'अंतर्गत सुरक्षेसाठी केंद्र सरकार कटीबद्ध' : राष्ट्रपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : "देशाच्या विकासासाठी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अतिशय मजबूत असणे गरजेचे असते. त्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेस मजबूत करण्यासाठी सरकारने अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. सुरक्षेसोबतच संपूर्ण देशाचा विकास घडविण्यासाठीदेखील सरकार प्रयत्नशील आहे. जम्मू - काश्मीर, लडाख असो की ईशान्य भारत असो किंवा हिंदी महासागरातील बेटे असो, सर्वांगीण विकास साधण्यासाठी सरकार कार्यरत आहे," असे प्रतिपादन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणातून केले. "भारतीय संविधानाने आपणा सर्व भारतीयांना स्वतंत्र प्रजासत्ताकाचे नागरिक म्हणून काही अधिकार प्रदान केले आहेत. त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव अबाधित राखण्याची जबाबदारीदेखील सोपविली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनाचा आदर्श ठेवल्यास संवैधानिक जबाबदारी पार पाडणे अधिक सोपे होते. तसे केल्याने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीस वेगळा आयाम देणे शक्य होईल, " असे कोविंद म्हणाले.

 

केंद्र सरकारच्या विविध योजनांचे कौतुक देखील त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले, "जनकल्याणासाठी सरकारने अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. विशेष म्हणजे जनतेनेही त्यात आपला सहभाग नोंदवून योजना यशस्वी करण्यास मोलाचा वाटा उचलला आहे. स्वच्छ भारत अभियान जनतेच्या सक्रिय सहभागामुळेच यशस्वी होत आहे. त्याचप्रमाणे उज्ज्वला योजना, डिजीटल व्यवहारास प्रोत्साहन हेदेखील जनतेच्या सहभागामुळे यशस्वी होत आहे," असे त्यांनी नमूद केले. "पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे देशातील ८ कोटी लाभार्थ्यांना स्वच्छ इंधन मिळत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून जवळपास १४ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रूपयांचा सन्माननिधी प्राप्त होत आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. "शिक्षण क्षेत्रातील देशाची प्रगती उल्लेखनीय आहे. देशातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, असा आमचा प्रयत्न आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या कार्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताच्या गगनयान मोहिमेची प्रगती अतिशय वेगाने सुरू असून संपूर्ण देश त्याच्या यशासाठी प्रार्थना करत आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. जपानमधील टोक्यो येथे होणाऱ्या २०२० सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंसोबत संपूर्ण देशाच्या शुभेच्छा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@