नवा झेंडा, नवी दिशा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2020
Total Views |

New flag new direction_1&
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे ज्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, त्या महाराष्ट्र निर्माण सेनेने (मनसे) कात टाकली असून, गुरुवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या महाधिवेशनात या पक्षाने आपला झेंडा बदलविला आणि व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या समवेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला स्थान देण्यात आले होते. मनसेने ही टाकलेली कात म्हणा किंवा घेतलेले वळण, महाराष्ट्राच्या राजकारणात तरी लक्षणीय ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
राजकारणात चाणाक्षपणाला फार महत्त्व असते आणि राज ठाकरे यांनी तो दाखविला आहे, असे लक्षात येत आहे. परिस्थितीचा नेमक्या वेळी आणि नेमका फायदा उचलण्यालाच खरे राजकारण म्हणतात आणि ती संधी राज ठाकरे यांनी हेरली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत महाराष्ट्रातील राजकारणात, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेेने हिंदुत्वाची साथ सोडून, केवळ आणि केवळ सत्तेसाठी (खरेतर मुख्यमंत्रिपदासाठी) जी कोलांटउडी मारली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी राज ठाकरे वेगाने पुढे आले आहेत. त्याचेच प्रतििंबब मनसेच्या रंगीबेरंगी झेंड्याच्या भगवेकरणात आणि व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्मानाने स्थान देण्यात झाले आहे, असे लक्षात येते.
परिवर्तन क्रमश: होत असते. राज ठाकरे यांनी मात्र एकदम वळणच घेतले आहे. फार काळ नाही गेला. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत, राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता, भाजपा व शिवसेना युतीला विरोध करण्यासाठी, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या समर्थनार्थ दणदणीत जाहीर सभा घेतल्यात. आपल्या ठाकरी शैलीने नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचा समाचारही घेतला. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आपल्या पारंपरिक विरोधकांच्या म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या मांडीवर अलगद जाऊन बसली. हा राज ठाकरे यांना फार मोठा धक्का होता. आपल्याला वापरून घेतल्याची त्यांना जाणीव झाली असावी. परंतु, शिवसेनेचे हे वर्तन सामान्य शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या पारंपरिक मतदार व हितिंचतकांना कितपत पसंत पडले, याचा अजूनही कुणालाच अंदाज आलेला नाही. शिवसैनिक संभ्रमात असल्याचे मात्र स्पष्टपणे दिसून येत आहे. याचाच फायदा राज ठाकरे यांनी उचलण्याचे ठरविलेले दिसते आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी, त्यांनी आपल्या पक्षाला दिलेला नवा झेंडा. हा झेंडा पूर्ण भगव्या रंगाचा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांजी राजमुद्रा अंकित केलेली आहे. व्यासपीठावर सावरकरांचा फोटो ठेवणे, हेही लक्षणीय आहे. तसे पाहिले तर राज ठाकरे यांना हिंदुत्वाचा विचार नवखा नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या िंहदुत्वाच्या विचारांखालीच राज ठाकरे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. राजकीय आकांक्षांना धुमारे फुटले होते. त्यामुळे आज जरी ते हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेताना दिसत असले तरी, त्या खांद्याला हा झेंडा आणि त्या झेंड्याला हा खांदा नवा नाही.
बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून सबंध महाराष्ट्र राज ठाकरे यांच्याकडे बघत असताना, अचानक बाळासाहेब यांनी स्वत:चा पुत्र उद्धव ठाकरे यांना राजकीय वारसदार नियुक्त केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपली वेगळी राजकीय चूल मांडली. परंतु, आजतागायत राज ठाकरे यांच्या राजकारणाला एक निश्चित अशी दिशा कधीच प्राप्त झाली नव्हती. दिशाहीन पक्ष, ठोस राजकीय विचारसरणी नाही, अशा स्थितीत मनसे पक्षाची राजकीय वाटचाल ठेचकाळत ठेचकाळत प्रभावहीन होत राहिली. एकेकाळी राज्याच्या राजकारणावर प्रभाव असलेला राज ठाकरे यांचा करिष्मा लोप पावू लागला. 2019च्या निवडणुकीत तर कहरच झाला. शरद पवार यांच्या संगनमताने राज ठाकरे यांनी जी खेळी खेळली, त्यानंतर मनसे आता संपल्यातच जमा झाल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, शिवसेनेच्या अवसानघातकी राजकारणाने त्यांना आता एक फार मोठी संधी मिळाली आहे. शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रात निर्माण झालेली ही पोकळी कोण भरून काढणार, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, राज ठाकरे मोठ्या चाणाक्षपणे परंतु निर्णायकपणे समोर आले आहेत. शिवसैनिकांची जडणघडण, त्यांच्या राजकारणाची पद्धत, त्यांची मानसिकता याची पुरेपूर कल्पना राज ठाकरे यांना आहे. शिवसैनिकांनाही राज ठाकरे यांच्या नेतृत्वात राजकारण करताना विशेष फरक जाणवणार नाही. त्यामुळे संभ्रमित झालेल्या शिवसैनिकांना आकर्षित करण्यात राज ठाकरे बर्‍यापैकी यशस्वी होतील, असे वाटते.
परंतु, या संधीचा मिळालेला लाभ स्थायी रूपात परिवर्तित करण्याची फार मोठी जबाबदारी राज ठाकरे यांच्या खांद्यावर आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. राज ठाकरे यांच्या राजकारणाची शैली, त्यांचा स्वभाव, त्यांच्या सवयी यांचा त्यांच्या पक्षावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. आपल्या आचार-विचारांचा चांगलाच परिणाम पक्षावर झाला पाहिजे, असा आग्रह आता राज ठाकरे यांना ठेवावा लागणार आहे. शिवसेनेने हिंदुत्वाला दिलेला धोका मतदार विसरले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी आता हे हिंदुत्वाचे निशाण उंचावले असले तरी, ते पुढे जाऊन राज ठाकरे देखील सत्तेसाठी हिंदुत्वाचे कंकण तोडून फेकणार नाहीत कशावरून? अशी शंका मतदारांच्या मनात येत असेल तर त्याला चूकही म्हणता येणार नाही. दुधाने तोंड पोळले तर ताकही फुंकून पिणारच ना! त्यामुळे हिंदुत्व विचारांच्या आणि विशेषत: शिवसेनेच्या मतदारांच्या मनातील ही शंका दूर करण्याची जबाबदारी राज ठाकरे यांच्यावर येणार आहे. यासाठी राज ठाकरे यांना तात्कालिक मोह-मायेला दूर सारावे लागणार आहे. सत्ताप्राप्तीसाठी अजिबात घाई न करता, हळूहळू पण ठामपणे महाराष्ट्राच्या राजकारणात आपले पाय मजबूत करावे लागणार आहेत. यासाठी मजबूत पक्षसंघटन आवश्यक असेल. कुठल्याही परिस्थितीत एकखांबी तंबू असून भागणार नाही. कारण, मनसेसमोर सर्वात मोठा व सर्वात धोकादायक शत्रू म्हणजे शिवसेना राहणार आहे. आज शिवसेनेजवळ सत्ता आहे. त्यामुळे आपला एकही मतदार राज ठाकरे यांच्या मागे जाणार नाही, याची काळजी शिवसेना घेईल, यात शंका नाही. ती त्यांनी घ्यायलाही हवी. अशा स्थितीत राज ठाकरे यांच्यावरील जबाबदारी तर अधिकच वाढते. अतिशय संयमी, विचारी, दूरदृष्टी असणारे तसेच पक्षसंघटनेकडे मायेने लक्ष देणारे नेतृत्व राज ठाकरे यांना उभे करावे लागणार आहे. आजवरच्या त्यांच्या कार्यशैलीच्या अगदी विरुद्ध अशी ही शैली आहे आणि ती त्यांना स्वत:त बाणवावी लागणार आहे.
ही सर्व पूर्वतयारी वेगाने यासाठी करावी लागणार आहे की, दोन वर्षांतच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचा प्राण आहे. या निवडणुकीत राज ठाकरे यांना पूर्ण शक्तिनिशी उतरावे लागणार आहे. आपले खरे मित्र कोण आणि छुपे शत्रू कोण याचा राजहंसी विवेक त्यांना दाखवावा लागेल. ही निवडणूक खर्‍या अर्थाने शिवसेना आणि मनसे यांच्यातील शक्तिपरीक्षणाची राहील. कोण सत्तेत बसतो यापेक्षा, मनसे आपले उपद्रव मूल्य किती प्रमाणात प्रस्थापित करते, याकडेच सर्वांचे लक्ष राहणार आहे. त्यात एकदा का राज ठाकरे यांनी बाजी मारली की, मग त्यांचे पुढचे राजकारण सोपे होत जाईल. नव्या आश्वासक वाटा उलगडत जातील. महाराष्ट्राच्या राजकारणात हा जो लक्षणीय बदल घडण्याचे संकेत दिसत आहेत, तो राज ठाकरे यांच्यामुळे आहे. म्हणून राज ठाकरे यांच्या पक्षाच्या नव्या झेंड्याला तसेच त्यांच्या नव्या अजेंड्याला शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@