‘चिंधीचोरी करून चिदंबरम तुरूंगात गेले’ ; धर्मेंद्र प्रधान यांचा टोला

    24-Jan-2020
Total Views |


p chidambaram_1 &nbs



नवी दिल्ली
: चिदंबरम हे नुकतेच चोरीच्या आरोपावरून तुरुंगवास भोगून बाहेर आले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कशाप्रकारे काम केले, हे संपूर्ण देशाला ठाऊक आहे. चिंधीचोरी करणाऱ्यांना कायदे आणि नियम पाळून काम करणाऱ्यांविषयी नेहमीच अडचण वाटत असते, असा टोला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना शुक्रवारी लगाविला.



विद्यमान केंद्र सरकारच तुकडे तुकडे गँग असल्याच्या चिदंबरम यांच्या वक्तव्याचा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, चिदंबरम यांची विश्वसनियता काय आहे आणि त्यांच्या कार्यकाळात कशाप्रकारे कारभार चालत असे, हे संपूर्ण देशाला चांगलेच ठाऊत आहे. चिंदबरम हे नुकतेच चोरीच्या आरोपावरून तुरुंगवास भोगून बाहेर आलेले आहेत. चिंधीचोरी करून चिदंबरम हे तुरुंगात गेले होते आणि अजुनही ते कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला कायदेशीररित्या काम करणाऱ्या आणि नियमांचे पालन करणाऱ्यांविषयी राग असणे स्वाभाविक आहे, असेही प्रधान म्हणाले.



जागतिक लोकशाही निर्देशांकात (डेमोक्रसी इंडेक्स) भारताचे मानांकन १० स्थानांनी घटल्याच्या संदर्भात चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. सत्तेत बसलेले लोकच खरे तुकड़े तुकडे गँग असून विद्यमान केंद्र सरकार लोकशाही मूल्यांना कमकुवत करण्याचे काम करीत आहे. गेल्या दोन वर्षात लोकशाहीची मूल्ये धोक्यात आली असून भारताचे मार्गक्रमण ज्या पद्धतीने होत आहे, ते पाहता प्रत्येक देशभक्त नागरिकास चिंता वाटणे स्वाभाविक आहे, असे चिंदबरम म्हणाले होते.