८३० लोकांना ‘कोरोना’ची लागण; प्रवासबंदीमुळे ७०० भारतीय विद्यार्थी चीनमध्ये अडकले
बीजिंग : कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या उपचारांसाठी चीन दहा दिवसांत रुग्णालय उभारणार आहे. वुहान शहरात ३ फेब्रुवारीपासून हे रुग्णालय सुरू होण्याची शक्यता आहे, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी शुक्रवारी दिले. सुमारे २५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या रुग्णालयात १ हजार बेडची सुविधा असेल, असे अधिकाऱ्यांनी शिनुआ वृत्तसंस्थेला सांगितले.
चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील २० प्रांत विभागांमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गची १०७२ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. कोरोना विषाणूमुळे न्यूमोनिया झालेल्यांची संख्या गुरुवारी ८३० इतकी होती. मृत्यू झालेल्या २५ जणांपैकी २४ जण मध्य हुबेई प्रांतातील आहेत, तर एक उत्तर हुबेई प्रांतातील आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार देशभर, तसेच जगात होऊ लागल्याने चीनने गुरुवारी वुहानसह तेरा शहरांमध्ये प्रवेशबंदी केली आहे. या शहरांमधील सर्व सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. हुबेई प्रांतातील आठ शहरांत ही प्रवासबंदी आहे. त्यासंदर्भात स्थानिक सरकारने सूचना जारी केली आहे, असे हाँगकाँग येथील 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने वृत्तात म्हटले आहे. चीनच्या अर्थ मंत्रालयाने गुरुवारी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हुबेई प्रशासनाला १ अब्ज युआन (१४ कोटी ४० लाख डॉलर) रक्कम देण्याचे जाहीर केले.
वुहान शहरात प्रवासबंदी लागू करण्यात आल्यामुळे तेथे शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. या शहरात सुमारे ७०० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी बहुतांश जण वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाने गुरुवारी हेल्पलाइन सुरू केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बीजिंगमधील भारतीय दूतावासाने प्रजासत्ताक दिनी होणारा कार्यक्रम रद्द केला आहे. या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डिस्नेनी शांघाई शहरातील मेगा थीमपार्क बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पर्यटकांचे सर्वांत मोठे आकर्षण असलेली चीनची भिंतही बंद करण्यात आली आहे. यासह चीन सरकारने अनेक पर्यटनस्थळे आणि गर्दीची ठिकाणी काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.