आयुष्यभर व्यवसाय केलेला. कांचन यांना वाटे, आपण स्वत:चे काहीतरी नवीन सुरू करावे, आपल्यासोबतच इतरांचेही भले करावे. पण, नातेवाईक घरी येऊन आईवडिलांना सांगत, मुलीला किती दिवस घरी ठेवणार? लग्न करून टाका. कांचन यांची घुसमट होऊ लागली. पण, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.


‘एचपीसीएल’चा मागासवर्गीय आणि भटके विमुक्त समाजासाठी उद्योजक प्रशिक्षणाचा अर्ज कांचन यांनी भरला. पहिल्यांदा संधी मिळाली नाही. मात्र, दुसऱ्या वर्षी मिळाली. लेखी आणि तोंडी मुलाखतीमध्ये कांचन उत्तीर्ण झाल्या. आई-वडिलांचे म्हणणे, शेवटी तुझ्या इच्छेनुसार काहीतरी वेगळे करायला मिळते आहे, तर शिक. त्यामध्येच कांचन यांनी उद्योग, कंपनी निर्मिती याबाबत प्रशिक्षण घेतले आणि स्वत:ची कंपनी स्थापन केली- ‘ओरम.’ प्रशिक्षण संपले, आता उद्योग-व्यवसाय सुरू करायचा होता. वडील लेकीच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. त्याचवेळी ‘एचपीसीएल’चे बल्क एलपीजीचे टँकर, ट्रक उद्योजक निविदा निघाल्या. ‘डिक्की’च्या मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनातून कांचन यांनी निविदा भरली.


निविदा भरण्यासाठी सहा लाखांची अनामत रक्कम भरणे गरजेचे होते. यावेळी आईने होते नव्हते ते सगळे दागिने, अगदी मंगळसूत्रासह विकले. उदय यांनी सगळ्या ‘एफडी’ मोडल्या. गोवंडी सोडून दुसरीकडे नवीन घर घ्यायचे होते, त्याचे पैसे काढून रक्कम उभी केली. एकच इच्छा होती की, मुलीने इतक्या आत्मविश्वासाने व्यवसाय करायचा ठरवले, तर तिला मदत करायची. मात्र, त्या निविदेवरून न्यायालयात खटला भरला गेला. निविदा मिळणार नाही, आयुष्यात आलेली संधी हुकली. आपले तर सोडाच, पण आईबाबांनी पै-पै करून साठवलेले पैसे आपल्यामुळे मातीमोल होणार, या दु:खाने कांचन यांना जगणे असह्य झाले. आईवडिलांच्या नजेरला नजर देणे त्या टाळू लागल्या. काहीबाही छोटी-मोठी कामे करू लागल्या. सकाळी पहाटे उठायचे आणि रात्री सगळे झोपले की घरी यायचे असाच दिनक्रम. आईवडिलांची मनस्थिती आपल्यामुळे बिघडली, हाच विचार कायम मनात असायचा.


मात्र, एके दिवशी बातमी आली की, न्यायालयाने निर्णय दिला आहे की, निविदा बदलणार नाहीत. मात्र, लॉटरी पद्धतीने सोडत होणार. ज्यांचा क्रमांक लागेल, त्यांनाच उद्योगाची संधी मिळणार. २५० पैकी १३९ लोकांना निविदा पास केली जाणार होती, तेही लॉटरी पद्धतीने. समोर सगळे मोठमोठे उद्योगपती, कुणी आपल्या पत्नीच्या नावाने तर कुणी मुलींच्या नावाने निविदा भरलेली. एक एक करता करता १३१ क्रमांकपर्यंत सोडत झाली, पण कांचनच्या कंपनीचे नाव आले नाही. तिला तेथून पळून जावेसे वाटले, पण ‘डिक्की’च्या सदस्यांनी सांगितले, ‘धीर धर, बघ काय होते ते.’ शेवटी १३२ क्रमांकावर तिच्या कंपनीला सोडत लागली. ‘कांचन उदय भालेकर-ओरम कंपनी.’ कांचन यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर ओघळू लागला. आईवडील, ते गरिबीचे दिवस, ते कष्ट, सगळे सगळे एका क्षणात आठवले. नशिबाने एक संधी दिली होती. त्या संधीचे सोने करायचे होते आणि तसे ते कांचन यांनी केलेही. कांचन म्हणतात, “समाजातील महिलांनी उद्योजिका म्हणून पुढे यावे यासाठी मी प्रयत्न करते आहे. हेसुद्धा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचेच काम आहे.”
@@AUTHORINFO_V1@@